Thursday 26 March 2020

कोरोना अलर्ट : 26.3.2020

कोरोना अलर्ट :
                              जिल्ह्यातील 64 नागरिक घरीच निरीक्षणाखाली
  • होम क्वारंटाईनच्या संख्येत तीन जणांची वाढ
बुलडाणा, दि. 26 :  कोरेाना विषाणूचा प्रसार व संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे.  विदेशातून आलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. तसेच संशयीत व्यक्तींना बुलडाणा, खामगांव व शेगांव येथील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील 64 नागरिक त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणात ठेवण्यात आलेले आहे. 
     घरामध्ये निगराणीखाली असलेल्या नागरिकांमध्ये तीन नागरिकांची भर पडली आहे. त्यानुसार काल दि. 25 मार्च 2020 पर्यंत  विदेशातून आलेल्या  भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. तसेच आज दि. 26 मार्च 2020 रोजी 3 नवीन नागरिकांना त्यांच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 64 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. तसेच स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे दोन व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
     जिल्ह्यात बुलडाणा आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात एक नागरिकाला संशयीत म्हणून दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तीचा स्वॅब नमुने नागपूर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अजून रिपोर्टची प्रतीक्षा आहे. जिल्हयात आतापर्यंत 84 विदेशी भारतीय नागरिक आले. त्यांचे निरीक्षण व तपासणी करण्यात आली. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या 2 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच बुलडाणा स्त्री रूग्णालयात 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर 9 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. खामगांव आयसोलेशन कक्षातून 3 व बुलडाणा आयसोलेशन कक्षातून 02 नागरिकांचे तपासणी नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले,  अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.
***********
जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबिर
  • जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी केले रक्तदान
  • जिल्हाधिकाऱ्यांसह 34 नागरिकांनी दिले रक्त
बुलडाणा, दि. 26 :  कोरेाना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने रक्तदान शिबिर घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आज 26 मार्च 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी रक्तदान करीत रक्तदान करण्याचे आवाहन केले. या शिबिरात 34 नागरिकांनी रक्तदान केले.
      कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन राबवित असलेला रक्तदानाचा उपक्रम स्वागतार्ह आहे. या शिबिरात सहभाग घेवून रक्तदान करणाऱ्या नागरिकांनी खरच समाजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला आहे. आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा पडू नये, रक्तसाठा ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे. सदर शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद कार्यालयात 27 मार्च रोजी आयोजित करण्यात येत आहे. नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेवून रक्तदान करावे, असे आवाहनही प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
                                                                        *****
वाळू लिलावाचा जिल्हा सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध
बुलडाणा, दि. 26 :  बुलडाणा जिल्ह्याचा वाळू/रेती लिलावाचा जिल्हा सर्वेक्षण अहवाल (DSR) तयार करण्यात आला आहे. सदर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.buldhana.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तरी इच्छूकांनी सदर संकेतस्थळाला भेट देवून अहवालाचे अवलोकन करावे, असे अप्पर जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                

No comments:

Post a Comment