Wednesday 15 December 2021

DIO BULDANA NEWS 15.12.2021

 


प्रॉपर्टी कार्डमुळे ग्रामीण भागातील जमिनीचे वाद संपुष्टात येतील

       -जिल्हाधिकारी एस रामामूर्ती

ड्रोनद्वारे गावठाण भूमापन कार्यशाळा

 बुलडाणा, (जिमाका) दि. 15: केंद्र शासनाने गावठाणमधील मालमत्तांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमातंर्गत गावठाणमधील प्रॉपर्टीचे बिनचूक मोजणी होणार आहे. या प्रॉपर्टी कार्डमुळे ग्रामीण भागात असलेले जमिनीचे वाद निश्चितच संपुष्टात येतील, असा आशावाद जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज व्यक्त केला.

   स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात भूमी अभिलेख, महसूल व ग्रामविकास विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ड्रोनद्वारे गावठाण भूमापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, उपविभागीय अधिकारी श्री. हांडे, तहसिलदार रूपेश खंडारे, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख सुनील वाणी, पोलीस निरीक्षक श्री. सोनकांबळे आदी  उपस्थित होते.

   ड्रोनद्वारे गावठाण भूमापनाचे काम यंत्रणांनी सक्रीय सहभाग घेवून प्रभावीरित्या  करण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाले, केंद्र शासनाची प्रॉपर्टी कार्ड देणारी ही स्वामित्व योजना आहे. या योजनेमुळे ग्रामपंचायतीला स्वउत्पन्नाचे साधन निर्माण होणार आहे. ड्रोन तंत्रज्ञान हे अत्याधुनिक तंत्रज्ञान असून भविष्यातही शासनाच्या बऱ्याच योजनांमध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे ग्रामपातळीवरील शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची हे तंत्रज्ञान अवगत करावे. सदर तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी ड्रोनद्वारे गावठाणाचा सर्वे ही सुवर्णसंधी आहे. ग्रामसेवक, तलाठी यांनी आपल्या गावात सर्वेक्षण होण्याच्या दिवशी भूमिअभिलेखच्या चमूला सहकार्य करावे व आपल्या गावाचे गावठाण 100 टक्के ड्रोनने मोजून घ्यावे.

     उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लोखंडे यावेळी म्हणाले, ड्रोन सर्वेमुळे गावागावात वर्षानुवर्ष पिढयान पिढ्या सुरू असलेले वाद निकाली निघतील. ड्रोनसर्वेसाठी ग्रामसेवकांनी नमुना 8 अचूक व अद्ययावत द्यावा. गाव नमुना 8 वरच गावठाणाचे सर्वेक्षण अवलंबून असून त्यानुसारच प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. तसेच नमुना 8 वर जो मालक असेल, तोच द्यावा. वारसही जितके असतील तितकेच द्यावे. त्यामध्ये बदल करू नये. या कामाला प्राधान्य देवून ग्रामसेवकांनी सक्रीय सहभाग द्यावा.

   प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख सुनील वाणी यांनी केले. ते म्हणाले, अमरावती  विभागात ड्रोनद्वारे गावठाण सर्वेक्षणात बुलडाणा जिल्ह्याची गती कायम आहे. स्वामित्व योजनेची अंमलबजावणी ग्रामविकास विभागाचेवतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाची भूमिक महत्वाची आहे. ग्रामसेवकांनी गावात मालमत्ता धारकाकडून दिलेला अर्ज भरून घ्यवा. तसेच छोटा फ्लेक्सवर मालमत्ता क्रमांक ठळक स्वरूपात छापून घ्यावा. सदर मालमत्ता क्रमांकाचा फ्लेक्स घराच्या छतावर किंवा घरासमोरील दर्शनी भागात लावण्यास सांगावे. जेणेकरून ड्रोनमध्ये मालमत्ता क्रमांक दिसून येईल. त्यामुळे आणखी बिनचूक गावठाण भूमापन शक्य होईल. ज्या दिवशी नागरिकांनी त्यांच्या मालमत्तेची सनद देवू तो विभागासाठी आनंदाचा दिवस असेल. संचलन उपअधिक्षक भूमि अभिलेख व्ही. ए सवडतकर यांनी केले. कार्यशाळेला तलाठी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

                                                                                                ******

जिल्ह्यात 16 लक्ष 16 हजार 968 लाभार्थ्यांचा लसीचा पहिला डोस पूर्ण

बुलडाणा, (जिमाका) दि. 15 : जिल्ह्यात 100 टक्के लसीकरणासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यानुसार 14 डिसेंबर पर्यंत जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत लसीचा पहिला डोस घेतलेल्या एकूण उद्दीष्ट असलेल्या 21,04,902 पैकी 16,16,968 लाभार्थ्यांचे लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. त्याची टक्केवारी 76.82 टक्के आहे. जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पहिला डोस घेतलेल्या 50 ते 75 टक्के डोस घेतलेले लाभार्थी संख्या असलेले प्रा. आ केंद्र 41 आहे. तसेच 75 ते 100 टक्के पहिला डोस घेतलेले लाभार्थी केंद्र 11 आहे.  जिल्हा प्रशासन लसीकरण पुर्ण होण्याकरीता सातत्याने प्रयत्न करीत आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                                ******

परदेशातून आलेल्या कोरोना बाधीत व्यक्तीचा ओमिक्रॉन तपासणी अहवाल पॉझीटीव्ह

  • प्रशासनाचे घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 15 : जिल्ह्यात परदेशातून आलेली 67 वर्षीय पुरूष व्यक्ती कोरेाना बाधीत होती. सदर व्यक्तीचा नमुना ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. या नमुन्याचा तपासणी अहवाल ओमिक्रॉन पॉझीटीव्ह आला आहे. सदर रूग्णावर कोविड हॉस्पीटल, बुलडाणा येथे उपचार सुरू आहे. या रूग्णाची प्रकृती ठणठणीत असून रूग्णाच्या निकट संपर्कातील कुटूंबातील व्यक्तींचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे. रूग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्ती निगेटीव्ह आल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. लसीकरण केलेले नसल्यास लसीकरण करून घ्यावे. ज्यांनी पहिला डोस घेतला असेल व दुसऱ्या डोसचा कालावधी आला असेल, त्यांनी प्राधान्याने दुसरा डोस घेवून घ्यावा. तसेच प्रत्येकाने घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. कुणीही मास्कशिवाय घराबाहेर पडू नये. सामाजिक सुरक्षा अंतराच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

                                                                        ********

कोरोना अलर्ट : प्राप्त 568 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह

बुलडाणा, (जिमाका) दि. 15 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 569 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 568 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 1 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 234 तर रॅपिड टेस्टमधील 334 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 568 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव शहर : गौलखेड रोड 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 1 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आला आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 741973 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86977 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86977 आहे.  आज रोजी 320 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 741973 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87660 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86977 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 8 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 675 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

--

No comments:

Post a Comment