Friday 17 December 2021

DIO BULDANA NEWS 17.12.2021

                      शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळ  सुरू ; अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 17: सामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचे मार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार  शिष्यवृत्ती  आणि राज्य शासनाची शिक्षण व परिक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विदयार्थ्यास विभागाच्या https:// mahadbtmahait.gov.in  या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. महाडीबीटीच्या संकेत स्थळावर ऑनलाईन भरण्याची सुविधा माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाडीबीटी संकेतस्थळ शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी दिनांक 31 जानेवारी 2022 पर्यंत सुरु राहणार आहे.

            सन 2021-2022 मध्ये प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावे. सन 2021-22 या  शैक्षणिक वर्षाकरीता ऑनलाईन अर्ज 14 डिसेंबर 2021 पासून सुरू झााले आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2022 आहेृ तरी सर्व  पात्र विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा वेळेच्या आत लाभ घ्यावा, तसेच विशेष करून सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील विदयार्थ्यांचे अर्ज दुरूस्त करून ऑनलाईन सादर करण्यासही 31 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  जिल्हयातील  विविध  महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज दिलेल्या मुदतीपूर्वी  https:// mahadbtmahait.gov.in  या शासनाच्या महाडीबीटी संकेत स्थळावर ऑनलाइन भरावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

                                                            *****



जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात माजी सैनिकांचा मेळावा उत्साहात

  • ध्वजदिन निधी संकलनाचाही शुभारंभ

बुलडाणा, (जिमाका) दि. 17:  स्थानिक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या सभागृहात माजी सैनिकांचा मेळावा व ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ कार्यक्रम 16 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून एअर कमोडोअर प्रमोद वानखडे, फ्लाईंग लेफ्टनंट रत्नाकर चरडे उपस्थित होते. तर सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान उपस्थित होते.

  यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री. गोगटे यांनी शहीद जवान व माजी सैनिकांप्रती मनोगत व्यक्त केले. त्यांनी सैनिकांच्या समर्पण वृत्तीचा उल्लेख करीत सैनिकांमुळे आपण सुरक्षीत असल्याची भावना व्यक्त केली. तसेच प्रमुख पाहुण्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्‍त केले. प्रास्ताविकामध्ये सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. पडघान यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला दीपप्रज्वलन करून चिफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत व शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. तसेच शहीद / सैनिकांच्या कुटूंबियांचा सत्कार व राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या गौरव पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले.  तसेच ध्वजदिन निधी संकलन 2020 मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमावेळी माजी सैनिकांच्या पाल्यांना कल्याणकारी निधी अंतर्गत आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास विरपत्नी, विरमाता, विरपिता, माजी सैनिक / विधवा पत्नी व अवलंबित अशाप्रकारे मोठ्या संख्येने माजी सैनिक उपस्थित होते. संचलन भास्कर पडघान यांनी केले.

                                                            ******

             चुकीची माहिती देवून कोविडने मृत्यू पावल्याचे अर्थसहाय्य घेतल्यास फौजदारी गुन्हा..

बुलडाणा, (जिमाका) दि. 17: मा. सर्वोच्च न्यायालयाने कोविड 19 ने मृत्यू पावलेल्या रूग्णांच्या वारसांना राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधीमधून 50 हजार रूपये मदत निधी देण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत चुकीची माहिती  देवून अर्थसहाय्य घेतल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी स्वरूपाची तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

   कोविड 19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकटच्या नातेवाईकांना 50 हजार रूपये सानुग्रह अर्थसहाय्य देण्यात येत आहे. त्यासाठी mahacovid19relief.in  या संकेतस्थळावर लॉगीन करावे. त्यासाठी या लिंकचा उपयोग करावा. मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचे आधार कार्ड, मृत्यू प्रमाणपत्र, अर्जदाराचे आधार संलग्न बँक खाते क्रमांक, बँक खात्याचा रद्द केलेला धनादेश, रूग्णालयाचा तपशील, आरटीपीसीआर रिपोर्ट, सिटी स्कॅन रिपोर्ट किंवा ज्यावरून त्या व्यक्तीस कोविड 19 चे निदान झाले अशी कागदपत्रे तसेच कुटूंबातील सर्व वारसदारांचे हमीपत्र व स्वयंघोषणापत्र अपलोड करावे.

 कोविड 19 च्या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना 50 हजार सानुग्रह अर्थसहाय्य शासन स्तरावरून देण्यात येणार आहे. कागदपत्रांच्या आधारे अर्जदाराला स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरून सहाय्य मिळण्याकरीता लॉगीन करता येईल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शासन निर्णयानुसार अंतिमत: मंजूर करण्यात आल्या अर्जानुसार अर्जदाराच्या आधार संलग्नीत बँक खात्यात सानुग्रह सहाय निधी जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.

                                                                                    ******

आता घरच्या घरी मिळवा डॉक्टरांच्या उपचाराचा सल्ला..!

  • ई संजीवनी ऑनलाईन ओपीडी सेवा
  • राज्य शासनाद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धतात
  • दररोज सकाळी 9.30 ते दुपारी 1.30, दुपारी 3 ते 5 वाजेदरम्यान मिळणार सल्ला

बुलडाणा,(जिमाका) दि.17 : भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने जनतेच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय टेलिकन्सल्टेशन सेवेद्वारे ऑनलाईन ओपीडी सेवा सुरू केली आहे. नॅशनल टेलिकन्सल्टेशन सर्विसद्वारे रूग्णांना त्यांच्या आजारावर पाहिजे असलेला सल्ला किंवा उपचाराबद्दलची माहिती रूग्णालयात न जाता घरच्या घरी मिळू शकणार आहे. त्यासाठी ई संजीवनी ऑनलाईन ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे.

   सी – डॅक या संस्थेकडून https://esanjeevaniopd.in हे पोर्टल व esanjeevaniopd हे मोबाईल वरील ॲप विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर किंवा ॲपचा उपयोग करून ऑनलाईन उपलब्ध असलेल्या डॉक्टरांशी ऑडीओ – व्हिडीओद्वारे सल्लामसलत करून रूग्ण त्यांच्या आजारावर विनामूल्य सल्ला घेवू शकतात. रूग्णाच्या वेगवेगळ्या आजारांवर या सेवेद्वारे सल्ला दिला जातो. तसेच ई प्रेस्क्रिप्शन दिल्या जाते.

  सध्याच्या कोरोना साथरोगामध्ये ही सेवा खूप उपयोगाची ठरणार आहे. रूग्णाला रूग्णालयात न जाता घरच्या घरी त्यांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांच्या सल्ला घेता येणार आहे. शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे सदर सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते सकाळी 9.30 ते दुपारी 1.30, दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत ई संजीवनी ओपीडी सेवेसाठी उपरोक्त पोर्टल व ॲपवर ऑनलाईन उपलब्ध असणार आहे.

तरी शासनाने जनतेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपक्रमाचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस यांनी केले आहे.

ई. संजीवनी ओपीडीची ठळक वैशिष्ट्ये

रूग्णाची नोंदणी, टोकन निर्मिती, रांग व्यवस्थापन, डॉक्टरांशी ऑडिओ – व्हिडीओ सल्लामसलत, ई प्रेस्क्रिप्शन, एसएमएस / ई मेल द्वारे सूचना, राज्याच्या डॉक्टरांद्वारे विनामूल्य सेवा.

*********

 


                    एकदिवसीय व्यक्तीमत्व विकास व रोजगार मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

बुलडाणा,(जिमाका) दि.17 : कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र अमरावती आणि संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय जिल्हानिहाय एकदिवसीय व्यक्तीमत्व विकास, रोजगार व स्वयंरोजेगार मार्गदर्शन कार्यशाळा  15 डिसेंबर रोजी जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा या ठिकाणी आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेचे उदघाटन संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती चे राष्ट्रीय सेवा योजनेचे  संचालक  डॉ.राजेश बुरंगे यांचेहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ.प्रशांत कोठे होते. तर प्रमुख उपस्थितीत सहायक आयुक्त, विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता

माहिती व मार्गदर्शन केंद्र, अमरावतीच्या सौ.प्रांजली बारस्कर, वाशिमचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.योगेश पोहोकार,  कला महाविद्यालयोच प्राचार्य डॉ.सुरेश बाठे होते. सर्वप्रथम मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

  प्रथम सत्रामध्ये डॉ.राजेश बुरंगे  यांनी "राष्ट्रीय सेवा योजना आणि व्यक्तीमत्व विकास या विषयावर राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत उपस्थित जिल्हयातील सर्व स्वयंसेवक युवक व युवतींना पीपीटी सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण आपले व्यक्तीमत्व चांगल्या प्रकारे घडवू शकतो. या माध्यमातून समाजसेवा तसेच देशसेवा करण्याची संधी आपल्या सर्वाना मिळत आहे. याचा आपण अवश्य लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. दुसऱ्या सत्रामध्ये सौ.प्रांजली बारस्कर  यांनी महास्वयंम पोर्टलवरील कौशल्य विकास व रोजगाराच्या विविध संधी" या विषयावर मार्गदर्शन केले. महास्वयंम पोर्टलवरील उपलब्ध सुविधांची माहिती सांगून उमेदवारांना या पोर्टलवर रोजगार/स्वयंरोजगाराच्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याबाबत सांगीतले. पोर्टलवर नोंदणी करून उमेदवारांना सेवायोजन कार्ड, कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार / स्वयंरोजगार कसा उपलब्ध करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.  जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील यांनी यांनी "स्वयंरोजगाराचे मार्ग व शासकीय योजना" या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तदनंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक पुरूषोत्तम अंभोरे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर उपस्थित राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांचे महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयी सांगीतले.  कार्यक्रमाच्या शेवटी कॅप्टन डॉ.प्रशांत कोठे यांनी अध्यक्षीय भाषण केले. संचालन  जिजामाता महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.ज्ञानोबा कांदे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.भरत जाधव यांनी केले. सदर कार्यक्रमाकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा येथील अधिकारी व कर्मचारी तसेच जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा येथील प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

                                                                        *******

                 जिल्ह्यातील 33 मतदान केंद्रांवर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीसाठी मतदान

  • 21 डिसेंबर रोजी होणार मतदान, 22 डिसेंबर रोजी मतमोजणी

बुलडाणा,(जिमाका) दि.17 : जिल्ह्यात 21 डिसेंबर रोजी तेराही तालुक्यात 33 मतदान केंद्रांवर ग्रामपंचायतींच्या पोट निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. सदर निवडणूक 123 ग्रामपचांयतींच्या 166 रिक्त जागांसाठी घेण्यात येत आहे.  या निवडणूकीची मतमोजणी 22 डिसेंबर रोजी होणार आहे. मतमोजणी ठिकाण व वेळेस जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 11 व ग्रामपंचायत निवडणूक नियम 1959 चे कलम 7 ई नुसार मान्यता दिली आहे. मतमोजणी सुरू होण्याची वेळ 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता असणार आहे.

 मतमोजणीचे तालुकानिहाय ठिकाण : बुलडाणा-निर्वाचन विभाग, तहसिल कार्यालय बुलडाणा, चिखली : सभागृह तहसिल कार्यालय चिखली, सिं.राजा : निर्वाचन विभाग, तहसिल कार्यालय सिं. राजा, लोणार- तहसिल कार्यालय, मेहकर: सभागृह तहसिल कार्यालय, मोताळा : नविन सभागृह तहसिल कार्यालय, खामगांव : राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह, तहसिल कार्यालय, शेगांव: तहसिल कार्यालय, संग्रामपूर : तहसिल कार्यालय, नांदुरा: पंचायत समिती  येथील कक्ष क्रमांक 1 समोरील खोली, दे. राजा : निर्वाचन विभाग, तहसिल कार्यालय, जळगांव जामोद : निर्वाचन विभाग, तहसिल कार्यालय, मलकापूर : निर्वाचन विभाग, तहसिल कार्यालय.

            तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या व रिक्त पदे : बुलडाणा-ग्रा.पं संख्या 2 व रिक्त पदे 2, चिखली: ग्रा.पं संख्या 11 व रिक्त पदे 15, दे .राजा: ग्रा.पं संख्या 5 व रिक्त पदे 6, सिं. राजा : ग्रा.पं संख्या 4 व रिक्त पदे 4, मेहकर : ग्रा.पं संख्या 17 व रिक्त पदे 32, लोणार : ग्रा.पं संख्या 8 व रिक्त पदे 8, खामगांव : ग्रा.पं संख्या 15 व रिक्त पदे 22, शेगांव: ग्रा.पं संख्या 7 व रिक्त पदे 7, जळगांव जामोद : ग्रा.पं संख्या 8 व रिक्त पदे 14, संग्रामपूर : ग्रा.पं संख्या 7 व रिक्त पदे 10, मलकापूर : ग्रा.पं संख्या 12 व रिक्त पदे 13, नांदुरा : ग्रा.पं संख्या 13 व रिक्त पदे 18, मोताळा : ग्रा.पं संख्या 14 व रिक्त पदे 15.

                                                                                                ****   

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा दौरा

बुलडाणा,(जिमाका) दि.17 : राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे व खार जमिन विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार 18 डिसेंरब रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वा फर्दापूर जि. औरंगाबाद येथून मोताळाकडे प्रयाण, सकाळी 11 वा मोताळा येथे आगमन व आठवडी बाजार येथील सभेस उपस्थिती, दु 12.30 वा मोताळा येथून खुल्लोड ता. सिल्लोड जि औरंगाबाद कडे प्रयाण करतील.

                                                            ******            

  


No comments:

Post a Comment