Thursday 19 March 2020

DIO BULDANA NEWS 19.3.2020

कोरोना विषाणू प्रसार पार्श्वभूमी : सामुहिक भोजन व धार्मिक कार्यक्रम बंद
·        31 मार्चपर्यंत कार्यक्रम स्थगित
बुलडाणा, दि. 19 : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या उपायोजनांचा एक भाग म्हणून साथरोग अधिनियम 1897 मधील तरतूदींनुसार जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, सर्व नगरपंचायत क्षेत्रातील व जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील सर्व मंदीर, गुरूद्वारा, चर्च, मस्जिद या ठिकाणी होणारी गर्दी व त्याठिकाणी सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्रीच्या वेळी होणारी प्रार्थना, आरती, भजन, नमाज, मास आदी, तसेच सदर ठिकाणी होणारे सामुहिक भोजनाचे कार्यक्रम व धार्मिक कार्यक्रम 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्यात येत आहे.
   जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही भारतीय दंडसंहीता कलम 188 नुसार दंडनिय कारवाईस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
                                                                        ******
                              कोरोना विषाणू प्रसार पार्श्वभूमी : शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना बंद
·        31 मार्चपर्यंत राहणार बंद
बुलडाणा, दि. 19 : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या उपायोजनांचा एक भाग म्हणून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील तरतूदींनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून  गर्दी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार सामुदायिक कार्यक्रमास प्रतिबंध करण्यात येत आहे. या कायद्यान्वये जिल्ह्यातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्यात येत आहे. या मधून अत्यावश्यक किराणा सामान, दुध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तु, औषधालय  यांना वगळण्यात आले आहे.  
   जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही भारतीय दंडसंहीता कलम 188 नुसार दंडनिय कारवाईस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
                                                                                    ********

खरीप 2020 मध्ये स्थानिक पातळीवर सोयाबीन बियाणे उपलब्धतेसाठी काळजी घ्यावी
·        कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 19 :  जिल्हयातील सोयाबीन पिकाखालील सरासरी क्षेत्र 2.08 लाख हेक्टर आहे. सन 2019 खरीप हंगामात 3.71 लाख हेकटर सोयाबीन पिकाची पेरणी झाली असून या पिकाखालील पेरणी क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे वाढणा-या क्षेत्रासाठी जास्तीच्या बियाण्याची गरज भासणार आहे. राज्यामध्ये सन 2019 मध्ये उशीरा पाऊस व सोयाबीन पिकाच्या काढणीच्या कालावधीतील अवेळी पावसामुळे सोयाबीन बियाणे उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बिजोत्पादन क्षेत्रावर उत्पादन झालेले बियाणे व तसेच राज्यातील शेतक-यांनी मागील दोन हंगामामध्ये प्रमाणीत बियाण्याची पेरणी करून उत्पादीत केलेले बियाणे हे पुढील खरीप 2020 साठी व्यवस्थीतपणे राखीव ठेवणे/ साठा करुन ठेवणे गरजेचे आहे.
    सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक असल्याने राज्यात पेरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाणाचेअसल्याने दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणीत बियाण्यापासून उत्पादीत होणारे सोयाबीन हे बियाणे म्हणून शेतक-यांनी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होवू शकतो. प्रमाणीत बियाण्यापासून उत्पादीत चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची चाळणी करून निवड करावी. सोयाबीन बियाण्याची बाहयावरण कवच नाजुक व पातळ असल्याने त्याची हाताळणी काळजीपुर्वक करावी. साठवण करण्यापुर्वी बियाणे दोन ते तिन दिवस उन्हामध्ये ताडपत्री/ सिमेंटच्या खडयावर पातळ पसरुन चांगले वाळवावे व बियाण्यातील आद्रतेचे प्रमाण 9 ते 12 टक्के पर्यंत आणावे. सोयाबीन बियाणे साठवणूक
करण्यासाठी बियाण्याची घरगुती पध्दतीने उगवणशक्ती तपासावी आणी किमान 70 टक्के उगवणशक्ती असलेले बियाणे योग्य पध्दतीने साठवणूक करावे.
   वाळलेल्या बियाण्यातील शेंगा, फोलपटे,काडीकचरा, मातीखडे इत्यादी काढून ते स्वच्छ करावे. स्वच्छ केलेले बियाणे चांगल्या नविन पोत्यात साठवून ठेवावे. सोयाबीन बियाणे हवेतील आद्रता लवकर शोषून घेते त्यामुळे साठवणीचे ठिकाण थंड ओलविरहीत व हवेशीर असले पाहीजे. साठवणुकीसाठी प्लास्टीक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवतांना त्यांची
थप्पी सात फुटापेक्षा जास्त असणार नाही याची काळजी घ्यावी. बियाणे 100 किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास साठवणूक करतांना चार पोत्यांपेक्षा जास्त व 40 किलोच्या पोत्यांमध्ये भरलेले असल्यास 08 पोत्यांपेक्षा जास्त मोठी थप्पी लावू नये अन्यथा सर्वात खालच्या पोत्यातील बियाण्यावर जास्त वजन पड़न बियाणे फुटून त्यांची उगवणशक्ती कमी होते. पोत्यांची थप्पी जमीनीपासून 10 ते 15 सेंटीमीटर उंचीवर लाकडी फळयांवर लावावी. पोत्याची रचना उभ्या -आडव्या पध्दतीने करावी. म्हणजे हवा खेळती राहून बियाण्याची गुणवत्ता व उगवणशक्ती जास्त काळ टिकण्यास मदत होते. आवश्यकते नुसार बियाणे साठवण केलेल्या खोलीमध्ये किटकनाशक व बुरशीनाशकाचा वापर करावा तसेच उंदराचा उपद्रव टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. सोयाबीनच्या बियाण्याच्या पोत्यांची हाताळणी व वाहतूक काळजी पूर्वक करावी. पोती उंचावरून आदळली जाणार नाही याची काळजी घ्यावी. खरीप हंगाम 2020 मध्ये सोयाबीन उपलब्धतेची व्याप्ती वाढवावी व सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होवू नये,  यासाठी शेतकरी बांधवांनी उपरोक्त प्रमाणे काळजी घेण्याची आवश्यकता आहे,  असे आवाहन शेतकरी बंधूना कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद बुलडाणा अनिसा महाबळे यांनी केले आहे.
                                                                        ********

आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विनामूल्य स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण मिळणार
·        1000 रूपये दरमहा विद्यावेतन
·        30 मार्च 2020 पर्यंत अर्ज सादर करावे
बुलडाणा, दि. 19 :  राज्य शासनाच्या आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर, कॅम्प, परतवाडा जि. अमरावती येथे विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा  परीक्षेकरीता आदिवासी उमेदवारांची विनामूल्य प्रशिक्षणाद्वारे तयारी करून घेण्यात येते. प्रशिक्षण कालावधी हा साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा 1000 रूपये विद्यावेतनही देण्यात येते. तसेच प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येतो.
   या प्रशिक्षणाकरीता उमेदवार हा आदिवासी प्रवर्गातील असणे आवश्यक असून त्याचे वय 1 एप्रिल 2020 रोजी किमान 18 वर्ष पुर्ण परंतु 15 जुलै 2020 रोजी त्याने वयाची 30 वर्ष पूर्ण केलेले नसावे. तसेच त्याने किमान एस.एस.सी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तो सद्या कोणतेही शिक्षण अथवा प्रशिक्षण घेत नसावा. तरी सदर पात्रतेच्या इच्छुक उमेदवारांनी 1 एप्रिल 2020 पासून सुरू पहिल्या सत्रासाठी 30 मार्च 2020 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, जयस्तंभ चौक, मातोश्री मंगल कार्यालयामागे लालपूल जवळ, अचलपूर कॅम्प, परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती किंवा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व सहाय्य केंद्र, धारणी, जि. अमरावती येथे अर्ज सादर करावे.
   अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, एसएससी उत्तीर्णची गुणपत्रिका, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे http://rojgar.mahaswayam.in  संकेतस्थळावरील ऑनलाईन कार्ड, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास कार्यालयात नाव नोंदविल्याचे नोंदणी कार्ड आदी प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत प्रती व एक स्वत: चा पासपोर्ट आकाराचा फोटो जोडणे आवश्यक आहे. यापूर्वी सदर प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी यासाठी पुन्हा अर्ज करू नये. तरी इच्छूक व पात्र उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, अचलपूर, जि. अमरावती यांनी केले आहे.
                                                            ****
                                                                        कोरोना अलर्ट :
 जिल्ह्यात विदेशातून आलेले 42 नागरिक ‘होम क्वारंटाईन’
·        संशयीत व्यक्तीचा रिपोर्ट ‘निगेटीव्ह’
बुलडाणा, दि. 19 :  कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यात तीन आयसोलेशन कक्ष सज्ज ठेवले आहेत. तसेच विदेशातून आलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे.  त्यानुसार काल दि. 18 मार्च 2020 पर्यंत  विदेशातून आलेल्या 33 भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. तसेच आज दि. 19 मार्च 2020 रोजी 9 नवीन नागरिकांना त्यांच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.  अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 42 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे.
     दुबई येथून आलेले मलकापूर येथील रहीवासी वय 40 वर्ष यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात आयसोलेशन कक्षात संशयीत  म्हणून दाखल करण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट  नागपूर येथील प्रयोगशाळेतून निगेटीव्ह आला आहे.   खामगांव येथील आयसोलेशन कक्षात एकही संशयीत दाखल नाही.  अशी माहिती  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी दिली आहे.
--

No comments:

Post a Comment