Monday 14 February 2022

DIO BULDANA NEWS 14.2.2022

 कोरोना अलर्ट : प्राप्त 211 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 31 पॉझिटिव्ह

  • 106 रूग्णांना मिळाला डिस्जार्ज

बुलडाणा, (जिमाका) दि. 14 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 242 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 211 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 31 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 31 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 175 तर रॅपिड टेस्टमधील 36 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 211 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मेहकर शहर : 3, बुलडाणा तालुका : गुम्मी 1, मातला 1, हतेडी 1, रायपूर 1, माळवंडी 2, बुलडाणा शहर : 6, शेगांव शहर : 1, शेगांव तालुका : गायगांव 1, टाकळी विरो 9, दे. राजा शहर : 1,  खामगांव तालुका : नायदेवी 1, खामगांव शहर : 2, नांदुरा तालुका : निमगांव 1,   अशाप्रकारे जिल्ह्यात 31 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 106 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.त्याचप्रमाणे उपचारादरम्यान डोंगरखंडाळा ता. बुलडाणा येथील 78 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 794668 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 97429 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 97429 आहे.  आज रोजी 1388 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 794668 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 98671 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 97429 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 556 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 686 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

******


दुसरा डोसला पात्र असलेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष मोहिम राबवा

-          पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • कोविड संसर्ग नियंत्रण बैठक
  • गृहभेटी घेवून पहिला डोस न घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करून घ्यावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 14 : कोविडचे बाधीत रूग्णांची संख्या ओसरत आहे. मात्र तरीही भविष्यात कोविड 19 चे नवीन व्हेरीएंट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसला पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी दुसरा डोस घ्यावा. दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

   जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी सूचना देताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रावण दत्त, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.

   जिल्ह्यातील पहिला डोसचे लसीकरण न झालेल्या लाभार्थ्यांना लसीकरण करून घेण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, त्यासाठी गृहभेटी घेण्यात याव्या. गृहभेटीअंती पहिलाही डोस न घेतलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे. तसेच 15 ते 18 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण पूर्ण करून घ्यावे.  लसीकरणाचे महत्व सांगून त्याविषयी जनजागृती करण्यात यावी.

  ते पुढे म्हणाले, आरोग्य यंत्रणांनी जिल्ह्याचा सर्वंकष आरोग्य आराखडा तयार करावा. तसेच नाविण्यपूर्ण योजनांमधून जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्यात यावे. त्याप्रमाणे कामे प्रस्तावित करण्यात यावी.  त्याचप्रमाणे शासनाच्या प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे 100 टक्के लसीकरण करण्यात यावे. प्रिकॉशनरी डोससाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना प्रिकॉशनरी डोस देण्यात यावा.  बैठकीला संबंधित यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

                                                                                    **********

            कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेवू नये

  • कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 14 : जिल्ह्यात खरीप हंगाम सन 2021-22 मध्ये कापूस पिकाचे लागवडीखालील क्षेत्र 1.98 लाख हेक्टर एवढे क्षेत्र आहे. या पिकावरील गुलाबी बोंडअळी किडीचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. अन्यथा आगामी काळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान संभवते. गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणाच्यादृष्टीने एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असून कापूस उत्पादनाशी निगडीत सर्व यंत्रणांनी सामुहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

  कापूस पिकाची फरदड अथवा खोडवा शेतकरी बांधवांनी घेवू नये. कापूस पिकाची फरदड घेतल्यास किंवा कापूस पिकाचा हंगाम वाढविल्यास शेंदरी बोंडअळीसाठी नियमित खाद्य उपलब्ध होवून किडीचे जीवनचक्र सतत पुढे चालू राहते. फरदडीपासून थोडेफार उत्पन्न मिळत असले, तरी या किडीचा पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड न घेता पऱ्हाट्या श्रेडर अथवा रोटाव्हेटर यासारख्या यंत्राद्वारे जमिनीत गाडाव्यात त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढण्यास तसेच शेंदरी बोंडअळीचे जीवनचक्र खंडीत होण्यास मदत होते.  

    सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणी कापूस पिकानंतर चारापिकाची फेरपालट करावी. त्यामुळे कापूस पिकाच्या उपलब्धतेअभावी शेंदरी बोंडअळीच्या पुढील पिढ्या मर्यादीत राहतील. कारण ही कीड केवळ कापूस पिकावरच उपजिविका करते. सध्या वेचणी झालेला कापूस मार्केटयार्ड, जिनिंग-प्रेसिंग मिलमध्ये यत आहे. त्या ठिकाणीही शेंदरी बोंडअळी व्यवस्थापनाची कार्यवाही होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कापूस खरेदी केंद्र, गोडावून, जिनींग /प्रेसिंग मिल्स यांनी त्यांच्या परीसरात कापसापासून निर्माण झालेला कचरा, सरकीतील अळ्या व कोष नष्ट करावे. तसेच त्याठिकाणी प्रकाश सापळे, कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावून त्यात अडकलेले पतंग नियमित गोळा करून नष्ट करावेत. शेतकरी स्तरावर साठवणूकीच्या ठिकाणी फेरोमन सापळे व प्रकाश सापळ्यांचा वापर करण्यात यावा.

 पीक काढणीनंतर खोल नांगरट हिवाळ्यातच करावी. त्यामुळे जमिनीवर आलेल्या किडीचे कोष तसेच इतर अवस्था नष्ट होतील. शक्यतो दिवसा नांगरट केल्यास किडीचे नैसर्गिक शत्रू चिमण्या, कावळे, बगळे याद्वारे नियंत्रण होते. पऱ्हाटया शेतातून काढल्यानंतर त्यांची साठवणुक न करता त्या इंधन ब्रिकेटस तयार करणाऱ्या कारखान्यांना द्याव्यात.   कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी वरील प्रमाणे उपाय योजना करुन पुढील हंगामात शेंदरी बोंड अळीवर नियंत्रण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

                                                            ***********

जात प्रमाणपत्र अर्जातील त्रृटींची पूर्तता करावी

  • जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 14 : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव त्रृटींच्या पुर्ततेविना प्रलंबित आहे. अर्जदारांना नोंदणी केलेल्या भ्रमणधनी क्रमांकावर लघुसंदेश व नोंदणी केलेल्या ई मेल आयडीवर त्रृटी कळविण्यात आली आहे. तरी सुद्धा अर्जदारांनी त्रुटींची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे बरेच प्रस्ताव प्रलंबित आहे. प्रलंबित प्रकरणे विचारात घेता ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेल्या अर्जदारांना त्रृटी पुर्तता, कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी 23 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. अर्जदाराने 23 फेब्रुवारी 2022 पर्यंत कागदपत्रांची पुर्तता न केल्यास त्यांच्या प्रकरणांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. तरी जात प्रमाणपत्र पडतळणीसाठी अर्ज सादर केलेल्या अर्जदारांनी त्रृटीचे संदेश, पत्रे प्राप्त होऊनही त्रृटींची पूर्तता केलेली नाही, अशा अर्जदारांनी 23 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्रृटींची पूर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय साळवे यांनी केले आहे.

                                                                ****

--

No comments:

Post a Comment