Tuesday 15 February 2022

DIO BULDANA NEWS 15.2.2022

 कोरोना अलर्ट : प्राप्त 386 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 72 पॉझिटिव्ह

  • 52 रूग्णांना मिळाला डिस्जार्ज

बुलडाणा, (जिमाका) दि. 15 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणीद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 458 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 386 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 72 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 66 व रॅपिड चाचण्यांमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 72 तर रॅपिड टेस्टमधील 314 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 386 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  चिखली शहर : 56, चिखली तालुका : येवता 1,  सिं. राजा शहर : 1, सिं. राजा तालुका : शिंदी 1,  बुलडाणा शहर : 6, बुलडाणा तालुका : शेकापूर 1, येळगांव 1, सागवन 1, दे. राजा तालुका : वाघजई 1, लोणार तालुका : वढव 1, पिंप्री खंडारे 1, मलकापूर शहर : 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 31 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 52 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 795054 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 97481 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 97481 आहे.  आज रोजी 1371 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 795054 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 98743 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 97481 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 576 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 686 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

******

दिव्यांग व्यक्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांनी महाशरद पोर्टलवर नोंदणी करावी

  • जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 14 : जिल्हयातील दिव्यांग व्यक्ती व विद्यार्थ्यांसाठी शासनाने महाशरद पोर्टल सुरु केले आहे. दिव्यांग व्यक्ती या पोर्टलव्दारे शासनातर्फे सहाय्य उपलब्ध होण्यासाठी नोंदणी करुन आवश्यक ती मदत मिळवू शकतात. सदर पोर्टल दिव्यांग व्यक्ती, सामाजिक दानशुर व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या, अशासकीय संघटनांना जोडणारा दुवा आहे. या पोर्टलद्वारे द्विव्यांग व्यक्तींना मदतीसाठी व्यासपीठ मिळवुन दिले जाते. यामध्ये सर्व प्रकारचे दिव्यांग व्यक्ती या पोर्टलवर आपले नाव नोंदवु शकतात.

    दिव्यांग व्यक्ती आणि त्यांना देणगी देऊ इच्छिणाऱ्या वर्गणीदारांना एकत्र आणून वर्गणीदारांचे सहकार्य या पोर्टलद्वारे मिळविण्यात येत आहे. पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांगांना महाराष्ट्र राज्य  दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची माहिती, तसेच विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगांची परिस्थिती आणि गरजा समजुन घेऊन दिव्यांग व्यक्ती, अशासकीय संघटना, समाज सेवक आणि वर्गणीदारांना एकाच छताखातील आणण्यात येत आहे. त्याकरिता www.mahasharad.in  या संकेत स्थळावर दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी, सामाजिक संस्था, देणगीदार कंपन्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी केला आहे.

************

                             


मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवावी

-          दिनेश गिते

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 15 : केंद्र शासनाच्या विशेष मिशन इंद्रधनुष्य 4.0 उपक्रमातंर्गत जिल्ह्यात पूर्ण लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात 0 ते 2 वर्ष वयोगटातील सर्व लाभार्थी व गर्भवती महिलांचे लसीकरण पूर्ण करावे. या इंद्रधनुष्य उपक्रमातंर्गत लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात यावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिल्या आहेत.

  जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात लसीकरण मोहिम राबविण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. खिरोडकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चौधरी आदी उपस्थित होते.

  मिशन इंद्रधनुष्य लसीकरणाचे वेळापत्रकानुसार लसीकरण करण्याचे सूचीत करीत निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गिते म्हणाले, लसीकरण मोहिमेत पहिल्या महिन्यात 7 मार्च 2022, दुसऱ्या महिन्यात 4 एप्रिल 2022 व तिसऱ्या महिन्यात 9 मे 2022 रोजी लसीकरण करण्यात येणार आहे. अतिदुर्गम भाग, स्थलांतरीत होणाऱ्या झोपडपट्ट्या आदींमध्ये जावून लसीकरण करावे.  बैठकीला संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

                                                                        ******

 

पॅनल वकिलांनी नेहमी कायद्याबाबत अद्यावत रहावे

-          साजिद आरिफ सैय्यद

बुलडाणा, (जिमाका) दि‍. 15 : प्रत्येक वर्षी जिल्हा निधी सेवा प्राधिकरणमार्फत पॅनल विकालांची यादी तयार करण्यात येते. त्या सर्वांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत विधीज्ञ म्हणुन, शिबीराचा वक्ता म्हणुन, तुरुंग भेट आणि बाल न्याय मंडळ भेट इत्यादी कामे देण्यात येतात. पक्षकरांमध्ये चुकीचा समज असा आहे जिल्हा विधी सेवा मार्फत जे मोफत विधीज्ञ म्हणुन काम करतात ते नवीन कायदे,निकालाचे संदर्भ आणि त्यातील दुरुस्ती याबाबत अद्यावत नसतात. त्यामुळे पॅनलवरीन वकीलांनी नेहमी कायद्याबाबत अद्ययावत राहायला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर साजिद आरिफ सैय्यद यांनी केले.

   जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण स्वप्निल चं खटी यांच्या मार्गदर्शनाखाली 10 फेब्रुवारी रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा येथील हॉलमध्ये पॅनल वकिलांचे प्रशिक्षण व विविध कायद्यांवर विधी साक्षरता शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा वकील संघाचे सचिव ॲड अमर इंगळे होते.

            ते पुढे म्हणाले, आपल्या कडील पॅनल विधीज्ञ हे अनुभवी असून प्रत्येक कायदयाच्या बाबतीत ते अद्ययावत आहेत. पॅनल विधीज्ञ म्हणुन काम करतांना उच्च आणि सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाच्या संदर्भा बद्दल सुध्दा अद्ययावत रहावे. त्यामुळे पक्षकरांना सुध्दा आपल्या बद्दल अभिमान वाटेल. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा मार्फत मोफत विधीज्ञ म्हणून ज्या वकिलांची नियुक्ती होते. त्यांना शसनामार्फत मानधन/मोबदला याबाबतही प्रत्येकाला माहिती असावी. सदर कार्यक्रमात प्रमोद टाले यांनी माहिती अधिकार कायदा, सेवा हमी कायदा, ट्रान्सजेंडर लिगल प्रॉब्लम अँड सोल्युशन देआरऑन या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच ॲड विक्रांत मारोडकर यांनी क्लेम ट्रीब्युनल ॲग्रीड प्रोसेजर या विषयावर माहिती दिली. ॲड धिरजकुमार गोठी यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा या विषयावर उदाहरणे देवून मार्गदर्शन केले. संचलन ॲड सुभाष मानकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत देशमुख, आकाश अवचार, अमोल लहाने, डी.सी तोमर यांनी प्रयत्न केले.  

                                                            *******


कृषिमाल प्रक्रिया, मूल्यावर्धन आणि व्यवसाय निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ

बुलडाणा, (जिमाका) दि‍. 15 :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्राच्या  गृहविज्ञान विभागाद्वारे कृषिमाल प्रक्रिया, मूल्यावर्धन आणि व्यवसाय निर्मिती या विषयावरील दिनांक 14 ते 18 फेब्रुवारी या दरम्यानच्या पाच दिवसीय व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला.

   गृहविज्ञान विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक स्नेहलता भागवत यांनी यावेळी कृषिमाल प्रक्रिया, मूल्यावर्धन आणि व्यवसाय निर्मिती काळाची गरज असल्याचे सांगितले. तसेच भरडधान्य, डाळी व कडधान्ये, तेलबिया यांचे आहारातील महत्व व त्यात असणा-या पोषणतत्वा बद्दलची माहिती प्रशिक्षणार्थींना दिली.  भरडधान्य, डाळी व कडधान्ये, तेलबिया यांच्यावर करण्यात येणारी प्रक्रिया व  त्यापासून विविध मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती याविषयीसुद्धा मार्गदर्शन केले. तसेच भरडधान्य, डाळी व कडधान्ये, तेलबिया प्रक्रिया व मूल्यवर्धन व्यवसायास असणारा वाव समजावून सांगितला. यावेळी प्रात्याक्षिकही घेण्यात आले. प्रत्याक्षिकामध्ये सोयाबीन पासून  सोया पीठ, सोया दूध, सोया पनीर, सोया दही, सोया नट, सोया खरमुरे, सोया पापड तसेच सोया ओकरा पासून शिरा व उपमा व इतर अनेक मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती करून दाखविण्यात आली.

    तसेच दुपारच्या सत्रात तेजस्वी पापड उद्योग, चिखली रोड, बुलडाणा या पापड, शेवया गृह उद्योगास भेट देण्यात आली. तेजस्वी पापड उद्योगाच्या उद्योजिका सौ. कविता गारोळे व अरुण गारोळे यांनी पापड व शेवया निर्मितीसाठी लागणा-या मशिनरी बद्दल माहिती देऊन उडिदाचे व विविध चवीचे तांदुळाचे पापड, शेवया स्वयंचलित मशिनद्वारे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच पापड व शेवया उद्योगातील अर्थशास्त्र समजावून सांगितले. सदर पाच दिवसीय व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी बुलडाणा, चिखली, संग्रामपूर, खामगाव, मेहकर तालुक्यातील ग्रामीण युवक व उमेद अंतर्गत महिला बचत गटातील महिलांनी सहभाग घेतला.

                                                            *******

जिल्हाधिकारी कार्यालयात

संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

 बुलडाणा,(जिमाका) दि. 15 :  समाजात सुधारणा व परिवर्तन घडवून आणण्यासाठी अविरत कार्य करणारे संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गितेंसह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

                                                                                                *******

 


No comments:

Post a Comment