कोरोना विषाणू
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शासकीय व खाजगी शाळा बंद
* 31 मार्च 2020 पर्यंत असणार बंद
बुलडाणा, दि. 16 : साथरोग अधिनियम 1897 मधील तरतुदींनुसार कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शासकीय, खाजगी शाळा व अंगणवाड्या तसेच महाविद्यालये यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था, खाजगी कोचिंग क्लासेस 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तसेच ग्रामीण भागातील इयत्ता 10 वी, 12 वी च्या परीक्षा विहीत वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात. त्याचप्रमाणे आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही, यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सूचना आदेशात देण्यात आल्या आहेत. या आदेशाद्वारे विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही भारतीय दंडसंहीता च्या कलम 188 नुसार दंडनीय कारवाईस पात्र असणार आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून राज्यातील सर्व ग्रामीण भागातील सर्व शासकीय व खाजगी शाळा, अंगणवाड्या तसेच महाविद्यालये यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था आदी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमीत करण्यात आलेली अधिसुचना व नियमावली मधील तरतुदी नुसार सक्षम प्राधिकाऱ्यांचे मान्यतेने 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवणेबाबत सुचीत करण्यात आले आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
******
कोरोना विषाणू प्रसार प्रतिबंधात्मक उपाय : शेगांव येथील दर्शन सुविधा 31 मार्चपर्यंत बंद
· श्री संत गजानन महाराज संस्थान येथील उत्सव व कार्यक्रमही 30 एप्रिलपर्यंत बंद
बुलडाणा, दि. 16 : राज्यात कोरोना विषाणूपासून उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू करण्यात आला आहे. या कायद्याच्या कलमांनुसार गर्दी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार सामुदायिक कार्यक्रमास प्रतिबंध करण्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे मान्यतेने 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवणेबाबत सुचीत करण्यात आले आहे. त्यानुसार कोरेाना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील शेगांव येथे श्री. संत गजानन महाराज संस्थान येथील दर्शन सुविधा 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमीत केले आहे. तसेच सर्व उत्सव व कार्यक्रमसुद्धा 30 एप्रिल 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबतचे आदेशसुद्धा निर्गमीत करण्यात आले आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
कोरोना विषाणू प्रसार : जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार स्थगित
बुलडाणा, दि. 16 : जिल्ह्यात कोरोना विषाणूची साथ पसरू नये म्हणून जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये, गावांमध्ये भरणारे आठवडी बाजार 31 मार्च 2020 रेाज मंगळवारपर्यंत बाजार आणि यात्रा कायदा 1862 च्या कलम 5 अन्वये स्थगित करण्यात आले आहे. इतर दिवशी भाजीपाला दुकाने नियमित प्रमाणे सुरू राहतील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहे.
Comments
Post a Comment