जळगाव जामोद मतदारसंघात दोन नवीन मतदान केंद्र; मतदारांनी आपल्या मतदान केंद्राची माहिती करुन घेण्याचे आवाहन

 

जळगाव जामोद मतदारसंघात दोन नवीन मतदान केंद्र;

मतदारांनी आपल्या मतदान केंद्राची माहिती करुन घेण्याचे आवाहन

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 14:  विधानसभा निवडणूकीत मतदारांना मतदान करणे सोईचे व्हावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारसंघात मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार 27- जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात भिंगारा व संग्रामपूर येथे नवीन मतदार केंद्राची निर्मिती करण्यात आली असून आता जळगाव जामोद मतदारसंघात 317 मतदान केंद्र झाले आहेत. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान करावे. यासाठी मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

मतदान केंद्राच्या रचनेत सुसूत्रता आणण्यासाठी ज्या मतदान केंद्रांवर मर्यादेपेक्षा जास्त मतदार आहेत  किंवा दोन गावातील मतदार एकाच मतदान केंद्रांना जोडण्यात आलेले होते, असे सर्व मतदान केंद्र मिळून जिल्ह्यात नव्याने 23 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. जळगाव जामोद मतदार संघात दोन नवीन भिंगारा व संग्रामपूर येथे मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात 317 मतदान केंद्र झाले असून शहरी भागात 82 तर ग्रामिण भागात 235 मतदान केंद्र आहेत. नवीन मतदान केंद्राच्या निर्मितीमुळे कुटुंबातील सर्व मतदारांची नावे एकाच मतदान केंद्रावर उपलब्ध होणार आहेत.

 

   लोकसभेला जिल्ह्यात 2 हजार 265 मतदान केंद्रे होती. यात 23 नवीन मतदान केंद्रांची वाढ होऊन 2 हजार 288 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. दि. 1 जुलै 2024 अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्र सुसूत्रीकरणांतर्गत मतदान केंद्रात वाढ करण्यात आली आहे.

 

मतदारसंघात दोन नवीन मतदार केंद्राची वाढ

 

1.         गोमाल वस्ती कुवरदेव मतदान केंद्राला संलग्न आहे. मात्र कुंवरदेव गोमाल पासून रस्त्याने सात किमी अंतरावर आहे. दळणवळणासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने आणि भिंगाराचे एरियल अंतर सुमारे 2 किमी पेक्षा जास्त आहे. गोमाल वस्तीतील मतदारांसाठी कुवरदेवच्या तुलनेत भिंगारा येथे मतदान केंद्र दिल्यास त्यांना सोयीचे होईल, अशी गोमाल वस्तीमधिल मतदारांची मागणी होती. त्यामुळे भौगोलिक परिस्थितीनुसार व मतदारांच्या मागणीनुसार 5- भिंगारा-जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा खोली क्र. 2 येथे नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे.

2.         166- संग्रामपूर ग्रामीण मतदान केंद्रावर 1400 पेक्षा जास्त मतदार झाल्यामुळे 168-संग्रामपूर जिल्हा परिषद हायस्कुल दक्षिण भागातील  खोली क्र.2 येथे नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.

 

प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार 6 हजार 429 नवमतदार

 

 27- जळगाव जामोद मतदारसंघात 3 लक्ष 6 हजार 414 मतदार असून त्यामध्ये 1 लक्ष 59 हजार 505 पुरुष तर 1 लक्ष 46 हजार 905 महिला व 4 तृतीयपंथी मतदार आहेत. 85पेक्षा जास्त वयोमान असलेले मतदार 3 हजार 289 असून 1 हजार 330 पुरुष तर 1 हजार 959 महिला मतदार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये प्रथमच मतदानाचा हक्क बजावणारे 6 हजार 429 नवमतदार असून 3 हजार 991 पुरुष तर 2 हजार 438 महिला नवमतदार आहेत.

 

मतदान यादीत नाव असल्याची मतदारांनी खात्री करावी- जिल्हाधिकारी

 

भारत निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार दि. 20 नोव्हेबर 2024 रोजी मतदान होणार आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी मतदान करावे. यासाठी मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करुन घ्यावी. मतदार केंद्र जाणून घेण्यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲप किंवा voters.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच मतदार नोंदणी किंवा मतदान केंद्राची माहिती शोधण्याच्या बाबतीत काही मदत हवी असल्यास 1950 या टोल फ्री क्रमांक किंवा जळगाव जामोद मतदारसंघासाठी हेल्प लाईन क्रमांक 18002336365 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.  00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या