Tuesday 14 December 2021

DIO BULDANA NEWS 14.12.2021

 पर्यटन सुलभ मार्गदर्शक (गाईड) प्रशिक्षणासाठी

31 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावे

बुलडाणा,(जिमाका) दि.14 : स्थानिक प्रसिध्‌द पर्यटन स्थळी पर्यटकांसाठी टूर गाईडची व्यवस्था करुन, या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने बुलडाणा जिल्ह्यातील  लोणार सरोवर व लोणार अभयारण्य या पर्यटन स्थळी सुलभ मार्गदर्शक (ट्रॅव्हल गाईड) प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  सुलभ मार्गदर्शक प्रशिक्षण उपक्रमाच्या अंतर्गत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम व ट्रॅव्हल मॅनेजमेंट (Indian Institute of Tourism and Travel Management), ग्वालियर तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ज्ञ प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करतील. ज्यात स्थानिक पर्यटनाची माहिती, नियम व सुरक्षा उपाययोजना पाळून पर्यटकांचा अनुभव परिपूर्ण कसा करावा तसेच पर्यटकांशी संवाद साधताना आपल्याकडील माहिती गोष्टीरूपाने कशी मांडावी याविषयी सविस्तर प्रशिक्षण दिले जाईल. १८ वर्षे वयापुढील इच्छुक अर्ज सादर करु शकतील. ४० वर्षाच्या आतील वय असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी किमान बारावी व 40 वर्षावरील वय असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी  दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यत अर्जदारांनी आपले अर्ज पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर सादर करावे.

प्रशिक्षणाअंतर्गत स्थानिक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी तज्ञ प्रशिक्षक प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन करतील. पाच दिवसांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यावर प्रशिक्षणार्थीना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे प्रमाणपत्र व पुढे टूर गाईड म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येईल.

आपल्या फिरस्तीची आवड एका स्थिर करिअरमध्ये बदलण्यासाठी सुलभ मार्गदर्शक प्रशिक्षण उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या https://www.maharashtratourism.gov.in/web/mh-tourism/certified-guide-training या संकेतस्थळा वर ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी अर्ज करावे. अधिक माहिती www.maharashtratourism.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक (पर्यटन) विवेकांनद काळकर, अमरावती यांनी कळविले आहे.

*******

जागृती ॲग्रो फुड्स इंडिया कंपनीने फसवणूक केली असल्यास संपर्क साधावा

• आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि. 14 : जागृती ॲग्रो फुड्स इंडिया प्रा.लि. मार्केट यार्ड, चेंबर भवन, सांगली या कंपनीने गुंतवणूकीवरील परताव्याचे पैसे परत न करता विश्वासघात करून फसवणूक केली आहे. अशी फिर्याद 16.9.2015 रोजी बुलडाणा शहर पोलीस स्टेशन येथे दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी राज गणपत गायकवाड व इतर 10 आरोपीविरूद्ध कलम 420, 406, 34 भादंवि सह कलम 3, 4 महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापनामधील) हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत अधिनियम 1999 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

   कंपनीकडे 5000 रूपये जमा केल्यास कंपनी एक शेळी खरेदी करणार होती. शेळी 7 महिन्यामध्ये एकवेळ 2 पिल्लांना जन्म देणार देते. एक शेळी 14 महिन्यात 4 पिल्लांना जन्म देते, तसेच 14 महिन्यात एक पिल्लू किंवा 4 हजार रूपये  ग्राहकाला परतावा म्हणून देणार व शेळीची रक्कम कंपनीकडे तशीच जमा राहणार. दरवर्षी शेळीचा घसारा 20 टक्के अर्थात 1 हजार रूपये कपात होणार, परतावामध्ये 14 महिन्यांची एक टर्म धरण्यात आली होती. तसेच 5 टर्म पूर्ण केल्यानंतर व दरवर्षी परतावा परत न घेतल्यास कंपनीकडे ग्राहकाने विश्वास दाखविला म्हणून एकदम 10 शेळीचे पिल्ले परत करणार व रोख रक्कम हवी असल्यास त्या 10 पिल्लांचा दर प्रत्येकी 5 हजार रूपये गृहीत धरण्यात येईल, असे एकूण 50 हजार रूपये ग्राहकास देण्यात येतील. अशी कंपनीची परतावा पॉलीसी होती.      

    तरी राज गणपत गायकवाड व इतर 10 आरोपींनी अन्य जनतेची देखील अशा प्रकारची फसवणूक केल्याची शक्यता आहे. अशा प्रकारची फसवणूक झालेले आणखी जिल्ह्यातील काही व्यक्ती असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा येथे संपर्क साधावा किंवा स्वत: आपला जबाब नोंदविणे कामी आपल्याजवळ असलेल्या मूळ कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, भारत शाळेचे समोर, पोलीस स्टेशन, बुलडाणा शहरचे आवार, बुलडाणा येथे उपस्थित रहावे किंवा मोबाईल क्रमांक 9823327105 व 07262-245989 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अलका निकाळजे आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांनी केले आहे.

                                                            **********

शेगांव तालुक्यात अवैध वाळू उत्खनन नियंत्रणासाठी पथकाची स्थापना

बुलडाणा,(जिमाका) दि. 14 : शेगांव तालुक्यात येत असलेल्या पुर्णा, मन, बोर्डी या नदीपात्रातील वाळू घाटांचे प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयास सादर केलेले आहे. तालुक्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रणासाठी तहसिलदार, शेगांव यांनी नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांचे अधिनस्थ 24 तासाठी फिरते व बैठे पथक स्थापन केलेले आहे. तसेच वाळूघाट असलेल्या प्रत्येक गावासाठी गावचे सरपंच, सचिव, तलाठी, कोतवाल यांचे अधिनस्थ ग्रामदक्षता समिती नियुक्त करून त्यांना अवैध वाळू वाहतुकीस आळा घालण्याबाबत निर्देशीत केले आहे, असे तहसिलदार, शेगांव यांनी कळविले आहे.

                                                                                    *******

जिल्ह्यात 16 लक्ष 14 हजार 318 लाभार्थ्यांचा लसीचा पहिला डोस पूर्ण

बुलडाणा, (जिमाका) दि. 14 : जिल्ह्यात 100 टक्के लसीकरणासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यानुसार 13 डिसेंबर पर्यंत जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत लसीचा पहिला डोस घेतलेल्या एकूण उद्दीष्ट असलेल्या 21,04,902 पैकी 16,14,318 लाभार्थ्यांचे लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. त्याची टक्केवारी 76.69 टक्के आहे. जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पहिला डोस घेतलेल्या 50 ते 75 टक्के डोस घेतलेले लाभार्थी संख्या असलेले प्रा. आ केंद्र 41 आहे. तसेच 75 ते 100 टक्के पहिला डोस घेतलेले लाभार्थी केंद्र 11 आहे.  जिल्हा प्रशासन लसीकरण पुर्ण होण्याकरीता सातत्याने प्रयत्न करीत आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                                    ******

खरीप पणन हंगाम सुरू; 14 खरेदी केंद्रांना मान्यता

· ज्वारी, मका व बाजरीची आधारभूत किंमतीने खरेदी

बुलडाणा, (जिमाका) दि. 14: खरीप पणन हंगाम 2021-22 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत जिल्ह्यात 14 खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रांवर ज्वारी, मका व बाजरीची किमान आधारभूत किंमतीला खरेदी करण्यात येत आहे. सदर खरेदी केंद्र मार्केटींग फेडरेशनच्यावतीने चालविण्यात येत आहे. ही खरेदी केंद्र बुलडाणा, मेहकर, लोणार, दे. राजा, शेगांव, संग्रामपूर, जळगांव जामोद, वाडी ता. नांदुरा, मोताळा, साखरखेर्डा, सिं. राजा,   मलकापूर, खामगांव, लोणार, चिखली येथे आहेत. हमी दराने प्रति क्विंटल मका 1870 रूपये, ज्वारी संकरीत 2738 रूपये, ज्वारी मालदांडी 2758 रूपये, बाजरी 2250 रूपये व रागी 3377 रूपये प्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे.   तरी ज्या शेतकऱ्यांना एसएमएस प्राप्त झाले आहेत अशा नोंदणीकृत शेतकरी बांधवांनी खरेदी केंद्रावर शेतमाल विक्रीस आणावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस शिंगणे यांनी केले आहे.

   खरेदी केंद्र व चालविणाऱ्या सब एजन्ट संस्था : बुलडाणा- तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती, मेहकर - तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती, लोणार- तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती, दे.राजा : तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती,शेगांव : तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती, संग्रामपूर : तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती, जळगांव जामोद : तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती, मलकापूर: तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती, खामगांव : तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती, मोताळा: संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, सिं. राजा : माँ जिजाऊ कृषि विकास फार्मर प्रोड्युसर कंपनी नारायणखेड, चिखली : स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था मर्या. आणि साखरखेर्डा : सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सुलतानपूर.

                                                                                                ******

 

 

 

जिल्ह्यात मुख कर्करोगावरील दुसरी शस्त्रक्रीया यशस्वी..

  • महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत झाले उपचार

बुलडाणा, (जिमाका) दि. 14: जिल्ह्यासाठी आरोग्य क्षेत्रातून गौरवास्पद बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. मुख कर्करोगावरील दुसरी शस्त्रक्रीया जिल्ह्यात यशस्वी झाली आहे. जिल्हा रूग्णालयांतर्गत जिल्हा मौखिक आरोग्य कार्यक्रम व जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर सोसायटी मार्फत सह्याद्री ग्रुप ऑफ हॉस्पीटल, पुणे येथे मोफत मुख कर्करोगावरील शस्त्रक्रीया यशस्वीरित्या करण्यात आली आहे. बुलडाणा शहरातील भीमनगर येथील रहीवासी व्यावसायाने मजूर असलेले 44 वर्षीय गजानन गायकवाड यांनी त्यांच्या पत्नीच्या आग्रहास्तव तंबाखू नियंत्रण कक्षास भेट दिली. त्यानंतर दंत विभागातील डॉ. मेटकर यांनी बायोप्सी घेतली. त्यामध्ये मुख कर्करोगाचे निदान झाले. जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले मुख कर्करोगतज्ज्ञ डॉ. राम पाटील दर महिन्यातील दुसऱ्या सोमवारला रूग्णालयाला भेट देतात.

    भेटीदरम्यान गजानन गायकवाड यांना पुढील शस्त्रक्रीया व उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानुसार महात्मा फुले जनआरोग्य योजनेमार्फत त्यांच्यावर पुणे येथे जवळपास 7 ते 8 तास कमांडो शस्त्रक्रीया करण्यात आली.  दरम्यान रूग्ण व नातेवाईकांच्या निवासाची व्यवस्था डॉ. अनुजा कृष्णा रेड्डी यांच्या मार्गदर्शनानुसार एका एनजीओ मार्फत मोफत करण्यात आली. ही शस्त्रक्रीया यशस्वी करण्यासाठी डॉ. राम पाटील यांच्यासमवेत भूलतज्ज्ञ डॉ. विजय जाधव, फिजीशियन डॉ. सुधाकर खाविसे, समन्वयक डॉ. मेटकर, डॉ. अलापिनी थोपटे, सुनीता रानीकर, रूपाली चौधरी, सिस्टर हेमा, ब्रदर सतिश, अमोल आदींचे सहकार्य लाभले. या शस्त्रक्रीयेसाठी मार्गदर्शन  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले. तसेच रूग्णाच्या पहिल्या भेटीपासून ते आजतागायत समुपदेशन जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे डॉ. लता भोसले, लक्ष्मण सरकटे, अर्चना आराख यांनी केले.  डॉ. राम पाटील हे मूळचे वरवंड ता. बुलडाणा येथील असून त्यांनी आतापर्यंत मुख व मानेच्या कर्करोगावरील 2100 हून अधिक शस्त्रक्रीया यशस्वी पार पाडलेल्या आहेत. आजोबा स्व. भीमराव धंदर यांच्या स्मरणार्थ डॉ. राम पाटील 2019 पासून दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारला दंत विभाग, ओपीडी 34 ला उपलब्ध असतात. तरी बुलडाणा कॅन्सर सोसायटीमार्फत 8530311333 हेल्पलाईन क्रमांकावर गरजूंनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे.

                                                            *****

दिव्यांगासाठी शेगाव येथे 7 जानेवारीला होणाऱ्या मेळाव्याला

दिव्यांगांनी उपस्थित राहावे

       -राज्यमंत्री बच्चू कडू

            बुलडाणा, (जिमाका) दि. 14: दिव्यांगांना सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा यासाठी जिल्ह्यातील शेगाव येथे शुक्रवार, दिनांक 7 जानेवारी 2022 रोजी दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती  इतर मागास बहुजन कल्याण तसेच जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. या मेळाव्याला दिव्यांगांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

            अमरावती येथे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण कार्यालयात राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिव्यांगांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा तसेच कापडी तंबूमध्ये (पालात) राहणाऱ्या नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा याबाबत आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

            दिव्यांग बांधवांना कोणत्याही अडी-अडचणी येऊ नयेत तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दिव्यांग दुर होऊ नये यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. परंतु बरेचदा याची माहिती गरजूंपर्यंत पोहचत नाही. हे लक्षात घेऊन दिव्यांग बांधवांसाठी शेगाव येथे विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी असलेली सर्व शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासाठी येथे आरोग्य निदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. कृत्रिम अवयव पुरविणाऱ्या संस्थांनाही यावेळी बोलाविण्यात येणार आहे.

            दिव्यांग मेळाव्यामध्ये जिल्हानिहाय स्टॉल लावण्यात येणार आहे. या स्टॉलवरून दिव्यांगांना विविध योजनांचे अर्ज तर वाटप केले जातीलच शिवाय प्रत्येक स्टॉलवर तक्रार निवारण केंद्रही स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे दिव्यांगांना एका छत्राखाली शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती, त्यासाठी लागणारे आवश्यक कागपत्रे, अर्ज कुठे व कसा सादर करावा याची सविस्तर माहिती मिळणार आहे. जिल्हानिहाय तक्रारी स्विकारण्याचे तसेच विविध योजनांचे अर्ज वाटप एकाच ठिकाणी चालणार आहे. हा मेळावा दिव्यांगांसाठी आनंद मेळावा ठरेल, असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी यावेळी दिले.             श्री. कडू यांनी विभागीय दिव्यांग मेळाव्यासाठी जातीनिहाय, प्रवर्गनिहाय दिव्यांगाची नोंदणी करण्याबाबतची सूचना  समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिली.


तूर बहारात असताना किडींचे  व्यवस्थापन करावे

  • कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 14: सद्याचे हवामान व पिक वाढीची अवस्था तूर पिकावरील शेंगा पोखरणारी अळी- या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या तुरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मि.मि. लांब, विविध रंग छटेत दिसून येते जसे पोपटी, फिक्कट गुलाबी व करड्या रंगाची असून पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठ्या अळ्या शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात.

    पिसारी  पतंगाची अळी १२.५ मि. मि. लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सूक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते व बाहेरून दाने पोखरते.  शेंग माशीची अळी बारीक व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. हि अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाणे अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकनी होते.या दोन्ही किडी कळ्या, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनासाठी पुढील उपाय योजावे . प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे शेतात लावावेत. त्यामुळे पक्षी किडीच्या अळ्या खाऊन फस्त करतील. तसेच पहिली फवारणी (शेंगा धरण्याच्या अवस्थेत) निबोळी अर्क ५ टक्के किंवा ३०० पीपीएम ५० मिली. किंवा क्विनालफॉस २० ई.सी. २० मिली. प्रती १० लिटर  पाण्यात मिसळून फवारणी करावी. तर दुसरी फवारणी ही पहिल्या फवारणी नंतर १५ दिवसांनी करावी. त्यामध्ये इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के ३ ग्रॅम, किंवा लांबडासायहॅलोथ्रीन ५ टक्के  प्रवाही १० मिली. किंवा क्लोरॅनट्रँनिलीप्रोल १८.५ टक्के एस. सी. २.५ मिली. पैकी कोणत्याही एका प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . अशाप्रकारे  किडींचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.

                                                                        ******

No comments:

Post a Comment