Monday 16 March 2020

DIO BULDANA NEWS 16.3.2020


पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती
-         नितीन सुपेकर
·        जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन
बुलडाणा, दि. 16 : निसर्गात उपलब्ध असलेले पाणी मर्यादीत आहे. या पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाणी संपल्यास त्याची निर्मिती करणे शक्य नाही. तरी शक्यतो आपण पाण्याचा वापर नियंत्रीत करून पाणी वाचवावे. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे, असे प्रतीपादन जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर यांनी आज केले.
  गतवर्षीच्या सिंचनात 10 टक्के वाढ करणे व उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनप्रबोधन करण्याच्या मुख्य उद्देशाने 16 ते 22 मार्च 2020 कालावधीत जलजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचे उद्घाटन आज बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, बुलडाणा कार्यालयात पार पडले. त्यावेळी अधिक्षक अभियंता बोलत होते.
     याप्रसंगी कार्यकारी अभियंता सुनील चौधरी, एम.एस कदम, एस.डी राळेकर, सहायक अधिक्षक अभियंता तुषार मेतकर, राहुल आवारे, अ. प्र. वानखेडे, यो. ज. कापडणीस, उपकार्यकारी अभियंता विजयसिंग राजपूत, शाखा अभियंता अनिल खानझोडे आदींसह जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचारी, अशासकीय सदस्य चंद्राकांत साळुंके उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील खडकपूर्णा, पैनगंगा, वान, मन, नळगंगा, पुर्णा, ज्ञानगंगा, विश्वगंगा या प्रमुख नद्यांमधील पाण्याचे जलपूजन छोटेखानी स्वरूपात करण्यात आले. कार्यक्रमावेळी अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर यांनी उपस्थितांना जलप्रतिज्ञा दिली.
   देशात कोरोना विषाणूचा होत असलेला वाढता प्रसार लक्षात घेता, जिल्हाधिकारी यांनी जास्तीत जास्त जनसमुदाय टाळण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे यावर्षी जलजागृती सप्ताहाचे आयोजन मर्यादीत स्वरूपात करण्यात आले आहे. या बदलत्या मोठा जनसमुदाय जमा होईल, असे कार्यक्रम न घेता ध्वनीफित, जलजागृती करणारे फ्लेक्स लावणे याबाबत फेरनियोजनही करण्यात आले आहे.  कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार होवू नये म्हणून 20 मार्च 2020 रोजी आयोजित केलेली जल दौड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन अशासकीय सदस्य चंद्रकांत साळुंके यांनी केले. कार्यक्रमाला विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                                        *******
     सॅनिटायझर व मास्कच्या साठ्याबाबत बैठक संपन्न
बुलडाणा, दि. 16 : आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशातंर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधीत रूग्ण आढळत आहेत. आंतरराष्‍ट्रीय स्तरावरून व देशातंर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचे संशयीत रूग्ण जिल्ह्यात आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूंचे संसर्गात अधिक वाढ होवू न देता त्यावर  प्रतिबंधात्कम उपायोजना करणे. जिल्ह्यात सॅनीटायझर व मास्कचा साठा, पुरवठा आदीबाबत जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांची 13 मार्च रोजी केमीस्ट भवन बुलडाणा बैठक पार पडली.
  बैठकीत कुणीही मास्क व सॅनीटायझरची विक्री चढ्या दराने न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांनी आपणाकडे असलेल्या स्वच्छ रूमालाचा वापर करावा. बाहेरचे अन्न खाण्याचे टाळावे व पेय सेवन करण्याचे टाळावे. दिवसातून कमीत कमी तीन ते चार वेळेस किंवा लोखंडी, इतर वस्तुंना हात लागत असल्यास काम झाल्यानंतर त्वरित साबणाने हात योग्य त्या पद्धतीने स्वच्छ करावे. जेणेकरून हातावरील जिव जंतुचा प्रादुर्भाव इतर भागास होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच शक्यतोवर आपले हात चेहऱ्यावर लावणे टाळावे. शिंकतांना व खोकलतांना आपल्या नाकावर व तोंडावर स्वच्छ रूमालाचा वापर करावा, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले, असे सहाय्यक आयुक्त गजानन घिरके यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                            *****
    आरटीई प्रवेशासाठी आज ‘व्हीसी’
बुलडाणा, दि. 16 : बालकांच्या सक्तीच्या व शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत खाजगी शाळांमध्ये प्रवेशाच्या 25 टक्के जागा ह्या वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील बालकांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने शासनाकडून दरवर्षी संपूर्ण राज्यामध्ये एकाचवेळी आरटीई 25 टक्के प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे प्रचलीत पद्धतीनुसार आरटीई 25 टक्के सोडत काढण्यात येणार नसून नोव्हेल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता, यावर्षीची आरटीई 25 टक्के प्रवेशाची लॉटरी ही 17 मार्च रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे उपस्थितीत व्ही.सी द्वारे काढण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व आरटीई प्रक्रिया राबविणाऱ्या शाळा, पंचायत समिती कार्यालये व पालक यांनी याची नोंद घ्यावी.
   लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित झाल्यानंतर पालकांना याबाबतचा संदेश त्यांनी रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात येतो. तथापि, काही तांत्रिक अडचणीमुळे पालकांना प्रवेशाबाबतचा संदेश न आल्यास, पालकांनी www.rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट दिल्यास प्रवेशाबाबतची सद्यस्थिती पाहता येते. तसेच लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित झाल्यानंतर पालकांना पंचायत स्तरावर असलेल्या कागदपत्र पडताळणी समितीकडे जावून कागदपत्रांची पडताळणी करून घेवून, शाळेत जावून प्रवेश निश्चित करावा. नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, पालकांनी कागदपत्र पडताळणी समितीकडे एकाच वेळेस जावून गर्दी करू नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे.
****
‘बीएस फोर’ मानकांच्या वाहनांची नोंदणी 31 मार्चपर्यंत पूर्ण करावी
·        1 एप्रिल पासून नोंदणी बंद
    बुलडाणा, दि. 16 : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2020 पासून भारत स्टेज 6 मानकांची पुर्तता न करणाऱ्या वाहनांची नोंदणी करण्यात येवू नये, याबाबत सुचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार सर्व बीएस (IV)  फोर वाहनांची नोंदणी व क्रमांक घेण्याची संपूर्ण प्रक्रिया 31 मार्च 2020 पर्यंत पुर्ण करणे बंधनकारक आहे.
    तसेच बीएस फोर वाहनांना जारी करण्यात आलेले तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्राची वैधता 31 मार्च 2020 पर्यंतच राहणार आहे. सदर तात्पुरते नोंदणी व नविन नोंदणी करणाऱ्या बीएस फोर वाहन धारकांनी 31 मार्च 2020 पुर्वीच वाहन नोंदणीची व नोंदणी क्रमांक घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. याची सर्व बीएस फोर वाहनधारक जनतेने नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.


                                                                       *****

No comments:

Post a Comment