Thursday 13 October 2022

DIO BULDANA NEWS 13.10.2022

 

पौष्टिक तृणधान्याबाबत एकदिवसीय कार्यशाळा

बुलडाणा, दि. 13 : आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन २०२३ च्या अनुषंगाने शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहीम अंतर्गत रब्बी हंगामामध्ये पौष्टिक तृणधान्याबाबत एकदिवसीय कार्यशाळा व मार्गदर्शन उपविभागीय कृषि अधिकारी बुलडाणा, खामगाव, मेहकर यांच्यातर्फे घेण्यात येणार आहे.

सन २०२३ हे आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्त्व, पोषणमूल्य, दुष्काळात तग धरणारी पिके या दृष्टीने महत्‍त्व आहे. काळाच्या ओघामध्ये या पिकांची उत्पादकता कमी असल्याने व इतर नगदी पिकांवर भर दिल्याने पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात घट झाली आहे. या पिकांचे महत्‍त्व लक्षात घेता त्यांना चालना देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी रब्बी हंगामामध्ये जिल्हा आणि उपविभाग स्तरीय कार्यशाळेत सदर पिकांचे आहारातील महत्त्व याबाबत कृषि विभाग, कृषि विज्ञान केंद्र जळगाव जामोद व बुलडाणाचे शास्त्रज्ञ, आहारतज्‍ज्ञ, प्रगतीशील शेतकरी मार्गदर्शन करणार आहेत.

शेतकऱ्यांना सन २०२२-२३ मध्ये दर्जेदार प्रमाणित बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध व्हावे, तसेच तृणधान्य व पिकांच्या नवीन वाणांचा प्रचार, प्रसार व्हावा याकरिता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य अंतर्गत पीक प्रात्यक्षिके १०० टक्के अनुदानावर २ हजार २२० हेक्टरवर २२२ क्विंटल बियाणे तसेच मिनिकीटद्वारे ज्वारी पिकाचे ५०० ग्रॅम प्रमाणे ३४.१५ क्विंटलचे ६ हजार ८३० मिनिकीट मोफत देण्यात येणार आहे. प्रमाणित बियाण्यांच्या वितरणांतर्गत अनुदानित दराने रब्बी ज्वारी बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास ३० रूपये प्रती किलो आणि १० वर्षावरील वाणास १५ रूपये प्रती किलोप्रमाणे महाबीज कंपनीमार्फत त्यांच्या अधिकृत वितरकांद्वारे तालुकानिहाय ज्वारी पिकांचे प्रमाणित बियाणे वितरीत करण्यात येणार आहे. वरील सर्व बाबींसाठी शेतकऱ्यांची निवड महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करून होणार आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी आणि तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, तसेच याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

000000

शेतकरी प्रशिक्षणासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 13 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर प्रशिक्षण देण्यात येत आहे. या दौऱ्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी पर्यंत अर्ज करावे लागणार आहे.

या दौऱ्यात बुलडाणा, चिखली, मोताळा, मलकापूर तालुक्यातील फळबाग लागवड, कांदाचाळ, संरक्षित शेती, काढणी पश्चात व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रियेबाबत प्रत्यक्ष शेतावर जाऊन माहिती देण्यात येणार आहे. फलोत्पादन तसेच कृषी क्षेत्राशी निगडीत काम करणाऱ्या संशोधन संस्था, भारतीय अनुसंधान परिषदेंतर्गत संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्र, पुणे, अहमदनगर, नाशिक व सोलापूर या ठिकाणी कार्यरत आहे. फलोत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता अभ्यास दौऱ्याचे आयोजन उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. पाच दिवसीय प्रशिक्षण दौऱ्यासाठी शासनाच्या वतीने अनुदानावर सहलीसाठी इच्छुक शेतकऱ्यांना अर्ज करावे लागणार आहे.

प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत राबविलेल्या उपक्रमाची पाहणी करुन शेती व कृषी प्रक्रिया क्षेत्रात उत्पन्न वाढीच्या संधीचा अभ्यास शेतकऱ्यांना करता येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे निवड करण्यात येणार आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे सातबारा, आठ अ असावा, वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे असावी. आधारकार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट फोटो अर्जासोबत सादर करावा लागणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

00000000

मत्स्यव्यवसाय कार्यालयाच्या वाहनाचा लिलाव

 बुलडाणा, दि. 13 : सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय कार्यालयाच्या वाहनाचा लिलाव करण्यात येणार आहे. वाहन घेऊ इच्छिणाऱ्यांनी दि. 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत बोली लेखी स्वरूपात सादर करावी लागणार आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या मालकीचे वाहन जीप वाहन क्र. एमएच 01 बी 8904 महिंद्रा पिजोड जिप निर्लेखित करण्यात आली आहे. सदरचे वाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलडाणा यांच्या प्रमाणपत्रानुसार निर्लेखन करीत जाहिर बोली लिलावाद्वारे परिवहन विभागाने ठरविलेल्या किंमतीपेक्षा अधिकच्या किंमतीने लिलाव करण्यात येणार आहे.

हे वाहन घेऊ इच्छिणाऱ्यांनी शुक्रवार, दि. 14 ऑक्टोबर ते दि. 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, तालुका बुलडाणा, प्रशासकीय इमारत, पहिला माळा, बसस्थानकासमोर, बुलडाणा यांनी केले.

0000000

ग्रामीण भागातील महिलांना सेसमधून अनुदान

बुलडाणा, दि. 13 : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे जिल्हा परिषद सेस अंतर्गत सन 2022-23 या वित्तीय वर्षासाठी ग्रामीण भागातील महिलांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यात विविध यंत्रांसाठी 90 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी दि. 27 ऑक्टोबर 2022 पर्यंत सादर करावे लागणार आहे.

या योजनेतून 10 टक्के लोकवाटामधून शिलाई मशिन पुरविणे, पिको फॉल मशिन पुरविणे, घरगुती मसाला उद्योग यंत्र पुरविणे, पल्वरायझर मशिन पुरविणे, पिठाची चक्की पुरविणे  या 5 योजना  प्रस्तावित आहेत. तसेच आदिवासी उपयोजनेच्या विशेष घटक योजनेतून सन 2022-23 या वित्तीय वर्षासाठी ग्रामीण भागातील महिलांना 90 टक्के अनुदानावर शिलाई मशिन, पिको फॉल मशिन, पल्वरायझर मशीन, शेळी गट, कुक्‍कुटपालनकरिता अर्थसहाय्य, छोटे किराणा दुकान, मिनी दालमिल साहित्य, घरगुती फळप्रक्रिया उद्योग, घरगुती मसाला उद्योग, पिठाची चक्की पुरविणे हे लाभ देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी त्यांचे परिपूर्ण अर्ज सर्व कागदपत्रांसह बालविकास प्रकल्प कार्यालयाकडे दि. 27 ऑक्टोबर 2022 पर्यंत सादर करावे, तसेच महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालकल्याण विभागाने केले आहे.

0000000

जिल्ह्यात दिवाळी सणानिमित्त पुणे येथून बस फेऱ्यांचे नियोजन

बुलडाणा, दि. 13 : परिवहन महामंडळातर्फे दिवाळी सणानिमित्त जिल्ह्यात पुणे येथून ज्यादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे येथून दि. 19 ते दि. 23 ऑक्टोबर दरम्यान बसेस सोडण्यात येणार आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाकडून पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड मैदान, खडकी पुणे येथून दि. 19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2022 या काळात सुटणाऱ्या जादा फेऱ्यांचे पुणे येथून आगाऊ आरक्षण ऑनलाईन रिझर्वेशन सिस्टीमद्वारे सुरु करण्यात आले आहे. प्रत्येक जादा फेरीचे मार्ग, वेळ यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुणे येथून ऑनलाईन रिझर्व्हेशन सिस्टीमकरीता उपलब्ध करुन दिले आहे. प्रवाशांनी www.msrtc.gov.in संकेतस्थळ किंवा  MSRTC RESERVATION या मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन बुकींग करता येईल.

बस मार्ग कॅन्टोनमेंट बोर्ड मैदान, खडकी ते बुलडाणा – मार्ग - अहमदनगर, औरंगाबाद, सिल्लोड, धाड, कॅन्टोनमेंट बोर्ड मैदान, खडकी ते चिखली - अहमदनगर, औरंगाबाद, जालना, देऊळगांव राजा.  कॅन्टोनमेंट बोर्ड मैदान, खडकी ते खामगाव, मार्ग- अहमदनगर, औरंगाबाद, जालना, चिखली. कॅन्टोनमेंट बोर्ड मैदान, खडकी ते मलकापूर मार्ग - अहमदनगर, औरंगाबाद, सिल्लोड, धाड. कॅन्टोनमेंट बोर्ड मैदान, खडकी ते जळगाव जामोद – मार्ग - अहमदनगर, औरंगाबाद, सिल्लोड, धाड. कॅन्टोनमेंट बोर्ड मैदान, खडकी ते शेगांव –मार्ग- अहमदनगर, औरंगाबाद, जालना, चिखली, खामगाव. कॅन्टोनमेंट बोर्ड मैदान, खडकी ते मेहकर- मार्ग अहमदनगर, औरंगाबाद,जालना, नाव्हा याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.

दिवाळी जादा 2022 कॅन्टोनमेंट बोर्ड मैदान, खडकी पुणे येथून नियोजनानुसार बुलडाणा करिता सुटणाऱ्या आगार निहाय जादा फेऱ्या पुढीलप्रमाणे आहेत. यात बुलडाणा आगार - कॅन्टोनमेंट बोर्ड मैदान, खडकी ते बुलडाणा सुटण्याची नियोजित वेळ 21.00, फेरी सुटण्याची नियोजित दि. 21.10.2022 ते 23.10.2022 मार्ग - सिल्लोड, धाड. चिखली आगार - कॅन्टोनमेंट बोर्ड मैदान, खडकी ते बुलडाणा ‘शिवशाही’ - सुटण्याची नियोजित वेळ 20.00 व 20.15. फेरी सुटण्याची नियोजित दि. 22.10.2022 व 23.10.2022 मार्ग - जालना, देऊळगावराजा. कॅन्टोनमेंट बोर्ड मैदान, खडकी ते चिखली सुटण्याची वेळ 20.45 दि. 21.10.2022 ते 23.10.2022, मार्ग -जालना, देऊळगावराजा याप्रमाणे राहणार आहे.

खामगांव आगार - कॅन्टोनमेंट बोर्ड मैदान, खडकी ते शेगाव- सुटण्याची नियाजित वेळ 20.30, फेरी सुटण्याची नियोजित दि. 21.10.2022 ते 23.10.2022, मार्ग चिखली, जालना. मेहकर आगार - कॅन्टोनमेंट बोर्ड मैदान, खडकी ते मेहकर – नियोजित वेळ 20.45 दि. 21.10.2022 ते 23.10.2022 मार्ग-जालना, नाव्हा, सिंदखेडराजा. मलकापूर आगार - कॅन्टोनमेंट बोर्ड मैदान, खडकी ते मलकापूर – नियोजित वेळ 20.15 दि. 19.10.2022 ते 23.10.2022, मार्ग – सिल्लोड, धाड . कॅन्टोनमेंट बोर्ड मैदान, खडकी ते मलकापूर ‘शिवशाही’ नियोजित वेळ 21.15 दि. 22.10.2022 मार्ग जालना, चिखली. जळगांव जामोद आगार- कॅन्टोनमेंट बोर्ड मैदान, खडकी ते जळगाव जामोद वेळ 19.45 दि. 19.10.2022 ते 23.10.2022, मार्ग – सिल्लोड, धाड. शेगांव आगार- कॅन्टोनमेंट बोर्ड मैदान, खडकी ते शेगांव वेळ 19.45 दि. 19.10.2022 ते 23.10.2022 मार्ग - जालना, चिखली याप्रमाणे बसेस सोडण्यात येणार आहे. प्रवाशी वर्दळ वाढल्यास अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहे, असे राज्य परिवहनचे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.

00000

रब्बी हंगामासाठी अनुदानावर बियाणे उपलब्ध

बुलडाणा, दि. 13 : कृषी विभाग आणि महाबीज यांच्यातर्फे कृषि उन्नती योजनेंतर्गत बियाणे आणि लागवड साहित्य ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमात हरभरा, गहू या पिकांचे बियाणे अनुदानावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांची याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यामध्ये सन २०२२-२३ अंतर्गत हरभरा १० वर्षावरील वाण ७ हजार ४५ क्विंटल व १० वर्षाआतील वाण ३ हजार ६०० क्विंटल याप्रमाणे एकूण १० हजार ६४५ क्विंटल हरभरा आणि गहू १० वर्षावरील वाण ८८१ क्विंटल आणि १० वर्षाआतील वाण ११९ क्विंटल, असे एकूण एक हजार क्विंटल बियाणे रब्बी हंगामामध्ये महाबीजच्या अधिकृत विक्रेत्यांमार्फत अनुदानावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ग्रामबिजोत्पादन योजनेंतर्गत हरभरा काबुली वाण सोडुन १० वर्षाआतील वाणाचे दर ४५ रूपये प्रती किलो आणि १० वर्षावरील वाणाचे ३० किलो पॅकिंगच्या बियाणेसाठी ५० रूपये प्रती किलो व २० किलो पॅकिंगच्या बियाण्यांसाठी ५१ रूपये प्रती किलो, तसेच गहू १० वर्षाआतील वाणासाठी २५ रूपये प्रति किलो व १० वर्षावरील वाणासाठी २७ रूपये प्रति किलोप्रमाणे महाबीज बियाण्यांचे अनुदानित दर आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज दि. २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत करावे लागणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून परमिट प्राप्त करून अनुदानित दराने बियाणे खरेदी करावे. योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे आणि महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक अशोक निकम यांनी केले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment