DIO BULDANA CM NEWS 10.8.2020


 

आरोग्य सुविधांना प्राधान्य हीच राज्य शासनाची प्राथमिकता

-         मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  • वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव द्यावा, लगेच मंजूरात
  • कोरोनाशी लढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स
  • आरोग्य क्षेत्राशी निगडीत सर्व विभागांतील रिक्त पदे भरणार

बुलडाणा, (जिमाका) दि. 10 : कोरेानामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. बहुतेक सर्वच कामांमध्ये ‘ऑनलाईन’ तंत्राचा वापर होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सर्वच कामांमध्ये आरोग्य सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण हीच राज्य शासनाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालयाच्या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात केले. आरोग्य सुविधांचे बळकटीकरण व निर्मिती करतांनाच प्रशिक्षीत वैद्यकीय मनुष्यबळ तयार करणे आवश्यक असून त्यासाठी बुलडाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास आपण लगेचच मान्यता देऊ असे आश्वासनाची यावेळी श्री. ठाकरे यांनी दिले.

  बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालय व देऊळगांव राजा येथील कोविड हेल्थ सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जि.प अध्यक्षा मनिषाताई पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, राजेश एकडे, दे. राजा नगराध्यक्षा सुनीताताई शिंदे, बुलडाणा कृउबास सभापती जालींधर बुधवत, जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, मो. सज्जाद आदी मान्यवर उपस्थित होते.

   यावेळी पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रास्ताविकात बुलडाणा येथील स्त्री रूग्णालय व देऊळगांव राजा येथील टाटा ट्रस्टच्या सहयोगातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर इमारतीची वैशिष्ट्ये सांगितली. तसेच या कामी टाटा समुहाने केलेल्या सहयोगाबद्दल आभार व्यक्त केले. तसेच जिल्ह्यात कोविड चाचणी प्रयोगशाळा उभारणीचे काम सुरू असून ते ही लवकरच पुर्णत्वास येईल, अशी माहिती दिली. त्याच बरोबर या आरोग्य सुविधांच्या निर्मितीमुळे कोविड रूग्णालय व कोविड केअर सेंटर येथे अनुक्रमे 100 व 20 खाटांची सोय झाल्याचेही स्पष्ट केले. तसेच बुलडाणा जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी द्यावी, अशी मागणीही मांडली.  

   त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई- लोकार्पण करून दोन्ही रूग्णालय उपलब्ध सुविधांची चित्रफीत दाखविण्यात आली. आपल्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, की तंत्रज्ञानामुळे सगळे जण आपपल्या ठिाकाणाहून कार्यक्रमात सहभागी होत आहेत, हे तंत्रज्ञानामुळे. कोरोनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. एकीकडे दैनंदिन कामकाज सुरू ठेवणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे लोकांचे प्राण वाचविणे हे ही अत्यंत महत्वाचे आहे. हे अत्यंत महत्वाचे काम सर्वांच्या सहभागातनूच होऊ शकते. सगळ्यांच्या सहभागातूनच हा ‘गोवर्धन’ आपण उचलु शकतो. अशा कार्यात सहभाग दिल्याबद्दल टाटा समुहाला श्री. ठाकरे यांनी धन्यवाद दिले.

    मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की कोरोनामुळे ऑनलाईन तंत्राचा वापर शिक्षणापासून ते कार्यालयापर्यंत सर्वत्र होऊ लागला आहे. बुलडाणा व देऊळगांव राजा येथे उभारण्यात आलेल्या रूग्णालयाच्या इमारत बांधकामाचे कौतुक करून श्री. ठाकरे म्हणाले, केवळ अद्यावत सुविधा उपलब्ध केल्या म्हणजे रूग्ण बरा होत नाही. त्यासाठी आवश्यक डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडीकल स्टाफ यासारख्या प्रशिक्षीत मनुष्यबळाची निर्मितीही आवश्यक आहे. त्यासाठीच बुलडाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा प्रस्ताव द्या, त्यास लगेचच मान्यता देऊ अशा शब्दात त्यांनी आश्वस्त केले. कोविड वरील उपचारांसाठी आवश्यक औषधांची उपलब्धता, ऑक्सिजन उपलब्धता, प्राणरक्षक औषधे यासारख्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शासनाने जिल्हास्तरीय टास्क फोर्स तयार केला आहे. या टास्क फोर्सला असणाऱ्या कोणत्याही मार्गदर्शनासाठी ते विनाविलंब मुंबई स्थित टास्क फोर्ससी संपर्क साधुन मदत मिळवू शकतात; असेही त्यांनी सांगितले. कोरोना विषाणू हा अत्यंत घातक आहे. तेव्हा सगळयांनी काळजी घ्यावी. असा आपुलकीचा सल्लाही त्यांनी दिला.

  आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे म्हणाले, टाटा समुहाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अद्ययावत रूग्णालय जिल्ह्यात सुरू होत असल्याबाबत आनंद आहे. जिल्ह्यात वैद्यकीय सेवेसाठी आवश्यक पदांची भरती अधिक गतिमानतेने पुर्ण करून सर्व रिक्त पदे भरू असा विश्वास ना. टोपे यांनी व्यक्त केला.

  यावेळी टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. श्रीनाथ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच खासदार प्रतापराव जाधव यांनीही आपले विचार मांडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीच्या मागणीचा पुनरूच्चार केला. स्वागतपर भाषण जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस यांनी केले. तर आभार प्रदर्शन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी केले.

                                                            ***********  

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या