Monday 3 October 2022

DIO BULDANA NEWS 03.10.2022

 पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना प्रवेश प्रक्रिया सुरु

बुलडाणा, दि. 3 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत लाभ देण्यात येत आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी दि. 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांच्या अंतर्गत असलेल्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना बारावीनंतरच्या दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या व्यासायिक व तांत्रिक अभ्यासक्रमासाठी तसेच महानगरपालिका, विभागस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तरपासून 5 किमीच्या परिसरामध्ये स्थापित असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत लाभ देण्यात येत आहे. त्यानुसार सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून खालील अटी व शर्ती प्रमाणे पात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन खालील दस्ताऐवज उपलोड करुन अर्ज 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत मागविण्यात येत आहेत. सदर ऑनलाईन भरलेला अर्ज व अपलोड केलेले दस्ताऐवज ऑफलाईन कॉलेज मार्फत कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे.

या योजनेसाठी विद्यार्थी, विद्यार्थीनी हे अनुसूचित जमातीचा असावा. विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 2.50 लाखाचे आत असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे बंधनकारक आहे, सदरचे खाते आधारकार्डशी सलंग्न असावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या, तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थ्यांचे पालक रहिवासी नसावे. सदर विद्यार्थी बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त 7 वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येईल. विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे.

विद्यार्थ्यांचे संस्थेमधील, महाविद्यालयातील उपस्थिती 80 टक्के पेक्षा अधिक असणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली संस्था शासन मान्यताप्राप्त महाविद्यालय, संस्थेमध्ये व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांस प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांने आदिवासी विकास विभागाच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करुन जातीचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र, तहसिलदाराचा उत्पन्‍नाचा दाखला, आधारकार्ड, प्रवेश पावती, बोनाफाईड प्रमाणपत्र, मागील वर्षाची मार्कशीट, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते बुक आधारसलग्न असलेले हे मुळ दस्तावेज स्कॅन करुन ऑनलाईन अपलोड करणे बंधनकारक आहे.

महाविद्यालयाने विद्यार्थ्याने भरलेला ऑनलाईन अर्ज विहित दस्तावेजांची पडताळणी करुन ऑनलाईन व हार्ड कॉपी प्रकल्प अधिकारी कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांस आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या मिकंवा संबंधीत शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी, व्यवसाय करत नसावा. एका शाखेची पदवी मध्येच सोडून दुसऱ्या शाखेच्या पदवीसाठी प्रवेश घेतल्यास किंवा एका शाखेची पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण झाल्यानंतर इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास सदर योजनेचा लाभ मिळणार नाही.

केंद्र शासनाच्या पोस्ट बेसिक मॅट्रीक शिष्यवृत्तीकरीता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेंतर्गत लाभ देण्यात येईल. तथापि 2 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. विद्यार्थ्याने त्याचे स्वयंघोषणापत्र व वडिलांचे घोषणापत्र ऑनलाईन व हार्डकॉपी सादर करणे बंधनकारक राहील. सदर योजनेमध्ये विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशिर कारवाईस पात्र राहतील,  असे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांनी कळविले आहे. 

00000000

पुणे येथे बुधवारी नैसर्गिक शेती कार्यशाळा

* कृषि विभागाच्या युट्युब चॅनलवर थेट प्रक्षेपण

बुलडाणा, दि. 3 : कृषी विभागातर्फे बुधवारी, दि. ६ ऑक्टोबर २०२२ रोजी पुणे येथील बालेवाडी क्रिडा संकुलात नैसर्गिक शेतीविषयी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण कृषि विभागाच्या युट्युब चॅनलवर www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था ग्रामपंचायत, शासकीय कार्यालये, कृषि विज्ञान केंद्र, कृषि संशोधन संस्थांमध्ये करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेत गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र ‍शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे उपस्थित राहणार आहेत.

राज्यभरातून सुमारे दोन हजार शेतकरी या कार्यशाळेस उपस्थित राहतील. दुपारच्या तांत्रिक सत्रात तज्‍ज्ञांचे मार्गदर्शन, तसेच राज्यात नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव कथन ऐकायला मिळणार आहे. या कार्यशाळेला जोडून नैसर्गिक शेतीबाबतच्या एका प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

00000

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना लागू

*विहित मुदतीत विमा हप्ता भरण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 3 : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2022-23 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व प्रायोगीक तत्वावर स्टॉबेरी या 9 फळ पिकांसाठी 30 जिल्ह्यांमध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बॅंकांना कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत, असे गृहित धरण्यात येईल. या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळ पिके घेणारे, कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळून कमाल 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येईल. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. त्यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. ही योजना सन 2022-23 आंबिया बहार मध्ये राबविण्यात येत आहे.

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड ही अहमदनगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार तर एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेडतर्फे बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली, सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर, तसेच भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेडतर्फे रायगड, बुलडाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद जिल्ह्यात ही विमा योजना राबविण्यात येणार आहे.

आंबिया बहार सन 2022-23 मध्ये फळपिकनिहाय योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्राक्ष पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम 3 लाख 20 हजार 000 रूपये असून गारपिट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम ही 1 लाख 6 हजार 667 रूपये आहे. यासाठी अंतिम मुदत ही दि. 15 ऑक्टोबर 2022 आहे. मोसंबी पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम 80 हजार रुपये असून गारपिट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम ही 26 हजार 667 रूपये आहे. यासाठी अंतिम मुदत ही दि. 31 ऑक्टोबर 2022 आहे. केळी पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम 1 लाख 40 हजार रुपये असून गारपिट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम ही 46 हजार 667 रूपये आहे. यासाठी अंतिम मुदत ही दि. 31 ऑक्टोबर 2022 आहे. पपई पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम 35 हजार रूपये असून गारपीट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम ही 11 हजार 667 रूपये आहे. यासाठी अंतिम मुदत ही दि. 31 ऑक्टोबर 2022 आहे. संत्रा पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम 80 हजार 000 रूपये असून गारपिट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम ही 26 हजार 667 रूपये आहे. यासाठी अंतिम मुदत ही दि. 30 नोव्हेंबर 2022 आहे.काजू पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम एक लाख रूपये असून गारपीट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम ही 33 हजार 333 रूपये आहे. यासाठी अंतिम मुदत ही दि. 30 नोव्हेंबर 2022 आहे. कोकणातील आंबा पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम एक लाख 40 हजार रूपये असून गारपीट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम ही 46 हजार 667 रूपये आहे. यासाठी अंतिम मुदत ही दि. 30 नोव्हेंबर 2022 आहे. इतर जिल्ह्यातील आंबा पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम एक लाख 40 हजार रूपये असून गारपिट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम ही 46 हजार 667 रूपये आहे. यासाठी अंतिम मुदत ही दि. 31 डिसेंबर 2022 आहे. डाळिंब पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम एक लाख 30 हजार रूपये असून गारपीट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम ही 43 हजार 333 रूपये आहे. यासाठी अंतिम मुदत ही दि. 14 जानेवारी 2023 आहे. स्ट्रॉबेरी पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम दोन लाख रूपये असून गारपिट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम ही 66 हजार 667 रूपये आहे. यासाठी अंतिम मुदत ही दि. 14 ऑक्टोबर 2022 आहे.

आंबिया बहार सन 2022-23 या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी निश्चित करण्यात आला असून निर्धारीत केलेले हवामान धोके लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत देय होणार आहे. आंबिया बहारातील फळपिकांची विमा नोंदणी करीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच आंबिया बहारात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांसाठी गारपीट या हवामान धोक्यासाठी राज्य शासनामार्फत विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभाग ऐच्छिक राहील. याकरीता अतिरिक्त विमा हप्ता देय आहे. ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याकरिता सहभाग नोंदवायचा असेल, अशा शेतकऱ्यांनी त्यांचा नियमित व अतिरिक्त विमा हप्ता हा बँकांमार्फतच भरणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची तसेच त्यांना भरावयाच्या विमा हप्त्याची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजिकच्या ई-सेवा केंद्र, बँक, वित्तीय संस्थांशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा. आंबिया बहारातील अधिसूचित फळपिकांच्या हवामान धोके, विमा संरक्षित रक्कम, संरक्षण कालावधी, विमा हप्ता आदी बाबतीत  सविस्तर माहितीचा दि. 18 जून 2021 चा शासन निर्णय उपलब्ध आहे. तसेच ई-सेवा केंद्र आणि बँक स्तरावरही याबाबतची माहिती उपलब्ध करुन देण्याच्या सूचना कृषी विभागाने सहभागी विमा कंपन्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विमा कंपनीचे तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

अवैद्य दारु विक्री करणाऱ्यास न्यायालयाने ठोठावली दंडाची शिक्षा

बुलडाणा, दि. 3 : विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या ढाबा मालक आणि याठिकाणी दारू पिणाऱ्यांना न्यायालयाने दंड ठोठावला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने चिखली आणि मेहकर परिसरात या कारवाई केल्या आहेत. यात दोन हॉटेलचालक आणि पाच व्यक्तींविरूद्ध कारवाई करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. 30 सप्टेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील हॉटेल काकाजी ढाबा, पेठ, ता. चिखली, हॉटेल श्रीयोग, मेहकर फाटा, भालगांव शिवार, ता. चिखली, हॉटेल विघ्नहर्ता, मेहकर फाटा, भानखेड शिवार, ता. चिखली, हॉटेल अन्नदाता, चिखली लोणार रोड, मेहकर, ता. मेहकर या हॉटेलमध्ये अवैधरित्या दारु पिण्याकरिता बसलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. या कार्यवाहीत एकुण 14 हजार 597 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील सर्वांवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा करण्यात आला. या गुन्ह्यातील व्यक्तींना दि. 1 ऑक्टोबर 2022 रोली चिखली न्यायालयात 24 तासाचे आंत दोषारोप पत्रासह हजर केले. न्यायदंडाधिकारी  एच. डी. देशिंगे यांनी दोन हॉटेल चालकांना प्रत्येकी 40 हजार रूपये, तसेच विना परवाना असलेल्या हॉटेल, ढाब्यावर मद्यसेवन करणाऱ्या 5 व्यक्तींना प्रत्येकी 5 हजार रुपये याप्रमाणे एकुण 1 लाख 5 हजार रूपयांचा दंड आकारला.

सरकारी वकील व्ही. एम. परदेसी यांनी कामकाज पाहिले. सदर कार्यवाही चिखलीचे निरीक्षक जी. आर. गावंडे, निरीक्षक किशोर पाटील, आर. आर. उरकुडे, दुय्यम निरीक्षक एस. डी. चव्हाण यांनी केली. गुन्ह्याच्या तपासात दुय्यम निरीक्षक ए. आर. आडळकर, आर. ई. सोनुने, जी. व्ही. पहाडे, एन. ए. देशमुख, एस. डी. जाधव, एस. अवचार, एस. बी निकाळजे, ए. एम. सोळंकी, ए. पी. तिवाने, पी. ई चव्हाण वाहनचालक आर. ए. कुसळकर, एम. एस. जाधव आणि व्ही. पी. पाटील यांनी सहाकार्य केले.

राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैरित्या हॉटेल, ढाब्यामध्ये दारु विक्री करणाऱ्या तसेच मद्यसेवन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. अवैध पद्धतीने दारु बनविणे, दारुचे वाहतूक करणे असे प्रकार घडत असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागास सुचना देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000

बुधवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द

बुलडाणा, दि. 3 : जिल्हा रुग्णालयातातील बुधवारी, दि. 5 ऑक्टोबर 2022 रोजी होणारे दिव्यांग तपासणी शिबीर विजयादशमीनिमित्त सार्वजनिक सुट्टीमुळे रद्द करण्यात आले आहे.  

दिव्यांग बोर्डतर्फे नियमितपणे तपासणी सुरु आहे. मात्र 5ऑक्टोबर 2022 रोजी दसरानिमित्त शासकीय सुट्टी असल्याने अस्थीव्यंग, नेत्र संबंधित दिव्यांग तपासणी रद्द करण्यात आली आहे.

00000

No comments:

Post a Comment