Friday 20 March 2020

‘कोरोना’चे संकट सर्व मिळून पिटाळून लावूया - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे


·        22 मार्च रोजीच्या ‘जनता कर्फ्यु’मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे
·        मोर्चे, आंदोलने करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार
·        सॅनीटायझर, मास्कची साठेबाजी करू नये
·        लग्न समारंभ पुढे ढकलावे, नागरिकांनी सहकार्य करावे
बुलडाणा, दि. 19 : देश सध्या कोरोना विषाणूशी लढाई लढत आहे. सर्वत्र युद्ध पातळीवर कोरोनाशी लढण्याची सज्जता करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी शासनाच्या सुचनांचे पालन करून शासनास सहकार्य करावे. हे कोरोनाचे संकट सर्वांनी मिळून, एकजुटीने, संघटीतपणे लढा देत पिटाळून लावायचे आहे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.
   जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील – भुजबळ, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी आदी उपस्थित होते.
   देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 22 मार्च रोजी जनता कर्फ्युचे आवाहन केले असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, सर्व नागरिकांनी येत्या रविवार, 22 मार्च 2020 रोजी या जनता कर्फ्युमध्ये सहभागी व्हावे. जनतेनी सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत हा जनता कर्फ्यु राहणार आहे. नागरिकांनी स्वत:हून घरातच थांबावे. अत्यावश्यक काम असल्यासच बाहेर पडावे.  यादिवशी सायंकाळी नागरिकांनी घराबाहेर येवून कोरोना विषाणू लढाईत उतरलेल्या डॉक्टर्स, नर्सेसचा आत्मबळ वाढविण्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करावे. भविष्यात गरज पडल्यास शासकीय रूग्णालयांसोबत खाजगी रूग्णालयांमध्येही आरक्षण ठेवण्यात येणार आहे. याबाबत आएमए या संघटनेची नुकतीच बैठक घेण्यात आली असून सर्व डॉक्टर्संनी सहमती दर्शविली आहे.
   ते पुढे म्हणाले, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कोरोना विषाणूबाबत काय करावे ? व काय करू नये? यासंदर्भात फलक प्रत्येक खाजगी रूग्णालयाबाहेर व औषध दुकानाबाहेर लावण्यात यावेत. सॅनीटायझर व मास्कचा निश्चितच बाजारात तुटवडा आहे. अशा परिस्थितीत उत्पादक कंपन्यांशी बोलणे झाले आहे. त्यांना 24 तास उत्पादन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सॅनीटायझरपेक्षा साबणाने स्वच्छ हात धुवावे, मास्कऐवजी स्वच्छ रूमाल वापरला तरी चालेल. रूमाल धुवून पुन्हा वापरता येतो. स्त्री रूग्णालयात व्हेंटीलेटर, ऑक्सीजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. याठिकाणी विलगीकरण कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. शहरातील मंगल कार्यालये, केमीस्ट भवन यांनाही विलगीकरण कक्ष म्हणून आवश्यकतेनुसार वापरण्यात येणार आहे.
   सोशल मिडीयावर अफवा पसरविणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलीस दलाच्या सायबर सेलच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, कुणीही सोशल मिडीयावर खात्री केल्याशिवाय पोस्ट व्हायरल करू नये. सायबर सेलने अशा व्हॉट्सॲप संदेशावर लक्ष ठेवून तपासणी करावी व दोषींवर कडक कारवाई करावी. केंद्र शासनाने मास्क व सॅनीटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये केला आहे. त्यामुळे कुणीही या वस्तूंचा काळाबाजार, साठेबाजी व बनावटीकरण करू नये. असे आढळल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कुठे अशी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास दुकानांवर धाडी टाकण्यात येतील. कोरोना संदर्भात अत्यावश्यक खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून आवश्यकता पडल्यास निधी देण्यात येईल.
   लग्न समारंभ पुढे ढकलण्याचे आवाहन करीत पालकमंत्री म्हणाले, जास्त गर्दीच्या ठिकाणी जावू नका. कारण नसताना प्रवासही टाळावा. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पुढे गरज पडल्यास पानठेले, पाणीपुरी दुकानेसुद्धा बंद करावी लागतील. या काळात कुणीही मोर्चे, आंदोलने करू नये. या माध्यमातून जमाव जमविल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
                                                पुणे, मुंबई येथून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्याच्या सूचना
पुणे, मुंबई येथून जिल्ह्यात शेकडो नागरिक परत येत आहेत. या परतलेल्या नागरिकांची जिल्ह्यात एन्ट्री पाँईंटला तपासणी करण्यात यावी. लक्झरी, एसटी बसेस यांना याबाबत सुचीत करावे. तपासणी झाल्यानंतरच सदर बस पुढे सोडण्यात यावीत. जेणेकरून संशयीत असल्यास तिथेच कळेल व पुढील धोका टळेल, अशा सूचनाही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या.
                                                                                    ******
खाजगी रूग्णालयांनी विलगीकरण कक्षासाठी आरक्षण ठेवावे
-         पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
बुलडाणा, दि. 19 : कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन ठिकाणी आयसोलेशन कक्ष कार्यान्वीत आहेत. तसेच स्त्री रूग्णालयात विलगीकरण कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. मात्र भविष्यात आवश्यकता पडल्यास खाजगी रूग्णालयांनी त्यांचे बेड विलगीकरणसाठी आरक्षीत ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.
   जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली आयएमए (इंडियन मेडीकल असोसिएशन) या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील – भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत, आयएएमचे अध्यक्ष डॉ एस.एस राजपूत, केमीस्ट अँन्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे राज्याचे सचिव अनिल नावंदर, जिल्हाअध्यक्ष राजेंद्र नाहर, मेडीकल रिप्रेसेन्टेटीव्ह संघटनेचे अध्यक्ष श्री. मगर, औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन घिरके आदी उपस्थित होते.
   यावेळी जिल्ह्यातील कोरोना विषयी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा पालकमंत्री यांनी घेतला. मास्क, सॅनीटायझर साठा, पुरवठा, मागणी याबाबत आढावा घेत सुचना दिल्या. सोशल मिडीयावरील अफवा पसरविणाऱ्यांचा शोध घेवून कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
                                                                                                *****
स्त्री रूग्णालयातील विलगीकरण कक्षाची पालकमंत्र्यांकडून पाहणी
बुलडाणा, दि. 19 : कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे विलगीकरण कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. या रूग्णालयातील विलगीकरण कक्षाची पाहणी आज 20 मार्च 2020 रोजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत उपस्थित होते.
   यावेळी पालकमंत्री यांनी इमारतीमधील सुविधांची माहिती घेतली. विलगीकरण कक्षासाठी आवश्यक असलेल्या व्हेटीलेटर, ऑक्सीजन सुविधा लावण्यासंदर्भात संबंधीतांना सुचना दिल्या. इमारतीमधील नर्सींग स्टाफ, डॉक्टर्स, स्वच्छता, पाण्याची सुविधा आदींची माहितीही त्यांनी घेतली. इमारतीमधील विलगीकरण कक्ष सुसज्ज असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी  दिली.  याप्रसंगी संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                                                    *******
जलजागृती सप्ताहादरम्यान जलप्रतिज्ञा, हस्तपत्रके वितरण
बुलडाणा, दि. 19 : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जलजागृती सप्ताहाचे आयोजन मर्यादीत स्वरूपात करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या गर्दी न जमविण्याच्या आदेशाचे पालन करून छोटेखानी स्वरूपात जलजागृती सप्ताहात कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात खडकपूर्णा कालवे उपविभाग क्रमांक 2, चिखली येथे जलप्रतिज्ञा घेण्यात आली.
  तहसिल कार्यालय दे.राजा येथे जलजागृती सप्ताहानिमित्ताने कर्मचाऱ्यांना तहसिलदार सारिका भगत यांनी जलप्रतिज्ञा दिली. खडकपूर्णा प्रकल्प विभाग कार्यालयात जलप्रतिज्ञा घेण्यात आली. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी कार्यालय, मेहकर, व्याघ्र नाला कालवा विभाग मलकापूर, कार्यकारी अभियंता जिगांव प्रकल्प पुनर्वसन विभा खामगांव येथेही कर्मचाऱ्यांनी जलप्रतिज्ञा घेतली.
   त्याचप्रमाणे साखरखेर्डा येथे वाहनांवर जलजागृतीचे स्टीकर चिपकविण्यात आले. शेगांव शहरातील जगदंबा चौक, रेल्वे स्थानक, बस स्टँण्ड परीसर, अग्रसेन चौक आदी ठिकाणी जलजागृतीचे हस्तपत्रकांचे वितरण करण्यात येवून जलजागृती करण्यात आली. मलकापूर बस स्थानकावही जलजागृतीचे हस्तपत्रक प्रवाशांमध्ये वितरीत करण्यात आले. जलप्रतिज्ञेवेळी पाटबंधारे विभागाचे संबंधित कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
                                                            ***********
कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर बाल न्याय मंडळाची बैठक पुढे ढकलली
बुलडाणा, दि. 19 : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मा. उच्च न्यायालय, मुंबई व मा. जिल्हा न्यायालय बुलडाणा यांच्या परिपत्रक व निर्देशांनुसार 21 मार्च 2020 रोजी आशा बालकाश्रम, हिरडव रोड, लोणार येथे आयोजित बाल न्याय मंडळाची फिरती बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील अधिकारान्वये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 नुसार सदर तात्पुरती / फिरत्या बैठकीचे आयोजन 21 मार्च रोजी लोणार येथे करण्यात आले होते, असे प्रमुख दंडाधिकारी, बाल न्याय मंडळ, बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                        ******
कोरोना अलर्ट :
 जिल्ह्यात विदेशातून आलेले 46 नागरिक घरीच निरीक्षणाखाली
बुलडाणा, दि. 19 :  कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यात तीन आयसोलेशन कक्ष सज्ज ठेवले आहेत. तसेच विदेशातून आलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे.  त्यानुसार काल दि. 19 मार्च 2020 पर्यंत  विदेशातून आलेल्या 42 भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरी क्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. तसेच आज दि. 20 मार्च 2020 रोजी 4 नवीन नागरिकांना त्यांच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.  अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 46 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे.
     जिल्ह्यात सध्या कुणीच संशयीत आयसोलेशन कक्षात दाखल नाही. कुणीच संशयीत नसल्यामुळे नागपूरला प्रयोग शाळेत रिपोर्ट पाठविण्यात आलेला नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत यांनी दिली आहे.
                                                                                    ***** 

No comments:

Post a Comment