Wednesday 5 August 2020

DIO BULDANA NEWS 5.8.2020

बिटी कापूस पिकावरील रस शोषक किडींचे व्यवस्थापन करावे कृषि विभागाचे आवाहन बुलडाणा,(जिमाका) दि.5: कापूस पिकावर सुरूवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि फुलकिडे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव या दिवसांमध्ये आढळून येतो. तर तुडतुड्याच्या प्रादुर्भाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून व फुलकिड्यांचा ऑगस्टच्या पहिला आठवड्यापासून आढळून येतो. या असतात रस शोषक किडी : मावा – मावा ही किड रंगाने पिवळसर किंवा फिक्कट हिरवी असून आकाराने अंडाकृती गोल असते. मावा खालच्या बाजुने आणि कोवळ्या शेंड्यावर समुहाने राहून त्यातील रसशोषन करते. प्रादुर्भावग्रस्त पाने प्रथम निस्तेज होवून नंतर कोकडतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. या शिवाय मावा आपल्या शरीरातून गोड चिक्कट द्रव बाहेर टाकतात. त्यामुळे झाडे चिकट व काळसर होतात. तुडतुडे : फिकट हिरव्या रंगाचे असून पाचरीच्या आकाराचे असतात. तुडतुड्यांच्या पिल्लांना पंख नसतात व ते नेहमी लांबीला तिरके असतात. तुडतुडे पानाच्या खालच्या बाजुला राहून त्यातील रस शोषन करतात. अशी पाने प्रथम कडेने पिवळसर होवून नंतर तपकिरी रंगाचे होतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपूर्णपणे लाल तांबडी होवून त्यांच्या कडा मुरगळतात. परिणामी झाडाची वाढ खुंटते. अशा झाडांना पात्या, फुले व बोंडे कमी प्रमाणात लागतात. फुलकिडे : फुलकिडे आकाराने लहान लांबोळी असून त्यांची लांबी 1 मि.मी किंवा त्यापेक्षा कमी असते. रंग फिक्कट पिवळा किंवा तपकिरी असतो. फुलकिडे आणि त्यांची पिले कपाशीच्या पानावरील आणि बोंडावरील हिरवा भाग खरडून त्यातून निघणारा रस शोषण करतात. प्रथम तो भाग पांढुरका व नंतर तपकिरी होतो. झाडाची वाढ खुंटते व बोंडे चांगली उमलत नाही. रसशोषक किडींसाठी कपाशीचे पिकाचे प्रादुर्भाव बाबत सवेक्षण करावे. सरासरी संख्या 10 मावा / पान किंवा 2 ते 3 तुडतुडे / पान किंवा दहा फुलकिड / पान किंवा मावा, तुडतुडे आणि फुलकिडे यांची एकत्रित सरासरी संख्या 10 पान किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाची वापर करावा. असे करा व्यवस्थापन : वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त फांद्या, पाने इतर पालापाचोळा जमा करून किडींसहीत नष्ट करावा. कपाशीचे पीक हंगामाबाहेर घेण्याचे टाळावे. कारण त्यामुळे किडींना अखंड अन्नपुरवठा उपलब्ध होत राहून त्या पुढील हंगामातील पिकांवर लवकर आक्रमण करून सहज वाढु शकतात. कापूस पिकाची योग्य फेरपालट करावी. पानावर लव असलेल्या बिटी कपाशीच्या संकरीत जातीची निवड करावी. अशा जाती तुडतुड्यांना प्रतिकारक असून त्यामुळे आपल्या रासायनिक किटकनाशकाच्या फवारणीची संख्या हमखास कमी करता येते. कपाशीत चवळीचे पिक आंतर पिक घ्यावे. या चवळी पिकावर कापूस पिकावरील किडींच्या नैसर्गिक शत्रु किटकांचे पोषण होईल. वेळेवर आंतर मशागत करून पीक तणविरहीत ठेवावे. त्यामुळे किडींच्या पर्यायी खाद्य तणांचा नाश होईल. तसेच बांधावरील किडींच्या पर्यायी खाद्य तणे अंबाडी, रानभेंडी आदी नष्ट करावी. मृद परीक्षणाच्या आधारावर खत मात्रेचा अवलंब करून दोन ओळीतील दोन झाडातील अंतर योग्यतेचे ठेवावे. जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा. जेणेकरून कपाशीची अनावश्यक कायीक वाढ होणार नाही आणि पीक दाटणार नाही पर्यायाने अशा पीकावर किडही कमी प्रमाणात राहील. बिटी कापूस बियाण्याला ईमीडाक्लोप्रीड किंवा थायोमेझोक्साम किटकनाशकांची बिज प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे रस शोषक या किडीपासून सर्वसाधारण 2 ते 3 आठवड्यापर्यंत संरक्षण मिळते. म्हणून या काळात किटकनाशकांची फवारणी करू नये. रस शोषक किडीवर उपजिवीका करणारे नैसर्गिक किटक उदा. सीर फीड माशी, कातीन, ढालकिडे, क्रायसोपा, ॲनॅसयीस प्रजातीचा परोपजीवी किटक आदी संख्या पुरेशी आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा. लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा ॲझाडीरेक्टीन 0.03 टक्के निंबोळी तेल आधारीत डब्ल्यु एस.पी 30.00 मिली किंवा ॲझाडीरेक्टीन 5.00 टक्के 20 मिली फवारणी करावी. या सर्व उपाययोजनांचा अवलंब करूनही किडींना आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्याचे आढळून आल्यास खालील कोणत्याही एका किटकनाशकाची 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने त्यांचा वापर करावा. बुप्रोफेजीन 25 टक्के प्रावाही 20 मिली, डॉयफेथ्युरॉन 50 टक्के पाणी मिसळून भुकटी 12 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5 टक्के 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली, मोनोक्रोटोफॉस 15 टक्के दाणेदार 26.5 ग्रॅम, मोनोक्रोटोफॉस 36 टक्के 8.75 मिली, असीफेट 50 टक्के अधिक ईमिडाक्लोप्रीड 1.8 टक्के 20 मिली, क्लोरपायरीफॉस 50 टक्के अधिक सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मि.ली फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी, बुलडाणा यांनी केले आहे. ***** एस. टी महामंडळाच्या मालवाहतूक सुविधेचा लाभ घ्यावा विभाग नियंत्रक यांचे आवाहन बुलडाणा,(जिमाका) दि.5: सद्यस्थितीत जगभरात व राज्यात कोविड -19 या साथरोगाचा वाढता प्रादुर्भाव वाढलेला आहे. अशा परिस्थितीत एस.टी महामंडळाची प्रवाशी वाहतूक सद्यस्थितीत काही अंशीच सुरू आहे. त्यामुळे महामंडळाने माल वाहतूकीचे क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. कोविड या साथरोगाच्या अत्यंत बिकट संकटात माल वाहतुकीकरीता एस. टी महामंडळ अगदी शेतकऱ्यांच्या शेतमालापासून ते व्यापारी, दुकानदार, लहान मोठे कारखानदार या सर्वांच्या माल वाहतूकीची जबाबदारी आता एस.टी महामंडळाने विधीवत स्वीकारली आहे. संपूर्ण राज्यात कुठेही 24 तास अविरहीत सेवा, पारदर्शकता, सुरक्षितपणे, वक्तशीर व माफक दरात माल वाहतुक सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी एस. टी महामंडळाच्या माल वाहतूक सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment