Friday 21 October 2022

DIO BULDANA NEWS 21.10.2022

 आधारभूत किंमतीत खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ

* दि. 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ

बुलडाणा, दि. 21 : हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्य शासनातर्फे हमी दरात मका, ज्वारी आणि बाजरी खरेदीसाठी नोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणी दि. 21 ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता या नोंदणीसाठी दि. 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

यात शेतकऱ्यांना नोंदणी करण्याकरीता शेतकऱ्यांनी संस्थेत स्वत: हजर राहून छायाचित्र काढणे बंधनकारक आहे. नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी हंगाम २०२२-२३ चा सातबारा उतारा, पिकपेरा, स्पष्ट खाते क्रमांक दिसणारे बँक पासबुकची झेरॉक्स, जनधन पासबुक देण्यात येऊ नये, आधारकार्ड, ही कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. बँक खाते सुरु असल्याची खात्री शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यामध्ये मका, ज्वारी आणि बाजरी नोंदणीसाठी १४ केंद्रांना जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे. तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित बुलडाणा, मेहकर, लोणार, देऊळगावराजा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद व खामगाव, तसेच संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, अंजनी खु. केंद्र - साखरखेर्डा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था मर्यादित, चिखली, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी, नारायणखेड, ता. देऊळगावराजा, केंद्र - सिंदखेडराजा, नांदुरा ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी, नांदुरा, केंद्र - वाडी, या केंद्रांना मान्यता दिलेली आहे.

शेतकऱ्यांनी हमीदराचा लाभ घेण्यासाठी स्वतः नोंदणी केंद्रावर उपस्थित राहून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी केले आहे.

000000

मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

* १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांक

बुलडाणा, दि. 21 : भारत निवडणूक आयोगाने दि. १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नागरिकांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमानुसार दि. नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान केद्रांवर प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सदर प्रारुप मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करुन घ्यावी. प्रारुप मतदारयादीमध्ये ज्या मतदारांची नावे आढळून आलेली नाहीत, तसेच दि. १ जानेवारी २०२३ रोजी ज्या मतदाराचे वय १८ वर्ष पर्ण होईल, अशा मतदारांनी दि.   नोव्हेंबर २०२३ ते ०८  डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

00000

स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणीपश्चात नुकसानीची

सूचना पिक विमा कंपनीस द्यावी

*नुकसानीची माहिती देण्यासाठी ऑफलाइनचीही सुविधा

बुलडाणा, दि. 21 : राज्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान होत आहे. या नुकसानीची माहिती क्रॉप इन्शुरन्स अॅप, विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय, कृषि विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, बँकेत विमा जमा केला त्या बँक शाखेत द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्या अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत विमा संरक्षित क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा पुराचे पाणी शेतात शिरून, शेत दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यास विमा संरक्षित पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत याबाबतची सूचना आपल्या संबंधित विमा कंपनीस द्यावी.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतर्गत केंद्र शासनाचे पिक विमा पोर्टलवर सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे पीक नुकसानीच्या सूचना देण्यासाठी सध्या अडचणी येत असल्याने ऑफलाइन पद्धतीने कंपनींना पिक नुकसानीच्या सुचना देण्यासाठी सर्व कंपनींमार्फत सूचना अर्ज छापील प्रती कंपनमार्फत क्षेत्रीय कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर अर्जाद्वारे कंपनी आणि क्षेत्रीय कृषि कार्यालयांकडे शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत.

शेतकऱ्यांनी विमा काढलेल्या पिकांच्या नुकसानीबाबत संबंधित विमा कंपनीला ऑफलाइन पद्धतीने सूचना द्यावी, असे आवाहन कृषि उपसंचालक अरुण कांबळे यांनी केले आहे.

00000

शनिवार, रविवारी प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार

बुलडाणा, दि. 21 : नागरिकांच्या सोयीसाठी शनिवार, दि. 22 ऑक्टोबर आणि रविवार, दि. 23 ऑक्टोबर 2022 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहे.

दिवाळी सणानिमित्त नवीन वाहनांची खरेदी होण्याची शक्यता असल्यामुळे नवीन वाहनांना पसंतीचा नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा ताबा मिळावा, तसेच महसूल जमा व्हावा, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये दोन दिवस सुरू ठेवण्यात येणार आहे, असे बुलडाणा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

00000




नॅशनल गेम्समध्ये पदकप्राप्त खेळाडूंचा

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

बुलडाणा, दि. 21 : गुजरात येथे पार पडलेल्या नॅशनल गेम्स स्पर्धेत आर्चरीमध्ये सुवर्ण पटकाविणाऱ्या मोनाली जाधव आणि कास्यपदक पटकविणाऱ्या प्रथमेश जावकार यांचा जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी जिल्हाधिकारी श्री. तुम्मोड म्हणाले, खेळाडूंनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करावे, शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत देण्यात येईल. खेळाडूंना नाविण्यपुर्ण योजनेतून साहित्य देण्यात आले. जिल्हाधिकारी यांना फलश्रृती पुस्तिका देण्यात आली.

समाज कल्याण उपायुक्त डॉ. अनिता राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार उपस्थित होते. आर्चरी खेळाची आधुनिक रेंज बुलढाणा येथील तालुका क्रीडा संकुलात तयार करण्यात आली आहे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी चंद्रकांत इलग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.

पदकप्राप्त खेळाडू मोनाली जाधव आणि प्रथमेश जावकार यांना महाराष्ट्र शासनाकडून अनुक्रमे 5 लाख रुपये आणि 2 लाख रुपये देवून गौरविण्यात येणार आहे. यापुर्वी देखील मोनाली जाधव व प्रथमेश जावकार यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक प्राप्त केले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दिली.

00000

बुधवारचे दिव्यांग शिबीर रद्द

बुलडाणा, दि. 21 : बुलडाणा जिल्हा रुग्णालयात नियमितपणे दिव्यांग बोर्ड सुरु आहे. मात्र बुधवार, दि. 26 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळी बलिप्रतिपदानिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे, अस्थीव्यंग, नेत्र संबंधित दिव्यांग तपासणी बाबतचे शिबीर रद्द करण्यात आले आहे, त्यामुळे दिव्यांग तपासणीस नागरिकांनी येऊ नये, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

000000000000

शेतकऱ्यांनी अनुदानित बियाण्यांची उचल करावी

* हरबरा, ज्वारी, गहू बियाणांचे दर जाहीर

बुलडाणा, दि. 21 : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अतंर्गत हरबरा, ज्वारी, गहू या पिकांचे बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यातील शेतकऱ्यांनी दि. 29 ऑक्टोबर 2022  पर्यंत बियाणांची उचल करावी, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

बियाणे वितरणाकरिता महाडीबीटी पोर्टलवर हरभरा 10 वर्षाआतील प्रमाणित बियाणे वितरण. ज्वारी 10 वर्षाआतील आणि 10 वर्षावरील प्रमाणित बियाणे वितरण, तसेच कृषि उन्नती योजनेंतर्गत बियाणे, लागवड साहित्यामध्ये ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमात हरबरा, गहू पिकाचे 10 वर्षाआतील आणि 10 वर्षावरील प्रमाणित बियाणे वितरणासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानावरील बियाणे उचल करण्यासाठी तालुका कृषि अधिकारी यांनी ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना लॉटरीसाठी पात्र आहेत, त्यांना परमिट दिलेले आहेत. त्या शेतकऱ्यांनी सदर परमिटद्वारे दि. 29 ऑक्टोबर 2022  पर्यंत अनुदानावरील हरभरा, ज्वारी व गहू याची उचल करावी. यानंतर दि. 29 ऑक्टोबर 2022 नंतर सदरचे परमिट बाद होणार आहे. त्यानंतर परमिटधारक ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानित प्रमाणित बियाणे वितरणाचे बियाणे मिळणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी शेतकऱ्यांची राहणार असून कुठलीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार नाही.

कृषि उन्नती योजनेंतर्गत दि. 30 ऑक्टोबर 2022 पासून बियाणे व लागवड साहित्य ग्रामबिजोत्पादनामध्ये हरबरा, गहू 10 वर्षावरील प्रती शेतकरी 1 एकर क्षेत्राकरिता, तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत हरभरा, ज्वारी, 10 वर्षाआतील व 10 वर्षावरील अनुदानावरील सर्व प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांसाठी खुले होणार आहे. शेतकऱ्यांच्या सातबारावरील क्षेत्रानुसार 0.40 आर पासून ते जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत क्षेत्रासाठी प्रमाणित बियाणे वितरणांतर्गत अनुदानावर मिळणार आहे. त्यासाठी प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यास प्रथम लाभ देण्यात येईल. शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी, महाबीज वितरक, एनएससी वितरक, कृभको वितरक यांच्याशी संपर्क साधावा.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात कडधान्य हरभरा 10 वर्षातील वाण असल्यास 45 रुपये प्रती किलो,  तृणधान्य ज्वारीसाठी  10 वर्षातील वाणास 30 रुपये प्रति किलो व 10 वर्षावरील वाण असल्यास 37 रु प्रती किलो, ग्राम बिजोत्पादन कार्यक्रमात हरभरा 10 वर्षाआतील वाणास 45 रुपये प्रती किलो, 10 वर्षावरील जॅकी वाणास 50 रुपये प्रती किलो, दिग्विजय विजय वाणाकरीता 51 रूपये प्रती किलो, गहू पिकाकरिता 10 वर्षाआतील वाण 25 जॅकी प्रति किलो व 10 वर्षावरील वाणास 27 रुपये प्रति किलो याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी अनुदानित दर राहणार आहे.

                                                0000000

No comments:

Post a Comment