Thursday 17 February 2022

DIO BULDANA NEWS 17.2.2022

 कोरोना अलर्ट : प्राप्त 407 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 23 पॉझिटिव्ह

  • 192 रूग्णांना मिळाला डिस्जार्ज

बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 430 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 407 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 23 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 16 व रॅपिड चाचण्यांमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 160 तर रॅपिड टेस्टमधील 247 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 407 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  बुलडाणा शहर : 1, बुलडाणा तालुका : धाड 1, लोणार शहर : 2, लोणार तालुका : महारचिकना 1, कुंबेफळ 2, चोरपांग्रा 4, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, चिखली शहर : 8, चिखली तालुका : चंदनपूर 1, भालगांव 1,   मलकापूर शहर : यशोधाम 1,   अशाप्रकारे जिल्ह्यात 23 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 192 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 795977 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 97774 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 97774 आहे.  आज रोजी 1198 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 795977 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 98793 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 97774 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 333 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 686 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

******

पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेचे आयोजन

·        पाच प्रकारच्या स्पर्धा; प्रवेशिका स्वीकारण्याची मुदत 15 मार्चपर्यंत

       बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : सामूहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्त्व विषद करण्याकरिता भारत निवडणूक आयोगाने माझे मत माझे भविष्य  एका मताचे सामर्थ्य या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित मतदार जागृती स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्वीपद्वारे मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रमांतर्गत निवडणूक आयोग हा नेहमीच लोकांच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर करून लोकशाही बळकट करत असतो.

            भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागृती स्पर्धेचे आयोजन केले असूनयात एकूण पाच प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यात प्रश्नमजुंषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, गीत गाण्याची स्पर्धा, व्हिडिओ तयार करण्याची स्पर्धा आणि भित्तिचित्र स्पर्धेचा समावेश आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटासाठी असून स्पर्धेच्या प्रवेशिका 15 मार्च 2022 पर्यंत स्वीकारण्यात येतील.

            गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्रे स्पर्धेकरिता श्रेणी ठरविण्यात आली असूनसंस्थात्मक श्रेणीअंतर्गत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा राज्य किंवा केंद्र सरकारच्या नोंदणीकृत संस्थांना या संस्थात्मक श्रेणीमध्ये भाग घेता येईल. व्यावसायिक श्रेणीअंतर्गत ज्या व्यक्तिंचे उदरनिवार्हाचे मुख्य स्त्रोत गायन/ व्हिडिओ मेकिंग/भित्तीचित्र असा आहे, अशी व्यक्ती व्यावसायिक श्रेणीत गणली जाईल. हौशी श्रेणीअंतर्गत गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र हा छंद म्हणून करत असलेली व्यक्ती हौशी म्हणून गणण्यात येईल.

            गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्रे स्पर्धेकरिता तीन श्रेणीत वर्गीकरण करण्यात आले असून संस्थात्मक, व्यावसायिक आणि हौशी या श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना रोख पारितोषिके दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक श्रेणीला विशेष उल्लेखनीय रोख पारितोषिकेही दिली जाणार आहे. संस्थात्मक श्रेणीमध्ये 4 विशेष उल्लेखनीय तर व्यावसायिक आणि हौशी श्रेणीसाठी 3 विशेष उल्लेखनीय पारितोषिके देण्यात येणार आहे.

            गीत स्पर्धा : संस्थात्मक श्रेणी प्रथम पारितोषिक रूपये एक लाख, द्वितीय पारितोषिक रूपये 50 हजार, तृतीय पारितोषिक रूपये 30 हजार तसेच विशेष उल्लेखनीय 15 हजार रूपयेव्यावसायिक श्रेणीसाठी प्रथम पारितोषिक रूपये 50 हजार, द्वितीय पारितोषिक रूपये 30 हजार, तृतीय पारितोषिक रूपये 20 हजार तसेच विशेष उल्लेखनीय 10 हजार रूपयेहौशी श्रेणीसाठी प्रथम पारितोषिक रूपये 20 हजार, द्वितीय पारितोषिक रूपये 10 हजार, तृतीय पारितोषिक रूपये 7 हजार 500 तसेच विशेष उल्लेखनीय 3 हजार रूपये,

            व्हिडिओ मेकिंग स्पर्धा : संस्थात्मक श्रेणी प्रथम पारितोषिक रूपये दोन लाख, द्वितीय पारितोषिक रूपये एक लाख, तृतीय पारितोषिक रूपये 75 हजार तसेच विशेष उल्लेखनीय 30 हजार रूपयेव्यावसायिक श्रेणीसाठी प्रथम पारितोषिक रूपये 50 हजार, द्वितीय पारितोषिक रूपये 30 हजार, तृतीय पारितोषिक रूपये 20 हजार तसेच विशेष उल्लेखनीय 10 हजार रूपयेहौशी श्रेणीसाठी प्रथम पारितोषिक रूपये 30 हजार, द्वितीय पारितोषिक रूपये 20 हजार, तृतीय पारितोषिक रूपये 10 हजार तसेच विशेष उल्लेखनीय 5 हजार रूपये,

            भित्तिचित्र स्पर्धा : संस्थात्मक श्रेणी प्रथम पारितोषिक रूपये 50 हजार, द्वितीय पारितोषिक रूपये 30 हजार, तृतीय पारितोषिक रूपये 20 हजार तसेच विशेष उल्लेखनीय 10 हजार रूपयेव्यावसायिक श्रेणीसाठी प्रथम पारितोषिक रूपये 30 हजार, द्वितीय पारितोषिक रूपये 20 हजार, तृतीय पारितोषिक रूपये 10 हजार तसेच विशेष उल्लेखनीय 5 हजार रूपयेहौशी श्रेणीसाठी प्रथम पारितोषिक रूपये 20 हजार, द्वितीय पारितोषिक रूपये 10 हजार, तृतीय पारितोषिक रूपये 7 हजार 500 तसेच विशेष उल्लेखनीय 3 हजार रूपये,

            घोषवाक्य : स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक रूपये 20 हजार, द्वितीय पारितोषिक रूपये 10 हजार, तृतीय पारितोषिक रूपये 7 हजार पाचशे तसेच सहभागी होणाऱ्यापैकी 50 स्पर्धकांना प्रत्येकी 2 हजार रूपये उल्लेखीनय पुरस्कार म्हणून देण्यात येणार आहे.

            प्रश्नमंजुषा स्पर्धेकरिता भाग घेणाऱ्या विजेत्यांना भारतीय निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक वस्तू देण्यात येणार असून तीसरी पातळी पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना ई-प्रमाणपत्रे देण्यात येतील.

            या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच स्पर्धेचे नियम, अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेच्या http://ecisveep. nic.in/contest/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. त्याचप्रमाणे स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी सर्व प्रवेशिका दि. 15 मार्च 2022 पर्यंत voter-contest@eci.gov.in या ईमेलवर पाठवाव्यात तसेच ईमेल करताना स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा, असे उपजिल्हाधिकारी निवडणूक गौरी सावंत यांनी कळविले आहे.

                                                            *******

नेहरु युवा केंद्राव्दारा राष्ट्रीय युवा संसदचे आयोजन

* जिल्हास्तरीय युवा संसदसाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन

       बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरू युवा केंद्रा संगठन व्दारा तिसरा राष्ट्रीय युवा संसद उत्सव 2021-22  पुढील महिन्यात मार्च 2022 मध्ये  नवी दिल्ली येथे होणार आहे. युवांच्या नेतृत्व आणि वक्तृत्व गुणांना वाव देण्यासाठी नेहरू युवा केंद्रातर्फे राष्ट्रीय युवा संसद उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. या युवा संसद उत्सवात राष्ट्रीय स्तरावर विजयी होणाऱ्या स्पर्धकांना  अनुक्रमे प्रथम दोन लाख, व्दितीय दीड लाख आणि तृतीय एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.  

  जिल्हास्तरावर विजयी स्पर्धक राज्यस्तरावर व राज्यस्तरावरील विजयी स्पर्धक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरीता पात्र ठरणार आहे.  जिल्हयाच्या  जिल्हास्तरीय युवा संसद उत्सवाचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे.    या करीता पात्रता – स्पर्धकाचे वय  13 फेब्रुवारी रोजी 15 ते 29 वयोगट दरम्यान असावे. स्पर्धेकरीता वेळ 4 मिनिट असून इंक्रेडीबल इंडिया, आयुष्यमान भारत, बेटी बचाव, बेटी पढाव, स्किल इंडिया, डिजीटल इंडिया, स्वच्छ भारत- स्वस्थ भारत या पैकी एका विषयांवर चार मिनिटात आपले वक्तृत्व  ऑनलाईन पध्दतीने सादर करता येणार आहे.

   वक्तृत्व स्पर्धेची भाषा हिंदी, इंग्रजी व मराठी आहे. जिल्हास्तरीय युवा संसदेसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत 21 फेब्रुवारी आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी फोटो आणि वयाच्या पुराव्यासह विहित नमून्यातील अर्ज नेहरू युवा केंद्र, बुलडाणा, फ्लॅट क्रमां 202, डीएसडी सीटी मॉल, बुलडाणा कार्यालयात सादर करावे. तसेच https://drive.google.com/ file/d/1wtIVo_-mtYXYIaVcDBHke5s0NLM4Q g0l/view?usp=sharing लिंकवर विहित नमून्यातील अर्ज  मिळेल. तरी युवक-युवतींनी  राष्ट्रीय युवा संसद उत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नेहरु युवा केंद्र बुलडाणाचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.

                                                                        ******

औद्योगिक आवेदनपत्रधारक घटकांनी डेटा अपडेट करावा

            बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने  25 मार्च 2021 पासून आयईएम अर्ज भरण्यासाठी एक सुधारित जी 2 बी पोर्टल (http://services.dipp.gov.in/lms) सुरू केले आहे. एका आयईएम कंपनी, व्यावसायिक घटकाच्या नावे त्याच्या युनिटच्या स्थानाचा विचार न करता केवळ एकच आयईएम जारी केला जात आहे. या करीता अर्जदारांना पोर्टलवर लॉग इन करून त्यांच्या आयईएम संदर्भात डेटा अपडेट अथवा पुनर्प्रमाणित करण्यासाठी   दि.15.07.2021 पासून जी 2 बी पोर्टलमध्ये एक वेगळी विंडो प्रदान करण्यात आली आहे. अर्जदारांना ऑनलाईन प्रक्रियेत मार्गदर्शन करण्यासाठी वापरकर्ता मॅन्युअल आणि व्हिडिओ ट्यूटोरियल जी 2 बी पोर्टलवर उपलब्ध करून दिले आहेत.

            जरी संबंधित आयईएम (औद्योगिक आवेदनपत्र धारक) घटकामध्ये कोणताही बदल नसला तरीही सर्व आयईएम धारकांना नव्याने उपलब्ध करुन दिलेल्या पोर्टलवर पुन्हश्च अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या करीता कोणतेही शुल्क आकरले जाणार नाही. सर्व अर्जदारांना आवश्यक तेथे आधारभूत कागदपत्रे जोडावी लागणार असून अशा सर्व अर्जांची पुन्हश्च पडताळणी करताना अर्जदारांना एक क्यु.आर.कोड आधारीत पोचपावती दिली जाणार असल्याचे नमूद केले आहे.

           जिल्हयातील सर्व उद्योग घटक, औद्योगिक संघटना, आय.ई.एम.धारक यांचे पर्यंत याबाबतची माहिती पोहचण्या करीता स्थानिक पातळीवर जनजागृती होणे आवश्यक आहे तसेच प्रत्यक्षात उत्पादनात गेलेल्या उद्योग घटकांकडून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर संपर्क साधून त्वरीत IEM पार्ट ‘बी’ भरुन घेणे आवश्यक आहे. उत्पादनापुर्वीच्या इतर टप्प्यातील IEM धारक उपक्रमांनी नव्या संकेतस्थळावर पार्ट ‘A’ बाबतची नोंदणी करावी, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांनी केले आहे.

                                                                        *********

बाल न्याय मंडळाच्या फिरत्या बैठकीचे लोणार येथे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील अधिकारान्वये बाल न्याय मंडळाच्या फिरत्या, तात्पुरत्या बैठकीचे आयोजन 18 फेब्रुवारी 2022 रोजी आशा बालकाश्रम, हिरडव रोड लोणार येथे करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील नियम 6 पोटनियम 1 मधील प्रावधानानुसार विषयांवर चर्चा करण्यात येईल. तरी नागरिकांनी बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन बाल न्याय मंडळाचे प्रमुख न्यायदंडाधिकारी अमोलकुमार देशपांडे यांनी प्रसिद्धीर पत्रकान्वये केले आहे.

                                                                        ********

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयाचे स्थलांतरण

बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : बांधकाम कामगारांच्या कल्याणाकरीता शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडाळाअंतर्गत 90 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेल्या बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण करण्यात येते. यानंतर नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रदान करण्यात येतो. यासाठी जिल्ह्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाचे कार्यालय, सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, हॉल क्रं 4 अ, बस स्थानकासमोर, बुलडाणा येथे सुरू होते. मात्र मंडळाकरीता जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

    सदर कार्यालय पद्माकर पाटील यांचे घर, प्लॉट क्रमांक 156, रामनगर, चिंचोले चौक, बुलडाणा येथे सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 8263056533 आहे. तरी सर्व बांधकाम कामगारांनी मंडळाशी संबंधित कामकाजासाठी पद्माकर पाटील यांचे घर, प्लॉट क्रमांक 156, रामनगर, चिंचोले चौक, बुलडाणा या कार्यालयाशी संपर्क साधून आपले कामकाज करून घ्यावे, असे आवाहन उपकार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, तथा सरकारी कामगार अधिकारी, बुलडाणा यांनी केले आहे.  

                                                                                                ******

No comments:

Post a Comment