Tuesday 1 February 2022

DIO BULDANA NEWS 1.2.2022

 माजी सैनिकांना शेत रस्ते, जमीन विषयक समस्या असल्यास तक्रार नोंदवावी

       बुलडाणा,(जिमाका) दि. 1 :  जिल्हयातील माजी सैनिक, सैनिक विधवा व अवलंबित यांना महसूल संबंधित तसेच शेत रस्ता व जमीन विषयी काही तक्रारी /समस्या असल्यास 7 फेब्रुवारी 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे येवून तक्रार नोंदविण्यात यावी. तसेच कागदपत्रांची पुर्तता करावी. जेणेकरुन योग्य अशी कार्यवाही करता येईल, असे आवाहन सहा.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर निंबाजी पडघान यांनी केले आहे.

*****

              तांडा वस्ती सुधार व मुक्त वसाहत योजनांच्या जिल्हास्तरीय समितीसाठी प्रस्ताव आमंत्रित

  • 15 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करावे

बुलडाणा,(जिमाका) दि. 1: महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास, बहुजन कल्याण विभागामार्फत वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येते. या योजनांकरीता विभागाच्या शासन निर्णय 27 सप्टेंबर 2021 नुसार जिल्हस्तरीय समिती स्थापन करावयाची आहे.

     त्यासाठी सदर समितीच्या अध्यक्ष व सदस्य पदाकरिता प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहेत. प्रस्तृत समितीच्या अध्यक्ष पदाकरिता जिल्हयातील बंजारा समाजातील व्यक्ती, भटक्या जमाती प्रवर्गातील एक व्यक्ती आणि विमुक्त जाती,  भटक्या जमाती प्रवर्गातील एक महिला सदस्य यांचे कडून दिनांक 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहेत.

      सदर समिती अध्यक्ष पदाकरिता व सदस्य पदाकरिता प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.  

*****

कामगार कल्याण केंद्रातर्फे आर्थिक बचतबाबत मार्गदर्शन शिबिर

बुलडाणा,(जिमाका) दि. 1 : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गट कार्यालय अकोलांतर्गत कामगार कल्याण केंद्र, बुलडाणा यांच्या वतीने चोपडा मोटर्स, बुलडाणा येथे दिनांक 31 जानेवारी 2022 रोजी प्रशासकीय गतिमानता अभियानातंर्गत आर्थिक बचतीबाबत मार्गदर्शन शिबीराचे अयोजन करण्यात आले.

    या शिबीराच्या अध्यक्षस्थानी चोपडा मोटर्सचे घनश्याम चोपडा  होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अभिजित चोपडा, श्रूती भडेच उपस्थित होत्या. या शिबिरात आर्थिक बचती बाबत  चार्टड अकाऊंटंट श्रीमती अंकिता गौरव भडेच, व्यवस्थापक दिपक चंदन यांनी आर्थिक बचत करून कुटूंबियांच्या गरता भागविताना त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्यादृष्टीने कशी बचत करावी या विषयावर व आर्थिक बचतीचे फायदे या विषयावर मार्गदर्शन केले. श्री. चोपडा यांनी कामगारांनी आपल्या कुटूंबियांच्या गरजा लक्षात घेवून खर्चाचे प्रमाण निश्चित करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला कामगार कल्याण केंद्राचे संचालक नंदकिशोर खत्री उपस्थित होते. संचलन सौ विद्या शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन निलेश प्र. देशमुख यांनी केले.

                                                                        ******

 गुणवंत कामगार पुरस्कारासाठी अर्ज करावे

  • कामगार कल्याण मंडळाचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि. 1 : विविध आस्थापनांमध्ये मिळून किमान 5 वर्ष सेवा झालेल्या आणि सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांनी गुणवतं कामगार पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन कामगार अल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे. कामगार कल्याण मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळावर तसेच कामगार केंद्रामध्ये या पुरस्कारासाठी अर्ज उपलब्ध आहे. गुणवतं कामगार पुरस्काराने 51 कामगारांना गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रूपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाल्याच्या 10 वर्षानंतर कामगार भूषण पुरस्कारासाठी अर्ज करता येतो. एका कामगाराची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार असून 50 हजार रूपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

      मंडळाचा लीन नंबर लेबर आयडेंटीटी नंबर असलेल्या कामगारांना www.public.mlwb.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याची व शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे .ऑनलाईन नोंदणी प्रिंट व शुल्क भरल्याची पावती अर्जदारास मंडळाच्या संबंधित कामगार कल्याण केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन सादर करावयाची आहे. त्याआधारे अर्जदारास संबंधित केंद्रातून अर्जाचा नमुना मोफत दिला जाईल. सदर अर्ज आवश्यक कागदपत्रांसह मंडळाच्या मुंबईस्थित मध्यवर्ती कार्यालयास 28 फेब्रुवारी पर्यंत हस्तपोच / टपालाद्वारे सादर करावयाचा आहे. तसेच आर्थिक अडचणीमुळे मागील 3 वर्षात बंद पडलेल्या आस्थापनांतील कामगारांना संबंधित केंद्रात ऑफलाईन पद्धतीने मंडळाच्या नियमानुसार अर्ज सादर करता येणार आहे, असे केंद्र संचालक, कामगार कल्याण केंद्र, बुलडाणा यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment