Monday 9 August 2021

DIO BULDANA NEWS 9.8.21

 कोरोना अलर्ट : प्राप्त 928 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 6 पॉझिटिव्ह

• 07 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि. 9 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 934 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 928 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 6 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 3 व रॅपीड टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 648 तर रॅपिड टेस्टमधील 280 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 928 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मेहकर तालुका : पिंप्री माळी 1, संग्रामपूर तालुका : वानखेड 3, चिखली तालुका : वळती 1, सवणा 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 6 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच आज 07 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.    

   तसेच आजपर्यंत 654715 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86600 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86600 आहे. 

  आज रोजी 1369 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 654715 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87332 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86600 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 60 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

******

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

  • शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 9 : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे त्यासाठी शिक्षण देण्याची योजना या विभागाचे दि. 31 मार्च 2005 व 16 मार्च 2016 च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येत आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.  तसेच दि. 16 मार्च 2016 च्या या शासन निर्णयान्वये या योजनेचा लाभ मिळणेसाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा रु. 6 लक्ष पर्यंत वाढविण्यात आली आहे.

    प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयात शिष्यवृत्ती चा विहित नमुना अर्ज उपलब्ध आहे. परदेशात पदवी/ पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्हयातील रहिवासी असणा-या अनुसूचित जमातीचे विदयार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयातून विहित नमुन्यातील शिष्यवृत्ती अर्ज प्राप्त करून परिपुर्ण माहिती भरून व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे प्रमाणित प्रतींसह परिपुर्ण अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यालयात दिनांक 25 ऑगस्ट 2021 पर्यंत सादर करावा. दिनांक 25 ऑगस्ट 2021 नंतर सादर करण्यात आलेले अर्ज विचारात घेतल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

*****

 

 

               शासकीय बालगृहातील मुलांचे इयत्ता 10 व इयत्ता 12 वी परीक्षेत सुयश

बुलडाणा, (जिमाका) दि. 9 : शासकीय मुलांचे निरीक्षणगृह अथवा बालगृह, बुलडाणा या संस्थेत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 नुसार अनाथ, निराधार, वाट चुकलेली निराश्रीत, पिडीत बाल कामगार, बाल भिक्षेकरी अशी बालके दाखल होत असतात. सदर बालकांना शिक्षण व प्रशिक्षण देवून त्यांचे पुनर्वसन करण्यात येते. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात रामेश्वर एकनाथ सावळे व हर्षल सुभाष काठोळे व एक विधीसंघर्षग्रस्त बालक दाखल होते. या मुलांना संस्थेचे अधिक्षक, समुपदेशक, शिक्षक  तसेच इतर कर्मचारी यांनी योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे रामेश्वर एकनाथ सावळे याने इयत्ता 12 वीमध्ये 79.16 टक्के व इयत्ता 10 वी मध्ये हर्षल सुभाष काठोळे या बालकाने 81.20 टक्के गुण, तसेच एका विधीसंघर्षग्रस्त मुलाने इयत्ता 10 वीमध्ये 78 टक्के गुण मिळवून सुयश संपादन केले आहे. परीक्षेत यश संपादन करणाऱ्या या बालकांचे बाल न्याय मंडळ व बालकल्याण समिती बुलडाणा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह, बुलडाणा यांनी कौतुक केले आहे, असे अधिक्षक यांनी कळविले आहे.

******

मलकापूर उपविभागात जुलै ते ऑगस्ट दरम्यान 22 गावांमध्ये पाणीटंचाई घोषित

  • टंचाईग्रस्त गावांमध्ये भूजल अधिनिमय लागू

बुलडाणा, (जिमाका) दि. 9 : महाराष्ट्र भूजल अधिनियम 2009 मधील विविध कलमान्वये उपविभागीय अधिकारी, मलकापूर यांनी मलकापूर उपविभागात मोातळा तालुक्यातील 8 व नांदुरा तालुक्यातील 14 गावांमध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यान पाणीटंचाई घोषीत केली आहे. यामध्ये नांदुरा तालुक्यातील कोलासर / सांगवा, पिंपळखुटा खु, नारखेड, हिंगणा भोटा, भोरवंड, हिंगणा दादगाव, औरंगपुर, खेडा, दहीगांव, खुमगांव, शेलगांव मुकूंद, बेलाड, येरळी नवी व दहीवडी गावांचा समावेश आहे, तर मोताळा तालुक्यातील खामखेड, गोतमारा, पोफळी, तरोडा, शेलगांव बाजार, गुळभेली, उबाळखेड व दाभा गावांचा समावेश आहे. अशाप्रकारे 22 गावांमध्ये पाणीटंचाई घोषीत करण्यात आली आहे.

  भूजल अधिनियमानुसार अधिसूचित सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे 500 मिटरच्या अंतरामध्ये कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रयोजनासाठी कोणत्याही विहीरीचे खोदकाम करणार नाही. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे सार्वजनिक पिण्याच्या स्त्रोतांभोवती निश्चित व अधिसुचित केलेल्या प्रभाव क्षेत्रात कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रयोजनासाठी विहीरीचे खोदकाम करणार नाही. प्रभाव क्षेत्रामधील किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून एक किलोमीटर अंतरामध्ये यापैकी जे अधिक असेल अशा क्षेत्रातील अशी विहीर तात्पुरती बंद करणे, भूजल काढण्यासाठी विहीत करण्याच्या दृष्टीने विनीयम करण्यात येईल. भूजल पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होईल अशी कोणतीही कृती कुणीही करणार नाही. या अधिनियमनातील विविध तरतुदींचा भंग झाल्यास दंड व शिक्षेकरीता संबंधित तहसिलदारांनी त्वरित अहवाल सादर करावयाचा आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे कायम व्यवस्थापन करण्यामध्ये आणि पाणी टंचाईच्या काळात स्त्रेातांचे संरक्षण करण्यासाठी पंचायत जिल्हा प्राधिकरणास मदत करेल, असे उपविभागीय अधिकारी, मलकापूर मनोज देशमुख यांनी कळविले आहे.  

*****

दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि. 9: दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगसाठी मोफत प्रशिक्षण देते. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांची शासन मान्यता आहे. तसेच एमएस सीआयटी संगणक प्रशिक्षणासाठी हे अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून शासनाची मान्यतासुद्धा आहे. या संस्थेला अखिल स्तरावरील फिक्की अवार्ड प्राप्त झालेला आहे. सन 2021-22 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरू आहे. संस्थेत सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम. एस ऑफीस, मोटार अँड आमेंचर रिवायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज, एमएससीआयटी आदी अभ्यासक्रम शिकविले जातात. यासाठी वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष आहे. प्रशिक्षण कालावधी 6 महिन्याचा असून केवळ दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो.

संस्थेत प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावत व परिपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ज्ञ निदेशक, उज्ज्वल यशाची परंपरा, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायाकरीता बीज भांडवल योजना आदी सोयी सवलती आहेत. प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज, ता. मिरज जि. सांगली पिनकोड 416410 या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत्‍ मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पुर्णपणे भरून फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरून द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झालयानंतर तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेवून प्रवेश देण्यात येणार आहे. तरी माफक जागा असल्याने गरजू दिव्यांगांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन अधिक्षक यांनी केले आहे.

******

शेळीपालन, कुक्कुट, गाय व म्हैस पालन व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन

  • प्रशिक्षणासाठी 19 ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी

बुलडाणा,(जिमाका) दि.9 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) द्वारा जिल्हा उद्योग केंद्र मार्फत उद्योग अथवा व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवतींसाठी बुलडाणा येथे शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण 20 ते 24  ऑगस्ट 2021 दरम्यान पाच दिवसांमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाकरीता प्रवेश नोंदणी दि. 19 ऑगस्ट 2021 पर्यत कार्यालयीन वेळेत प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता यांच्याकडे किंवा त्यांच्या मोबाईल क्रमांक 8275093201, 9011578854 वर करावी. तसेच उद्योजकता विकास केंद्र द्वारा, जिल्हा उद्योग केंद्र, मलकापुर रोड, बुलडाणा येथे संपर्क करावा.

   तसेच प्रशिक्षणास भाग घेणारा उमेदवार किमान 5 वा वर्ग पास असणे आवश्यक असून त्याचे वय 18 ते 50 वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे. प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी तंत्रशुध्द प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्याचा आहे. सदर प्रशिक्षणात शेळी पालनाचे तंत्र, शेळीचे प्रकार, त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चाऱ्याचे प्रकार, शेळी केंद्रास प्रत्यक्ष भेट, उद्योग संधी, प्रकल्प अहवाल तयार करणे, शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्ती करणार आहे. तरी प्रशिक्षणासाठी प्रवेश नोंदणी करावी, असे आवाहन एसीईडी चे विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

*****

जुन्या वाहनांच्या नोंदणीचे नुतनीकरण व थकीत पर्यावरण कर भरावा

  • उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे आवाहन 

बुलडाणा,(जिमाका) दि.9 : ज्या खाजगी संवर्गातील दुचाकी, चारचाकी, तीन चाकी वाहनांची वयोमर्यादा नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष झालेली आहे. अशा वाहनांची नोंदणी 15 वर्षानंतर विधी ग्राह्य नाही. वाहनांच्या नोंदणीचे नुतनीकरण मोटार वाहन नियम 1989 अन्वये अनिवार्य आहे. अन्यथा विधीग्राह्यता संपलेल्या वाहनांवर कार्यालयाचे तपासणी पथकामार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच ज्या खाजगी वाहनांना नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष पूर्ण झालेली आहे व परिवहन संवर्गातील मालवाहतूक करणारे लोडींग ॲटो, टेम्पो, ट्रक, बसेस यांना वयोमर्यादा 8 वर्ष पूर्ण झाली आहे. अशा वाहनांना पर्यावरण कर भरणे अनिवार्य आहे. विहीत कालावधीत पर्यावरण कर भरणा न केल्यास 2 टक्के प्रती महिना व्याज आकारण्यात येते. ज्या वाहनांचा पर्यावरण कर थकीत आहे, अशा वाहन धारकांनी तातडीने थकीत कराचा भरणा करून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे भरारी पथकाद्वारे होणारी कार्यवाही टाळावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

*****

 

No comments:

Post a Comment