Friday 13 March 2020

कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू


कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू
·        साबणाने स्वच्छ हात धूवा, रूमाल वापरा
बुलडाणादि. 13 :  आंतरराष्ट्रीय व देशातंर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधीत रूग्ण आढळत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून व देशातंर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचे संशयीत रूग्ण बुलडाणा जिल्ह्यात आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. सदरील संशयीत रूग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती जिल्ह्यात उद्भवू नये यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 लागू करण्यात आला आहे.
   याबाबत अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
    कोरोना विषाणू संसर्गाबाबत सामाजिक माध्यमांमधून अफवा, गैरसमज पसरविणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. परदेशीय नागरिक अथवा परदेशातून प्रवास करून आलेले भारतीय नागरिक यांच्याबाबत संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला वेळोवेळी माहिती द्यावी. आरोग्य विभागाने कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती करावी. जनजागृतीपर साहित्य प्रकाशित करून वितरीत करावे. संशयीत रूग्णांसाठी स्वतंत्र ॲब्युलन्सची व्यवस्था करण्यात यावी. औषध विक्रेते यांनी जास्त भावाने मास्‍क विक्री, औषधांची साठेबाजी, संसर्गाबाबत चुकीचे समज पसरविणे याबाबत अन्न्‍ व औषध प्रशासन विभागाने कारवाई करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
      कोरोना विषाणू प्रसार थांबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहे. तसेच लग्न, धार्मिक कार्यक्रम यामध्येसुद्धा कर्मी गर्दी होण्यासाठी उपाययोजना कराव्यात.  नागरिकांनी स्वत:हून धार्मिक कार्य, लग्न समारंभ टाळावेत. याबाबत मंगल कार्यालय व्यवस्थापकांना सुचना देण्यात येत आहेत. कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी  प्रत्येकाने हात स्वच्छ धुवावे, आपला स्वच्छ रूमाल वापरावा. रूमाल ताबडतोब स्वच्छ करावा. गर्दीमध्ये जाणे टाळावे, असे आवाहनही यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये ही होवू शकते कारवाई
आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील 2005 कलम 34 नुसार जर एखाद्या व्यक्तीमुळे एखादी कुठली आपत्ती ओढावणार आहे, असे लक्षात आले, तर अशा व्यक्तीच्या हालचालींवर प्रतिबंध करता येतो. या कायद्याच्या अनुषंगाने आदेश काढले असल्यास व त्याचे पालन न केल्यास एका वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होवू शकते.              
अफवांवर विश्वास ठेवू नये
जिल्ह्यात कोरोना विषाणू संदर्भात अर्धवट माहिती असलेले, चुकीचे, भिती उत्पन्न करणारे संदेश सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. असे कोणतेही संदेश कुणीही अधिकृत स्त्रोतांकडून खात्री केल्याशिवाय पुढे पाठवू नका. तसेच आवश्यक असल्यास नागरिकांनी हेल्पलाईनला फोन करून शंका निरसन करावे. चुकीचे मेसेज पाठवू नये. अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाईचे निर्देश प्राप्त झालेले आहे. तरी कुणीही कोरोना विषाणू संदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नये. हेल्पलाईन क्रमांक : राष्ट्रीय कॉल सेंटर 911123978046, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष 020 26127394 व टोल फ्री क्रमांक 104 वर संपर्क साधावा. 
                                                                        *****
जिल्ह्यात 16 ते 22 मार्च  दरम्यान जलजागृती सप्ताह
·        विविध कार्यक्रमांचे आयोजन
·        जलसाक्षरेतेविषयी होणार प्रबोधन
बुलडाणा, दि‍. 13 - जिल्ह्यात 16 ते 22 मार्च 2020 दरम्यान मोठ्या प्रमाणावर जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सप्ताहादरम्यान मोठ्या प्रमाणावर जल जागृती, जलसाक्षरता करणारे कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये कार्यशाळा, व्याख्यान, जलदिंडी, वक्तृत्व, रांगोळी, निबंध व चित्रकला स्पर्धांचा समावेश आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनप्रबोधन करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. यासाठी विविध समित्यांचे गठन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने उत्साहाने भाग घेवून प्रयत्न करावेत, असे आवाहन अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर यांनी केले आहे.
    सप्ताहाचे उद्घाटन दि. 16 मार्च 2020 रोजी सकाळी 11 वाजता बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणा कार्यालयाच्या परिसरात  जिल्ह्यातील विविध नद्यांमधील पाण्याचे कलशपूजन करून व जलप्रतिज्ञेने करण्यात येणार आहे. यावेळी जलप्रतिज्ञेचे सामुहिक वाचन करण्यात येणार आहे.
   सप्ताहात 17 ते 21 मार्च दरम्यान प्रकल्पाचे लाभक्षेत्रातील प्रत्येक गावात एक कार्यशाळा किंवा चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. चर्चासत्रात गावाचे लाभक्षेत्र पाणी उपलब्धता, सिंचनाच्या पद्धती, पिकांना लागणारे पाणी बचत आदी विषयावर आधारीत माहिती देण्यात येईल. तसेच सिंचनाचे कायदे, नियम, पाणी वापर संस्थांची संपूर्ण माहिती, होणारे फायदे, तालुक्यातील सिंचनाचे प्रश्न, अपूर्ण प्रकल्पाच्या बांधकामाचे नियोजन, उपसा सिंचन परवाने याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
   सप्ताहात 20 मार्च रोजी वाटर रन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून साधारणपणे 2 ते 3 कि.मी लांब रन घेण्यात येणार आहे. शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत चित्रकला व वर्क्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. वाटर रन, चित्रकला व वर्क्तृत्व स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानी येणाऱ्या स्पर्धकांना रोख रकमेचे बक्षीस देण्यात येणार आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन, पाण्याचे महत्व, काटकसर व जनमानसात याबद्दल जागृती निर्माण करून त्याला लोकचळवळीचे स्वरूप देणे हा प्रामुख्याने उद्देश असल्याने सामान्य जनतेने वाटर रन स्पर्धा व इतर सर्व कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे  आवाहन कार्यकारी अभियंता सु. व चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. 
                                                                        ******
बंद पडलेल्या टपाल व ग्रामीण टपाल जीवन विमा पॉलीसी पुन्हा सुरू करता येणार
·        31 मार्च 2020 पर्यंत जवळच्या पोस्ट ऑफीसमध्ये लेखी अर्ज करावा
बुलडाणादि. 13 :  ज्या पॉलीसी धारकांच्या पॉलीसी सतत 5 वर्षे भरणा न केल्याकारणाने बंद पडलेल्या आहेत. त्या पॉलीसीचे पुनूरुज्जीवन 1 एप्रिल 2020 नंतर करता येणार नाही. त्यामुळे शेवटची संधी म्हणून शेवटच्या भरलेल्या प्रिमीयमच्या तारखेपासून 5 वर्षांची मर्यादा ओलांडलेल्या पॉलीसी 31 मार्च 2020 पर्यंत पुनरूज्जीवीत करण्यासाठी विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.  
   या संधीचा लाभ घेण्यासाठी पॉलीसी धारकांनी जवळच्या डाक कार्यालयाशी संपर्क साधावा. पोस्ट ऑफीस लाईफ इन्शुरन्स नियम 2011 मधील अटी व शर्तींच्या दुरूस्तीच्या अनुषंगाने अधिसूचना दि 19 सप्टेंबर 2019 च्या निवेदनानुसार पॉलीसीचे पुनरूज्जीवन करता येणार आहे. त्यासाठी पॉलीसी धारकांच्या चांगल्या आरोग्याच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता राहील.  अशा पॉलीसीचे पॉलीसीधारक ज्यांना विमा लाभ मिळविण्यासाठी पॉलीसी पुनरूज्जीवीत करण्याचा  विचार आहे, त्यांनी जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफीसमध्ये 31 मार्च 2020 च्या आधी लेखी अर्ज करावा. या तारखेनंतर पॉलीसीचे पुनरूज्जीवन केले जाणार नाही, त्यामुळे त्या पॉलीसीज नियमांनुसार रद्दबातल समजल्या जातील. अधिक माहितीसाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 18001805232 वर संपर्क करावा, असे आवाहन डाक अधिक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
****
जिल्हा सामान्य रूग्णालयात आयोजित इपिलेप्सी शिबिर रद्द
बुलडाणादि. 13 :  डॉ. सुर्या फाऊंडेशन मुंबई व जिल्हा सामान्य रूग्णालय, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने 15 मार्च 2020 रोजी इपिलेप्सी शिबिर जिल्हा सामान्य रूग्णालयात आयोजित करण्यात आले होते. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव सदर शिबिर रद्द करण्यात येत आहे. तरी या शिबिरासाठी नागरिकांनी  येवू नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
**********
--

No comments:

Post a Comment