Sunday 22 March 2020

जिल्ह्यात घरीच निरीक्षणाखाली ठेवलेल्या नागरिकांची संख्या आठने वाढली


कोरोना अलर्ट :

जिल्ह्यात घरीच निरीक्षणाखाली ठेवलेल्या नागरिकांची संख्या आठने वाढली
·        आतापर्यंत एकूण 55 नागरिक निरीक्षणाखाली
·        बुलडाणा आयसोलेशन कक्षात एक संशयीत दाखल
बुलडाणा, दि. 21 :  कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम लागू केला आहे. तसेच आपत्कालीन कायदाही लागू करण्यात आला आहे.  विदेशातून आलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे.  त्यामध्ये आठ नागरिकांची भर पडली आहे. त्यानुसार काल दि. 21 मार्च 2020 पर्यंत  विदेशातून आलेल्या 47 भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. तसेच आज दि. 22 मार्च 2020 रोजी 8 नवीन नागरिकांना त्यांच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 55 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे.
     जिल्ह्यात बुलडाणा आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात एक नागरिकाला संशयीत म्हणून दाखल करण्यात आले आहे. या नागरिकाचा स्वॅब व रक्त नमुने नागपूर प्रयोगशाळेत  तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.  जिल्हयात आतापर्यंत 72 विदेशी भारतीय नागरिक आले. त्यांचे निरीक्षण व तपासणी करण्यात आली. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या 2 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच बुलडाणा स्त्री रूग्णालयात 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर 9 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. खामगांव आयसोलेशन कक्षातून 3 व बुलडाणा आयसोलेशन कक्षातून 2 नागरिकांचे तपासणी नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले,  अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.
                                                                                    ***********
कोरोनाशी लढाई…. एकजुटीने लढूया…!
·        जनता कर्फ्युला 100 टक्के प्रतिसाद
·        शहरी भागासाह ग्रामीण भागात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने पाळला बंद
बुलडाणा, दि. 21 :  जिवघेण्या कोरोना आजाराने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. हे संकट आपल्या देशातही हळूहळू पाय पसरू लागले आहे. या संकटाचा धैर्याने व एकजुटीने सामना करण्यासाठी आज पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी ‘जनता कर्फ्यु’ पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही 100 टक्के जनता कर्फ्यु पाळण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांनीही आपले संपूर्ण व्यवहार बंद ठेवत स्वयंस्फुर्तीने पंतप्रधानाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. यावरून कोरोनाशी लढाई आपण एकजुटीने लढतोय.. याचा प्रत्यय आला.
    आज 22 मार्च रोजी सकाळपासूनच जनता कर्फ्युमध्ये नागरिकांनी सहभाग घेतला. बुलडाणा शहरात वर्दळीचे जयस्तंभ, संगम, कारंजा, एसबीआय चौक, बसस्थानक परिसर, बाजार लाईन निर्मनुष्य होते. खामगांव, मलकापूर, मेहकर, दे.राजा, सिं.राजा, लोणार, नांदुरा, शेगांव, जळगांव जामोद, संग्रामपूर व मोताळा शहरातही शुकशुकाट होता. चिखली शहरात अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे स्वत: फिरून बंदमध्ये सहभागी नागरिकांचे अभिनंदन करीत होते व आवाहन करीत होते.  
   ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूरांनीही आपले कामे बंद ठेवली. कुणीही शेतात गेले नाही. सर्वांनी या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग देण्याचा प्रयत्न केला. अनेक शेतमजूर महिलांनीसुद्धा कामाला जायला नकार दिला. कामगारांनीही घरीच राहून या राष्ट्रीय कार्यात आपले योगदान दिले. व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने, व्यवसाय बंद ठेवून संचारबंदी पाळली.  सर्वांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग दिल्यामुळे 100 टक्के जनता संचारबंदी यशस्वी झाली. पुणे, मुंबई येथून येणाऱ्या नागरिकांनी स्वत:हून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी. जेणेकरून ते स्वत:, त्यांचे नातेवाईक यांची सुरक्षीतता होईल, असे आवाहन चिखली शहरात दौऱ्याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी केले. या बंदच्या यशस्वीतेमुळे कोरोनाशी लढाई लढण्यास जनता सज्ज झाली असल्याचे निदर्शनास आले.
                                                                        *****
सेवानिवृत्तीधारकांच्या अडचणी दुरध्वनीवरच सोडविण्यात येतील
·        सेवानिवृत्तीधारकांनी कोषागार कार्यालयात येण्याची गरज नाही
·        जिल्हा कोषागार अधिकारी यांचे आवाहन
बुलडाणा, दि. 22 :  जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्तीवेतनधारकांनी सध्या पसरत चाललेल्या कोव्हिड -19 आजाराचा धोका लक्षात घेता, निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या शंका व अडचणी यांच्या संदर्भात कोषागार कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेट देण्याची गरज नाही.  त्यांनी आपल्या शंका व अडचणी यांच्या संदर्भात अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) यांच्या दूरध्वनी क्र ०७२६२ - २४५५१५ व भ्रमणध्वनी क्रमांक- 9822897805 या क्रमांकावर किंवा ई-मेल - to.buldhana @ zillamahakosh या ई-मेल आय डी वर संपर्क साधावा. कृपया प्रत्यक्ष वैयक्तिक भेटी टाळून दूरध्वनी आणि ई-मेल संपर्काचा सुरक्षित पर्यायाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांनी केले आहे.
                                                                                    ******
  

No comments:

Post a Comment