Monday 17 October 2022

DIO BULDANA NEWS 15.10.2022








जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा
बुलडाणा, दि. १५ : भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. 
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, नगरपालिका प्रशासन अधिकारी गणेश पांडे, प्रमुख वक्ते गजेंद्रसिंह राजपूत आदी उपस्थित होते. 
श्री. गीते यांनी समाज माध्यमांवरील साहित्य आणि पुस्तके यांच्यामधील फरक समजावून सांगितला. एकेकाळी वाचनासाठी केवळ पुस्तके हाच पर्याय होता. मात्र आज लहान थोरांपासून सर्वजण मोबाईलमध्ये व्यस्त झालेली असताना रोज पुस्तकांची काही पाने वाचण्यावर भर द्यावा, असे आवाहन करून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पुस्तकातील ज्ञानच महत्त्वाचे ठरणार असल्याने पुस्तके वाचावित, असे सांगितले. 
श्री. राजपूत यांनी वाचनातून ज्ञानात भर पडते आणि हे ज्ञान प्रत्येकास प्रेरणा देण्याचे काम करते. वाचनामुळे प्रतिष्ठा वाढते, व्यक्तिमत्व विकास होतो. त्यामुळे माहिती आणि ज्ञानाचे स्त्रोत असलेली पुस्तके वाचण्यावर प्रत्येकाने भर द्यावा. वाचनामुळे मेंदूला व्यायाम मिळतो. त्यामुळे वाचन संस्कृतीला वेगळे महत्त्व आहे. वाचनामुळे बुद्धी वृद्धींगत होत असते. अशा या वाचन संस्कृतीला डॉ. एपीजे कलाम यांनी संपूर्ण आयुष्य वाहिले. त्यांच्या जीवनात पुस्तकांची असलेली भूमिका लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीदिनी वाचनास प्रेरणा मिळावी, यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे सांगितले
यावेळी निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक वैष्णवी मंडळकर, द्वितीय सार्थक जगदिश, तृतीय अमर्त्य पाटील तर प्रोत्साहनपर बक्षीस मोहिनी मगर आणि जोया फिरदोस सय्यद जाफर यांनी पटकविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. 
प्राथमिक गटाच्या हस्तलिखित स्पर्धेचे पहिले बक्षीस खामगाव पंचायत समितीतील जळका भडंग येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला देण्यात आले. द्वितीय क्रमांक केंब्रिज स्कूल बुलडाणा, तर तृतीय क्रमांक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा, वरखेड पंचायत समिती, चिखलीला देण्यात आला. प्रोत्साहनपर पुरस्कार जळगाव जामोद पंचायत समितीमधील पिंपरी जिल्हा परिषद शाळा आणि बुलडाणा पंचायत समितीमधील कोलवड येथील विद्या विकास विद्यालयाला देण्यात आला. 
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात सहभाग नोंदविल्याबद्दल डॉ. विकास बाहेकर, डॉ. एस. एम. कानडजे, गजेंद्रसिंह राजपूत, डॉ. गोविंद गायकी, डॉ. अनंतराव शिरसाट, डॉ. साधना भवटे, अरविंद शिंगाडे, डॉ. सदानंद देशमुख, डॉ. सिद्धेश्वर नवलाखे, श्री. पठाण, डॉ. वैशाली निकम यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी डॉ . एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक शामला खोत यांनी प्रास्ताविक केले. अरविंद शिंगाडे यांनी सूत्रसंचालन केले. नायब तहसीलदार संजय बनगाळे यांनी आभार मानले. 

००००० 

No comments:

Post a Comment