Tuesday 21 December 2021

DIO BULDANA NEWS 21.12.21

मोताळा व संग्रामपूर नगर पंचायत निवडणूकीसाठी शांततेत मतदान मोताळा अंदाजे 79, तर संग्रामपूरमध्ये 83.45 टक्के मतदान बुलडाणा, (जिमाका) दि. 21: जिल्ह्यात आज मोताळा व संग्रामपूर नगर पंचायत निवडणूकीसाठी मतदान पार पडले. या दोन्ही नगर पंचायतमध्ये सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला शांततेत सुरूवात झाली. मतदानाला मतदारांनी सकाळपासूनच उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. मतदानासाठी मोताळा नगर पंचायतमध्ये 13 व संग्रामपूर नगर पंचायतमध्ये 13 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. कुठेही मतदान प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही. सदर निवडणूक संग्रामपूर व मोताळा नगरपंचायतमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या प्रत्येकी 4 राखीव जागा वगळता अन्य जागांसाठी घेण्यात आली. संग्रामपूर नगर पंचायतसाठी 13 व मोताळा नगर पंचायतकरीता 13 जागांवर निवडणूक झाली. या मतदानाची मतमोजणी 19 जानेवारी 2022 रोजी तहसिल कार्यालयातील मतमोजणी केंद्रावर होणार आहे, अशी माहिती नगर प्रशासन विभागाकडून प्राप्त झाली आहे. मोताळा नगर पंचायतमध्ये अंदाजे 79 टक्के तर संग्रामपूर नगर पंचायतमध्ये 83.45 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. संग्रामपूर नगर पंचायत निवडणूकीसाठी स्त्री मतदार 1965 व पुरूष मतदार 2101 असे एकूण 4066 मतदार होते, त्यापैकी 1798 पुरूष मतदारांनी व 1595 स्त्री मतदार, असे एकूण 3393 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला.तसेच मोताळा नगर पंचायत निवडणूकीसाठी स्त्री मतदार 2968 तर पुरूष 3290 असे एकूण 6258 मतदार होते. त्यापैकी साडेतीन वाजेपर्यंत स्त्री 2141 व पुरूष 2396 असे एकूण 4537 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. *********** कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 05 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’ बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हा वासियांना आज 42 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 05 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 315 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 315 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 125 व रॅपिड टेस्टमधील 190 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 315 अहवाल निगेटीव्ह आहेत. त्याचप्रमाणे आज उपचारांती दोन रूग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत 743781 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86980 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86980 आहे. आज रोजी 351 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 743781 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87660 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86980 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 05 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 675 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. *****

No comments:

Post a Comment