Saturday 14 March 2020

DIO BULDANA NEWS 14.3.2020



करोना प्रादुर्भाव  पार्श्वभूमीवर सॅनिटायझर चा काळा बाजार करू नये
                                         - अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
बुलडाणा, दि. १४ : करोना विषाणुच्या प्रार्दुभावच्या पार्श्वभूमीवर बाजारात सॅनिटायझर (Sanitizer) चा तुटवडा होवू नये, काळाबाजार होवू नये, अवाजवी किंमतीत विक्री करण्यात येवू नये. कोणत्याही परिस्थितीत जास्त किमतीमध्ये विक्री न करता वाजवी किमतीत विक्री करावी, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या. 
 मुंबई येथे मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी मुंबई व कोकण विभागातील सर्व सॅनिटायझर उत्पादक व प्रमुख वितरकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सचिव डॉ.संजय मुखर्जी, आयुक्त अरुण उन्हाळे, विभागाचे सह आयुक्त, मुख्यालयाचे सह आयुक्त (औषधे) व इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच वीस उत्पादकाचे व प्रमुख वितरकाचे प्रतिनिधी हजर होते. सदर बैठकीत उत्पादकाकडे सध्याच्या परिस्थितीत किती साठा शिल्लक आहे. त्यांची उत्पादन क्षमता किती आहे, बाजारात मागणी किती प्रमाणात होत आहे याबाबतचा आढावा मंत्री महोदयांनी घेतला.
   तसेच कोणत्याही परिस्थितीत बाजारात सॅनिटायझर (Sanitizer) चा तुटवडा, काळाबाजार, जास्त किंमत आकारणी होणार नाही याबाबत सूचना देताना मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे म्हणाले,  कच्चा मालाचा तुटवडा तसेच पॅकिंग मटेरिअल जे प्रामुख्याने चीन येथून येत होते. त्याचा तुटवडा उत्पादकांना उत्पादन वाढवण्यास अडचणीचे कारण असल्याचे बैठकीत उत्पादकांनी सांगितले आहे. पम्प पॅकिंग बॉटल ऐवजी साध्या बॉटल वापरल्यास उत्पादकांना पॅकिंग मटेरियलचा तुटवडा भासणार नाही. इतर कच्चेमाल जसे अल्कोहोल, इतर रासायनीक द्रव्यांचा पुरवठादाराकडून पुरवठा होण्यास ज्या काही अडचणी असतील त्या संबधित विभागाशी संपर्क करुन तात्काळ तोडगा काढण्यात येईल. 
    सॅनिटायझर (Sanitizer), २ प्लाय /३ प्लाय सर्जिकल मास्क व एन-९५ मास्कचा समावेश केंद्र सरकारच्या अधिसूचना दि १३. ०३.२०२० अन्वये अत्यावश्यक वस्तु मध्ये करण्यात आल्याचे सर्व उपस्थितांच्या निदर्शनास आणले व याचा काळाबाजार केल्यास जिवनावश्यक वस्तु कायदा (EC ACT) च्या तरतुदी नुसार कडक कारवाई करण्यात येईल याचीही जाणिवही मंत्री महोदयांनी यावेळी करुन दिली.
  उत्पादकांनी त्यांच्या उत्पादन केलेल्या पाठावर कोणत्याही प्रकारचे प्रतिबंधित जाहिराती करु नये, असे आवाहनही मंत्री महोदयांनी केले. उत्पादकांनी व वितरकांनी त्यांच्याकडे असलेल्या उपलब्ध साठयाची माहिती दिली. सध्या बाजारात किरकोळ विक्रेत्याकडे सॅनिटायझर (Sanitizer) ची मागणी वाढली असून काही प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. मात्र वेळ प्रसंगी २-३ शिफ्ट (Shift) मध्ये उत्पादन व चाचणी विभाग सुरु ठेवण्याची तयारी उत्पादकांनी यावेळी दाखवली.
याप्रसंगी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment