Wednesday 8 December 2021

DIO BULDANA NEWS 8.12.2021,1

 राष्ट्रीय लोक अदालतीचे ११ डिसेंबर रोजी आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि. ८ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या आदेशान्वये जिल्ह्यात ११ डिसेंबर 2021 रोजी बुलडाणा व तालुक्यांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकमेकांवर विजय मिळविल्याचा आनंद फक्त एक दिवस टिकतो पण तडजोड करून तसे प्रकरण एकमेकांना विश्वासात घेवून मिटविल्यास आपल्या जिवनातील विरोधक कमी होतात व त्याने आपण जास्त प्रगती करतो. त्यामुळे एकमेकांवर विजय मिळविण्याचा विचार करण्यापेक्षा तडजोड करून खटले निकाली काढल्यामुळे पक्षकारातील एकमेकांबद्दल असलेला तिरस्कार आणि आकस कमी होवून एकमेकांबद्दल प्रेमाने सद्भावना निर्माण होते.
    या बाबींचा विचार करुन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये ११ डिसेंबर रोजी जिल्हयात सुध्दा लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संधीचा लाभ पक्षकारांनी भेटून दाखलपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीद्वारे निकाली काढावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्र. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी, प्राधिकरणाचे सचिव साजिद आरिफ सैय्यद, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष विजयकुमार सावळे यांनी केले आहे.
   सदर लोकअदालतीत मोटार व्हेईकल अक्ट चे प्रकरणेसुद्धा तडजोडीसाठी मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेले असून त्यात तडलोड शुल्क न्यायालयीन दैनंदिन प्रक्रियेपेक्षा कमी आकारण्यात येणार आहे. पक्षकारांनी या संधीचा फायदा जरूर घ्यावा. लोकअदालतीत कोविड -१९ बाबत असलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करुन घेण्यात येणार आहे. आपण सर्वांनी मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे व दोन गज सामाजिक दुरी ठेवणे बंधनकारक आहे. त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जिल्ह्यात होणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यासाठी पक्षकारांनी आणि संबंधितांनी नजिकच्या तालुका विधी सेवा समिती किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलडाणा येथे संपर्क साधावा. जेणेकरुन सदर प्रकरण सामजस्याने निकाली निघेल व आपला वेळ व खर्च वाचेल, असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment