Wednesday 22 December 2021

DIO BULDANA NEWS 22.12.2021

नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी… 1 लक्ष 76 हजार 337 शेतकऱ्यांना 102.43 कोटी रूपयांच्या मदतीचे वाटप बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामाच्या सुरूवातीला अवर्षण नंतर अतिवृष्टीसारख्या संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले. नैसर्गिक आपत्तीच्या चक्रव्यूहातून शेतकऱ्यांची यावर्षीसुद्धा सुटका होताना दिसली नाही. एक ना अनेक संकटांचे दुष्टचक्र शेतकऱ्यांच्या मागे सुरूच होते. अशा हवालदील परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे शासन उभे राहीले. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या संकटसमयी शासनाने भक्कम मदत दिली. ही आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा केली. जिल्ह्यात यावर्षी 1 लक्ष 76 हजार 337 शेतकऱ्यांना 102.43 कोटी रूपयांच्या मदतीचे वाटप शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये माहे मे 2021 मध्ये तौक्ते नावाचे चक्रीवादळ आले. त्यामुळे 20.60 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले. या नुकसानीपोटी 24 शेतकऱ्यांना 3 लक्ष 62 हजार 900 रूपयांच्या आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे माहे जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेलेल्या बाधितांनाही वाटप करण्यात आले आहे. यामध्ये 287.95 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. या नुकसानीपोटी 439 शेतकऱ्यांना 1 कोटी 7 लक्ष 99 हजार रूपये मदत देण्यात आली. तसेच याच महिन्यात अतिवृष्टीमुळे 548.76 हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले. या नुकसानीपोटी 1710 शेतकऱ्यांना 37 लक्ष रूपये वितरीत करण्यात आले. तसेच जिल्ह्यात वर्षाच्या सुरूवातीला जानेवारी व फेब्रुवारी 2021 मध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे 22178.75 हेक्टरवर शेतीपिके बाधीत झाली. त्यामुळे या 28786 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 18 कोटी 46 लक्ष 90 हजार 570 रकमेचे वाटप थेट बँक खात्यात करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील काही भागात मार्च, एप्रिल, मे मध्ये अवेळी पाऊस व गारपिट झाली होती. त्यामुळे 12735 शेतकऱ्यांचे 8033.59 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले. या बाधीत शेतकऱ्यांना 7 कोटी 97 लक्ष 80 हजार 777 रूपये वितरीत करण्यात आले. तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आला. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांचा हातसा घास गेला. शेतकऱ्यांनी पिके पावसाने सडवून टाकली. अशा परिस्थितीत जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन धावून आले. या अतिवृष्टीमुळे 133755.82 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचा फटका 132643 शेतकऱ्यांना बसला होता, त्यांना शासनाने नुकसानीपोटी 74 कोटी 50 लक्ष 38 हजार 176 रूपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. अशाप्रकारे नुकसानीच्या काळात शासनाने संवेदनशील भूमिका घेत जिल्ह्यातील 1 लक्ष 76 हजार 337 शेतकऱ्यांना एकूण 102 कोटी 43 लक्ष 71 हजार 423 रूपये मदतीचे वाटप केले. यामध्ये अजूनही शेतकऱ्यांना मदतीच्या वाटपाचे काम सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या काळात जिल्ह्यात 164825.47 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधीत झाली होती. शासनाने दिलेल्या मदतीमुळे निश्चितच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. *********** कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 04 सक्रीय रूग्ण; आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’ एका रूग्णाला मिळाली सुट्टी बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हा वासियांना आज 43 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 04 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 426 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 426 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 32 व रॅपिड टेस्टमधील 394 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 426 अहवाल निगेटीव्ह आहेत. त्याचप्रमाणे आज उपचारांती एक रूग्ण कोरोना मुक्त झाला असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत 744207 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86981 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86981 आहे. आज रोजी 348 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 744207 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87660 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86981 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 04 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 675 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ***** जिल्ह्यात नाफेडतर्फे 10 तुर खरेदी केंद्रांना मान्यता, नाव नोंदणी सुरू • शेतकऱ्यांनी संबंधित तूर खरेदी केंद्रावर नोंदणी करावी बुलडाणा, (जिमाका) दि. 22: जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयामार्फत हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्यावतीने जिल्ह्यात तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या बुलडाणा, दे.राजा, लोणार, मेहकर, शेगांव, संग्रामपूर, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सुलतानपूर केंद्र साखरखेर्डा, ता. सिं.राजा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था चिखली केंद्र उंद्री, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी दे.राजा केंद्र सिं.राजा असे 10 तूर खरेदी केंद्र सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रावर तूर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झालेली आहे. सदर केद्रांवर शेतकऱ्यांनी आपली तूर विक्री करण्याकरीता पुर्वी नोंदणी करुन घ्यावी. नोंदणी करण्याकरीता चालू वर्षाचा ऑनलाईन 7/12, पिकपेरा, आधारकार्ड, आएएफसी कोडसह आधार लिंक केलेली बँक पासबुक झेरॉक्स, तसेच मोबाईल क्रमांकासह कागदपत्रे नोंदणीवेळी सादर करावी. नोंदणी झाल्यानंतर विक्री करण्याकरीता तूर केव्हा आणायची या बाबत नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस करण्यात येईल. एसएमएस आल्यानंतर तूर केंद्रावर विक्री करण्याकरीता घेऊन यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी केले आहे. ************ मका, ज्वारी व बाजरीच्या शासकीय खेदीसाठी नाव नोंदणीस मुदतवाढ • 31 डिसेंबर 2021 पर्यंत करावी नोंदणी बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : शासनाच्या आदेशान्वये पणन हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाची आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत हमी दराने मका, ज्वारी, बाजरी या शेतमालाची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी जिल्ह्यात 14 खरेदी केंद्रांना मान्यताही देण्यात दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात मका, ज्वारी व बाजरी खरेदीसाठी नाव नोंदण्याकरीता 31 ऑक्टोंबर 2021 पर्यंत मुदत होती. मात्र नाव नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. हमी दराने मका शेतमालासाठी 3953, ज्वारीकरीता 3653 असे एकूण 7606 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. जिल्ह्यात तालुका खरेदी विक्री संघ बुलडाणा, दे. राजा, खामगांव, लोणार, मेहकर, संग्रामपूर, मलकापूर, जळगांव जामोद व शेगांव, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था चिखली, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी अंजनी खु केंद्र साखरखेर्डा ता. सिं.राजा, मा. जिजाऊ कृषि विकास शेतकरी कंपनी नारायणखेड केंद्र सिं.राजा, नांदुरा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी नांदुरा केंद्र वडी ता. नांदुरा या खरेदी केंद्रांना मान्यता मिळाली आहे. या ठिकाणी ऑनलाईन शेतकरी नाव नोंदणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी आधार कार्ड, सन 2021-22 चा पीक पेरा, बँक पासबुक झेरॉक्स, जनधन योजनेचे बँक खाते असल्यास देण्यात येवू नये, चालु वर्षाच सात बारा अशा संपूर्ण कागदपत्रांसह संबंधित तालुक्यातील संस्थेशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे. ****** 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन बुलडाणा, (जिमाका) दि. 22 : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने 24 डिसेंबर रोजी जिल्हा पुरवठा कार्यालय व तहसिल कार्यालय, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम तहसिल कार्यालय, बुलडाणा येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी केंद्र शासनाने कन्झ्युमर नो युवर राईट्स अशी संकल्पना निश्चित केलेली आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे. ****** --

No comments:

Post a Comment