Monday 17 October 2022

DIO BULDANA NEWS 17.10.2022

 




महाराष्ट्र स्टार्टअप बुट कॅम्पमध्ये 37 नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण

बुलडाणा, दि. 17 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मुर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा पार पडली. यात जिल्ह्यातील 37 उमेदवारांनी नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण केले.

स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रे अंतर्गतच्या दुसऱ्या टप्प्यातील ‘जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा’ शुक्रवारी, दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी पंकज लद्धड इन्स्टिट्यूट ऑॅफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट स्टडीज येथे घेण्यात आली. या बुट कॅम्पचे उद्घाटन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सादरीकरण स्पर्धेकरीता उपस्थित उमेदवारांशी संवाद साधला. महिला उद्योजिका प्रेमलता सोनुने, खामगाव येथील हिंदुस्थान युनिलिव्हरचे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक हनवंत पुरोहित आणि उद्योजक महेश कुलकर्णी यांनीही उमेदवारांना मार्गदर्शन केले.

स्पर्धेत सादरीकरणासाठी नोंदणी केलेल्या 37 उमेदवारांनी कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास-सस्टेनिबीलिटी, कचराव्यवस्थापन, पाणी, स्वच्छता, उर्जा, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशिलता, ई-प्रशासन आणि इतर क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण केले. या सादरीकरणामधून जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट तीन विजेत्यांची बक्षिसाकरीता निवड करण्यात आली. यात प्रथम बक्षिसासाठी परशराम आखरे, द्वितीय डॉ. विशाल पानसे आणि तृतीय अक्षय डिडवानीया यांची निवड करण्यात आली.

जिल्हास्तरावरील विजेत्यांना प्रथम क्रमांक 25 हजार रूपये, द्वितीय क्रमांक 15 हजार रूपये आणि तृतीय क्रमांक 10 हजार रूपये पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील सादरीकरण स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातील कर्मचारी, तसेच पंकज लद्धड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट येथील कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.

00000

सामाजिक न्याय विभागाचा स्थापना दिवस साजरा

 

बुलडाणा, दि. 17 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन आणि समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळा आणि शासकीय वसतिगृहांमध्ये सामाजिक न्याय विभागाचा स्थापना दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

सहायक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आणि समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे शनिवारी, दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी विविध कार्यक्रम पार पडले. यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त डॉ. मंगेश वानखडे, समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, प्राचार्य एन. ए. गायकवाड, उपस्थित होते.

सुरवातीला  छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा  ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मविर दादासाहेब गायकवाड व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी डॉ. मंगेश वानखडे, मनोज मेरत, प्राचार्य श्री. गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. अनिता राठोड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, गीतगायन सादर केले.

000000

पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

 

बुलडाणा, दि. 17 : अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीस सुरवात करण्यात आली आहे. यात चिखली तालुक्यातील पात्र पदवीधरांनी नोंदणी करावी, असे आवाहन चिखलीचे तहसिलदार यांनी केले आहे.

मतदार नोंदणी ही दि. 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगामार्फत घोषित करण्यात आला आहे. यापूर्वी पदवीधरांनी कधीही पदवीधर मतदार म्हणून नोंदणी केलेली असली तरी यावेळी परत नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी जी व्यक्ती भारताची नागरिक आहे आणि मतदार संघातील सर्वसाधारण रहिवासी असणारी व्यक्ती नोंदणी करू शकणार आहे.

दि. 1 नोव्हेंबर 2022 रोजी किमान तीन वर्षे भारतातील विद्यापिठाची पदवी असेल किंवा त्या समकक्ष असलेली अर्हता धारण करीत असेल, अशा सर्व मतदारांनी चिखली तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागातून नमुना 18चा अर्ज घेऊन त्यासोबत स्वयंसाक्षांकित आधार कार्डची प्रत, स्वयंसाक्षांकित मतदान कार्डची प्रत, एक पासपोर्ट फोटो, राजपत्रित अधिकारी यांनी साक्षांकित केलेला पदवीधारक असल्याचा पुरावा, महिलांच्या नावामध्ये बदल असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र आदी जोडून निवडणूक विभागामध्ये सादर करावे लागेल. पदवीधारकांची पदवी ही 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी असणे गरजेचे आहे. पदवीधरांनी त्यांचा नमुना 18 दि. 7 नोव्हेंबर 2022 पूर्वी तहसिल कार्यालयात जमा करावे लागतील.

00000

No comments:

Post a Comment