Tuesday 24 March 2020

संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात संचारबंदी..!

संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात संचारबंदी..!
·        आदेश 31 मार्चपर्यंत लागू
·        जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने बंद
·        आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये
·        जिल्ह्याच्या सर्व सीमा सील
बुलडाणा, दि.24 : राज्यात  कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण जिल्ह्यात नागरी भागासह ग्रामीण भागात महसूल व वने, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या 23 मार्च 2020 च्या आदेशान्वये संचारबंदी 31 मार्च 2020 पर्यंत लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात यापूर्वीच  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यात 31 मार्च 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी काढले आहेत.
    नोवेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच या विषाणूचा संसर्ग होवून जीवित हानी होवू नये, या दृष्टीने जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे.  किराणा, अन्नधान्य, फळे व भाजीपाला, दुध, औषधे, दूरसंचार, विद्युत, पिण्याचे पाणी विक्री करणारी दुकाने, बँक व पेट्रोलपंप आदी जीवनावश्यक सेवा वगळता संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने 100  टक्के बंद राहतील. शासकीय व निमशासकीय कार्यालयात केवळ 5 टक्के कर्मचाऱ्यांवर कामकाज चालेल. जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद राहतील. आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच होम क्वारंटाईनमध्ये असणारे हातावर शिक्का असणारे व्यक्ती यांनी 15 दिवस घराबाहेर पडू नये. तसेच कोणत्याही व्यक्तीने अफवा, अपप्रचार व भिती निर्माण होईल अशी प्रतिक्रीया व्हॉट्सॲप, ट्विटर व फेसबुक आदी कोणत्याही पद्धतीने प्रसारीत करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत. या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांनी स्वत: नियमांचे पालन करावे. कुणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिला आहे.
  आदेश लागू नसणाऱ्यांबाबत आवश्यकतेनुसार संचार करण्यास मुभा राहील. तथापी सेवा देताना 2 व्यक्तींपेक्षा अधिक संख्या नसावी. तसेच ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहील आणि कोणत्याही परिस्थितीत दोन व्यक्तींमध्ये किमान 3 फुटाचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील, असेही आदेशात नमूद आहे.
या आदेशानुसार ही असणार मनाई
·        या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात मुक्त संचार करण्यास मनाई करण्यात येत आहे.
·        जिल्ह्याच्या सर्व सीमा अत्यावश्यक सेवा व वस्तुंशिवाय इतर सर्व बाबींसाठी बंदीस्त करण्यात येत आहे.
·        सर्व सार्वजनिक वाहतुक सेवा, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, टॅक्सी, ऑटो रिक्षा आदी बंद करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा व वस्तुकरीता टॅक्सी व ऑटो रिक्षा यांना केवळ एकच व्यक्तीला परवानगी असणार आहे.
·        सर्व खाजगी दुचाकी, तिन चाकी, चार चाकी वाहनांना जिल्ह्यामध्ये परिभ्रमणास बंदी असणार आहे. अत्यावश्यक सेवा व वस्तु , वैद्यकीय सेवांकरीता चालकाशिवाय केवळ एका व्यक्तीला परवानगी असणार आहे.
·        सर्व खाजगी बसेस यांचे परिभ्रमणास संपूर्णत: बंदी असणार आहे.
·        सर्व मंदीर, मस्जीद, दर्गे, चर्च, गुरूद्वारा आदी धार्मिक स्थळे बंद करण्यात येत आहे.
हा आदेश यांना लागू होणार नाही
·        शासकीय / निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम / आस्थापना यातील अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रूग्णालये, पॅथॉलॉजी लॅबोरटरी, सर्व प्रकारचे वैद्यकीय दवाखाने, नर्सिंग कॉलेज, बँक, एटीएम व वित्तीय संस्था, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी.
·         शासकीय धान्य गोदाम, शासकीय स्वस्त धान्य दुकाने, अत्यावश्यक किराणा सामान, जिवनावश्यक वस्तू विक्रीची ठिकाणे, दुध, धान्य दुकाने, भाजीपाला व फळे विक्रेते, बेकरी, औषधालय, दवाखाने, औषधालय, औषधी कंपन्या, रूग्णवाहिका, जनावरांचे खाद्य व औषधे विक्री ठिकाण, अंडी, मांस, मासे, शेती उत्पादाची वाहतुक व तत्सम ठिकाणे.
·         प्रसारमाध्यमांशी संबंधीत व्यक्ती, पत्रकार तसेच प्रसार माध्यमांचे कार्यालये.
·         पोस्ट ऑफीसेस, कुरीअर सेवा, टेलिफोन, इंटरनेट सेवा देणारे कर्मचारी, विद्युत व उर्जा तथा पेट्रोलीयम विभागाचे कर्मचारी, जि.प व न.प चे पिण्याचे पाणी पुरवठा, सफाई व अग्नीशमन कर्मचारी, पिण्याचे पाणी पुरवठा कर्मचारी, तसेच सर्व प्रकारचे होम डिलीवरी करणारे कर्मचारी (भोजनाचे डब्बे, ऑनलाईन शॉपींग कंपन्याची डिलीवरी करणारे कर्मचारी)
·         जिवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणारी वाहने (ट्रक आदी वाहने) या वाहनांसोबत बोर्ड/ कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.
·         शासकीय / निमसरकारी/ सरकारी कर्तव्यावर असणारे व 5 टक्के उपस्थितीचे आदेश असणारे अधिकारी / कर्मचारी.
·        सर्व हॉटेल्स/ लॉज यांना तेथे वास्तव असणाऱ्या ग्राहकांना आरोग्यविषयक ती खबरदारी घेऊन खाद्यपदार्थ बनवुन देण्यास परवानगी राहील.
·        कोव्हीड -19 ला रोखण्याकरीता पुर्वपरवानगीने अत्यावश्यक वस्तु व सेवा पुरवठा करणाऱ्या खाजगी संस्था.

No comments:

Post a Comment