Monday 13 December 2021

DIO BULDANA NEWS 13.12.2021

 माजी सैनिकांच्या मेळाव्याचे 16 डिसेंबर रोजी आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.13 : ध्वजदिन निधी संकलन समारोह तथा माजी सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन 16 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सैनिक कॉम्प्लेक्स, बस स्थानकासमोर, बुलडाणा येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते उपस्थित राहणार आहे. मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व अवलंबित यांनी उपस्थित रहावे. कार्यक्रमास येताना मास्क लावणे अनिवार्य आहे. तसेच कार्यक्रमासाठी लसीचे दोन डोस घेतलेले असलेल्यांनाच प्रवेश दिल्या जाणार आहे. तरी माजी सैनिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर निंबाजी पडघान यांनी केले आहे.

******

कामगार कल्याणच्या योजनांचा लाभ कोविडमुळे मृत्यू झालेल्या

 कामगारांच्या कुटूंबियांनाही मिळणार

  • www.public.mlwb.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावे

बुलडाणा,(जिमाका) दि.13 : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील ज्या नोंदीत कामगारांचा कोविड 19 मुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटूंबियांनासुद्धा मंडळाच्या सर्व योजनांचा लाभ पुढील तीन वर्षापर्यंत देण्यात येणार आहे. याबाबतचे निर्देश कामगार विभागाचे दिले आहे. त्यानुसार कामगारांच्या पाल्यांनी मंडळाच्या योजनांसाठी मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे. मंडळाकडे कामगार कल्याण निधी भरणाऱ्या नोंदीत आस्थापनांतील कामगार व त्यांच्या कुटूंबियांसाठी मंडळातर्फे विविध आर्थिक लाभाच्या योजनांसह कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येतात.

     यामध्ये प्रामुख्याने इयत्ता 10 वी व त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या कामगार पाल्यांसाठी 2 ते 5 हजार रूपये शिष्यवृत्ती, परदेशात उच्च शिक्षणासाठी 50 हजार रूपये शिष्यवृत्ती, राज्य अथवा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या कामगार पाल्यांसाठी 2 ते 15 हजार रूपये शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक खरेदी किंमतीच्या 50 टक्के रक्कम अर्थसहाय्य, एमएससीआयटी अभ्यासक्रम शुल्काच्या 50 टक्के रक्कम अर्थसहाय्य, गंभीर आजार उपचारासाठी 5 ते 25 हजार रूपये अर्थसहाय्य, शिवण मशीन खरेदीसाठी 90 टक्के अर्थसहाय्य, 10 वी व 12 वी परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत कामगार पाल्यांचा गौरव आदी योजनांचा समावेश आहे. तसेच कामगार कुटूंबियांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मंडळातर्फे युनिसेफच्या सहकार्याने कौशल्य विकास प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे. कामगाराचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास पुढील 3 वर्ष त्यांच्या कुटूंबियांना मंडळाच्या योजना, उपक्रम व कार्यक्रमांचा लाभ घेता येतो. त्यानुसार कोविड मुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटूंबियांना देखील मंडळाच्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी मंडळाच्या जवळच्या केंद्रास किंवा www.public.mlwb.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन कल्याण आयुक्त यांनी केले आहे.

                                                ******

                               सेवानिवृत्तांनी निवृत्ती वेतनासंबंधीत कागदपत्रे सुरक्षीत ठेवावे

-          पी. एस मांडोगडे

बुलडाणा,(जिमाका) दि.13 : सेवानिवृत्ती नंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती विषयक कागदपत्रांचे खूप महत्व असते. बऱ्याचदा कागदपत्रांच्या अडचणीमुळे किंवा कागदपत्रे गहाळ झाल्यामुळे सेवानिवृत्तांना सेवानिवृत्ती विषयक प्रकरणांमध्ये त्रास सहन करावा लागते.  हयातीचा दाखला, मूळ निवृत्ती वेतन आदेश, आयकर कपातीबाबत कागदपत्रे, अंशराशीकरणाची कपात ही महत्वाची कागदपत्रे आहेत. त्यामुळे सेवानिवृत्तांनी सेवानिवृत्तीविषयक कागदपत्रे सुरक्षीत ठेवावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी पी. एस मांडोगडे यांनी केले आहे.

    स्थानिक अजिंक्य वैभव मंगल कार्यालयामध्ये सेवानिवृत्त महसूल कर्मचारी बहु. संस्थेची सभा नुकतीच पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डी. के पाटील, उपाध्यक्ष बी. के इंगळे, सचिव व्ही. आर खराटे, कोषाध्यक्ष  पी. एस सातव, अप्पर कोषागार अधिकारी श्री. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी शहीद सैनिक व निधन झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच 71 वर्ष पूर्ण करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचारी व नवीन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रास्ताविक वा.पा नखोत यांनी केले. तसेच सेवानिवृत्त तहसिलदार डी. एम हादे,  अध्यक्ष श्री. पाटील, सचिव श्री. खराटे, सहकोषाध्यक्ष श्री. माळी आदींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर .एन देवकर, श्री. माळी, डी. एन पाटील, बी. के वाघ, एस आर शेळके, एन. आर पाटील, वा. पा नखोत, आ. पी देशमुख, श्री. अवधूत यांनी सहकार्य केले. संचलन सचिव व्ही. आर खराटे यांनी तर आभार प्रदर्शन डी. एन पाटील यांनी केले.

                                                                                *****

अनु. जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय शाळेत शिक्षक पदासाठी अर्ज आमंत्रित

• कोलवड, वळती, घाटपुरी, शेगांव व लोणार येथील निवासी शाळा

17 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीचे आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.13 : सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांचे अधिनस्थ जिल्ह्यातील कोलवड, वळती, शेगांव, घाटपुरी व लोणार येथील अनु. जाती व नवबौद्ध मुला-मुलींकरीता शासकीय निवासी शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरीता तासिका तत्वावर शिक्षकांची पदभरती करावयाची आहेत. त्यामध्ये डि.एड व बी.एड पात्रता धारक शिक्षकांच्या एकूण 16 पदांचा समावेश आहे. कोलवड येथील शाळेत तीन, घाटपुरी येथील 3, लोणार येथील 5, शेगांव  व वळती येथील शाळेत 3 पदे आहेत. या पदांच्या भरतीसाठी मुलाखतीचे आयोजन 17 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे करण्यात आले आहे.

     अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळा कोलवड ता. बुलडाणा येथे इयत्ता 6 ते 8 वी साठी सर्व विषयांकरीता एचएससी डि.एड शिक्षक एक, विज्ञान व सामाजिक शास्त्र विषय 9 व 10 वी करीता बीएससी, बी.एड एक व बीए बीएड एक  पात्रताधारक अशा तीन शिक्षकांची आवश्यकता आहे. अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळा लोणार ता. लोणार येथे इयत्ता 6 ते 8 वी साठी सर्व विषयांकरीता एचएससी डि.एड शिक्षक दोन, विज्ञान, इंगजी व सामाजिक शास्त्र विषय 9 व 10 वी करीता बीएससी, बी.एड एक, बीए / एमए बीएड प्रत्येकी एक असे एकूण 3, अशाप्रकारे एकूण 5 शिक्षकांची आवश्यकता आहे.

  अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळा शेगांव ता. शेगांव येथे इयत्ता 9 वी 10 वी करीता सामाजिक शास्त्र विषयासाठी बीए बीएड 1 व गणित विषयाकरीता बीएससी, बीएड 1 असे दोन शिक्षकांची आवश्यकता आहे. अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळा वळती ता. चिखली येथे प्राथमिकसाठी मराठी विषयाकरीता एक, माध्यमिकसाठी मराठीकरीता बीए, बीएड शिक्षक दोन, असे एकूण 3 शिक्षकांची आवश्यकता आहे. या शाळेकरीता इंग्रजी एक, सामाजिक शास्त्रे विषयाकरीता दोन शिक्षक अशाप्रकारे तीन पदे आहेत.

   त्याचप्रमाणे अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळा घाटपुरी ता. खामगांव येथे इयत्ता 6 ते 8 वी साठी बीएससी/ डि.एड/ बी.एड शिक्षक एक आणि 9 व 10 वी करीता बी.ए /बी.एड, बी.एससी/बी.एड (गणित), बी.ए/बी.एड भाषा पात्रताधारक दोन असे तीन शिक्षकांची आवश्यकता आहे.

    या विषयांकरीता घड्याळी तासिकेवर नियुक्ती करण्याकरीता इच्छूक पात्र उमेदवारांनी संपूर्ण माहितीसह अर्ज व कागदपत्रांच्या मुळ आणि छायाप्रतींसह 17 डिसेंबर 2021 रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे उपस्थित रहावे. तासिकेचे मानधन शासन निर्णयातील तरतुदीनुसार देय राहणार आहे. सन 2021-22 करीता तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक असून उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा दावा करणार नाही, असे बंधपत्र लिहून देणे बंधनकारक राहणार आहे. शैक्षणिक पात्रता व अनुभव असणाऱ्या उमेदवारांना तसेच यापूर्वी तासिका तत्वावर या शाळांवर काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                                    ******

समाज कल्याण कार्यालयात अनुसूचित जाती उपयोजना माहितीसाठी ‘एकल खिडकी’

बुलडाणा,(जिमाका) दि.13 : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कर्यालयात अनुसूचित जाती उपयोजनेची माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी एकल खिडकी योजना तयार केली आहे. सदर कार्यालयातंर्गत अनुसूचित जाती उपयोजना राबविण्यात येतात. त्याअनुषंगाने एकल खिडकी योजनेचे उद्घाटन 6 डिसेंबर 2021 रोजी सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांच्याहस्ते करण्यात आले. या वेळी लाभार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

 संबंधित सर्व यंत्रणांकडील योजना त्यांच्या स्तरावरच राबविण्यात येत असतात. त्याकरिता जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या घटकांना प्रत्येक कार्यालयात योजनांची माहिती व मार्गदर्शन घेण्यासाठी वणवण भटकंती होवू नये, या दृष्टीने समाज कल्याण कार्यालयातंर्गत एकल खिडकी निर्माण करण्यात आली आहे. या एकल खिडकीचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ अनिता राठोड यांनी केले आहे.

                                                                        *******

हरभऱ्यावरील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करा

  • कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.13 : सद्यस्थितीत हरभऱ्याचे पिक हे वाढीच्या अवस्थेत आहे. साधारणत: 8 ते 10 दिवसानंतर फुलोरा अवस्थेत प्रवेश करेल व दरम्यान घाटेअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. घाटेअळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असून या किडीची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातुन 2 ते 3 दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरीत द्रव्य खरडून खाते. त्यामुळे पान प्रथम पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात व गळून पडतात. थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने व कोवळी देठे खावून फस्‍त करतात. त्यामुळे झाडावर केवळ फांद्याच शिल्लक राहतात. पुढे पिक फुलोऱ्यावर आल्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळ्या प्रामुख्याने फुले व घाट्यांचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र करून आतील दाणे खावून घाटे पोखरतात. एक अळी साधारणत: 30-40 घाट्यांचे नुकसान करते. त्यामुळे हरभरा पिकावरील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे.

   घाटेअळीचे परभक्षक बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी आदी पिकामध्ये फिरून घाटे अळ्या वेचून त्याचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी किटकनाशकाची फवारणी केल्यास पक्षी किटक नाशकांच्या वासामुळे शेतामध्ये येणार नाहीत. त्यामुळे किटक नाशकाचा जास्त वापर टाळावा. ज्या शेतामध्ये मका किंवा ज्वारीच्या नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून उपयोग केला नसेल त्या शेतामध्ये बांबुचे त्रिकोणी पक्षी थांबे प्रती हेक्टर 20 पक्षी थांबे तयार करून शेतात लावावे. त्यामुळे पक्षांचे अळ्या वेचण्याचे काम सेापे होते. कामगंध सापळ्याचा वापर करावा. यासाठी घाटे अळीचे कामगंध सापळे एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे या प्रमाणे लावावे. सापळ्यामध्ये सतत तीन दिवस 8 ते 10 पतंग आढळल्यास व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. पिकाचे निरीक्षण करून किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा 40 ते 50 टक्के पिक फुलोऱ्यावर आल्यानंतर घाटेअळीचे व्यवस्थापनासाठी दोन फवारण्या 10 लिटर पाण्यात मिसळून कराव्यात. पहिली फवारणी 50 टक्के फुलोऱ्यावर असताना करावी. निंबोळी अर्क 5 टक्के किंवा एचएएनपीव्ही (1 x 10 पीओबी / मिली) 500 एल ई / हे. किंवा क्विनॉलफॉस 25 ई.सी 20 मि.ली या घटकाची फवारणी करावी. तसेच दुसरी फवारणी ही पहिल्या फवारणीच्या 15 दिवसानंतर करावी. या फवारणीवेळी इमामेक्टीन बॅझोएट 5 टक्के एस जी 3 ग्रॅम किंवा इथिऑन 50 टक्के इसी 25 मिली किंवा फ्लुबेंडामाईड 20 टक्के डब्ल्युजी 5 मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल 18.5 टक्के एस सी 2.5 मिली या घटकाची करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

*******

अपाम’च्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेत जिल्हा विदर्भात प्रथम

• सर्वात जास्त 1030 कर्ज प्रकरणे मंजूर

• 7 कोटी 29 लक्ष 33 हजार 615 एवढ्या रकमेचा व्याज परतावा

बुलडाणा,(जिमाका) दि.13 : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातंर्गत स्वयंरोजगार उभा करण्यासाठी विविध कर्ज वितरण योजना अंमलात आणण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजना यांचा समावेश आहे. या योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेच्या कर्ज प्रकरणांमध्ये विदर्भात बुलडाणा जिल्ह्याने बाजी मारली आहे. विदर्भात सर्वात जास्त 1030 बँक कर्ज प्रकरणे मंजूर करून जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

   या कर्ज प्रकरणांमध्ये 70 कोटी 21 लक्ष 90 हजार 919 रूपयांचे कर्ज बँकांकडून वितरण करण्यात आले आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये 1391 लाभार्थ्यांना LOI (लेटर ऑफ इंटेन्ट) देण्यात आले असून 1030 प्रकरणांमध्ये कर्ज मंजूर करण्यात आले. तसेच 854 लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू झाला आहे. त्याची महामंडळाकडून 7 कोटी 29 लक्ष 33 हजार 615 एवढी रक्कम व्याज परतावा म्हणून देण्यात आली आहे. ही चमकदार कामगिरी करणारे बुलडाणा जिल्हा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कार्यालय विदर्भात उत्कृष्ट ठरले आहे. गट कर्ज व्याज परमावा योजनेतंर्गत 4 पात्रता प्रमाणपत्र मिळालेले असून 1 कर्ज प्रकरण मंजूर झाले आहे. या प्रकरणात 2 लक्ष 9 हजार 222 रूपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे. तसेच गट प्रकल्प कर्ज योजनेत शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत 6 गटांना प्रत्येकी 10 लक्ष रूपयांचा कर्ज पुरवठा महामंडळाकडून करण्यात आला आहे.

      कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय कार्यान्वीत आहे. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानातंर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या होतकरू व्यक्तींना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजना सुरू आहेत.  कर्ज प्रकरणांसाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा तहसिलदार यांचा 8 लक्ष रूपयांच्या मर्यादेत असलेला दाखला किंवा आयटी रिटन, लग्न झालेले असल्यास पती – पत्नी दोघांचे दाखले, रहिवासी पुरावा म्हणून राशन कार्ड, विज देयक, शाळेची टीसी, जात प्रमाणपत्र व प्रकल्प अहवाल आवश्यक आहे. पुरूषांसाठी वयोमर्यादा 50 वर्षाच्या आत, तर  महिलांसाठी 55 वर्षापर्यंत आहे. तरी अधिक माहितीसाठी www.mahaswayam.in या संकेतस्थळाव अथवा महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक पुरूषोत्तम अंभोरे, परेश मराठे यांनी केले आहे.

                                                                                *******

जिल्हा क्रीडा पुरस्कार करीता अर्ज सादर करावे

            बुलडाणा,(जिमाका) दि.13 : महाराष्ट्र शासनाचे क्रीडा धोरण 2001 अंतर्गत शासन निर्णय दि.24 जानेवारी 2020 नुसार, क्रीडा व युवक सेवा संचालनलाय, महाराष्ट्र राज्य, पुणे मार्फत जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे / योगदानाचे मुल्यमापन होवून, त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गुणवंत क्रीडापटू (पुरुष व महिला), क्रीडा मार्गदर्शक यांना प्रजासत्ताक दिनी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.  या पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम  10  हजार रूपये आहे.  त्या अनुषंगाने सन 2021-22 च्या पुरस्कारासाठी या कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत.

            पुरस्काराचे पात्रतेचे निकष : पुरस्करासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्षे वास्तव्य असले पाहिजे, संबंधीत जिल्ह्यामध्ये क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहिजे व त्याने वयाची 35 वर्षे पुर्ण केलेली असणे आवश्यक आहे.  गुणांकनाकरीता त्या जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल,  खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपुर्व 5 वर्षापैकी 2 वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे,   एका जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही, एकदा एका खेळामध्ये किंवा एका प्रवर्गामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त केलेली व्यक्ती पुन्हा त्याच खेळात किंवा प्रवर्गात जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळण्यास पात्र असणार नाही, पुरस्कार वर्ष दिनांक 1 जुलै ते 30 जून असे राहील.

गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी निवड करण्याची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे राहील.  गेल्या 10 वर्षात किमान वरीष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला (खेलो इंडीया) मधील राष्ट्रीय स्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असले पाहिजे.  सांघीक अथवा वैयक्तीक मान्यता प्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल गेम्स, वरीठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेला खेळाडू अथवा राज्य /जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यंत यश मिळविणारे किमान तीन खेळाडू घडविणारा मार्गदर्शक. 

उपरोक्त पुरस्काराकरीता अर्जासोबत सादर करण्यात आलेले प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे पुन्हा पुन्हा (अनेकवेळा) सादर करु नयेत.  अर्जदाराने सादर केलेले कागदपत्रे व प्रमाणपत्र सत्य असल्याबबातचे स्वसाक्षांकीत करुन घ्यावे.  एखाद्या व्यक्तीस दिलेला पुरस्कार आक्षेपार्ह कारणास्तव रद्द करण्याचा अधिकार समितीस राहील.  दि.24.01.2021 रोजीच्या शासन निर्णयात नमुद परिशिष्ट अ-6.1 मध्ये नमुद केलेल्या 44 खेळांचाच विचार जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी केला जाईल.

            विहीत नमुन्यातील अर्ज आणि पुरस्काराच्या अटी व शर्ती आणि अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडासंकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत अर्ज प्राप्त करुन घेवून सदरचे परिपुर्ण अर्ज दि.28 डिसेंबर 2021 पर्यंत या कार्यालयास सादर करावेत.  विहीत मुदतीनंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत.  याची कृपया नोंद घ्यावी असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.


No comments:

Post a Comment