Friday 6 August 2021

DIO BULDANA NEWS 6.8.2021

 तूर शेतमालाचे उत्पादन वाढण्यासाठी शेंडे खुडणी करावी

बुलडाणा,(जिमाका) दि. 6 : तुर हे राज्यात घेतल्या जाणा-या कडधान्य पिकापैकी प्रमुख नगदी कडधान्य पिक आहे. तुर पिकाची पेरणी साधारणत: जुन चा दुसरा आठवडा ते जुलैचा पहीला आठवडा या दरम्यान पुर्ण होते. तुरीचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने तुरीचे शेंडे खुडणे व्यवस्थापन महत्वाचे ठरते. ही शेंडे खुडणी तुर पिक 45 दिवसाचे झाल्यानंतर पहिली खुडणी व 65 दिवसानंतर दुसरी खुडणी पुर्ण करावी. तुरीचे शेंडे खुडल्याने फांद्यांची संख्या वाढते. तुरीची अनावश्यक वाढ कमी होते. तुर जास्त उंच न वाढल्यामुळे औषध फवारणी सुलभ होते. फांद्यांची संख्या वाढल्यामुळे फुलांची व शेंगांची संख्या वाढते. उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होते.

तुरीचे शेंड खुडल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे तुरीचे उत्पादनात वाढ झाली आहे. विजय रामराव सोळंकी मु. कोलारा, ता. चिखली यांनीसुद्धा शेंडे खुडल्यामुळे उत्पादनात वाढ झाल्याचा त्यांना अनुभव आहे. शेंडे  खुडण्यापुर्वी उत्पादन एकरी 05 क्विंटल होते. परंतु शेंडे खुडणी केल्यामुळे त्यांचे एकरी 07 क्विंटल पर्यंत वाढले. शेतकरी सुनिल सुर्यनारायन कणखर मु. वरखेड  यांच्या शेतात तुरीचे शेंडे खुडणीमुळे एकरी 11 क्विंटल उत्पादन झाले. वरील फायदे विचारात घेता तुर पिकाची उत्पादनात वाढ करण्यासाठी मोहिम स्वरुपात शेंडे खुडणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

0000

एस टी चालक गणेश बोदडे यांचे प्रसंगावधानामुळे वाचले 43 प्रवाशांचे प्राण

बुलडाणा,(जिमाका) दि. 6 : जळगांव जामोद आगारातील चालक गणेश वसंतराव बोदडे, बिल्ला क्रमांक 32178 यांच्या प्रसंगावधनामुळे बसमधील 43 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. श्री. बोदडे 22 जुलै रोजी नियम क्रमांक 14 राप बस क्रमांक एम.एच 40 एक्यु 6338  जळगाव जामोद ते अकोला प्रवास पूर्ण करीत होते. दरम्यान जळगाव जामोद येथून बस घेवून निघाले असतांना मानेगाव जवळ बसचे ब्रेकबुस्टर अचानक लिक होवून ब्रेक कमी लागले. बसमध्ये मार्गस्थ असताना बिघाड झाला.  सदर बाब ही चालक श्री. बोदडे यांचे लक्षात येताच त्यांनी पूर्णा नदीवरील पुलापुर्वीच  बस नियंत्रित केली व बस सुरक्षीत उभी केली. या प्रसंगावधामुळे बसमधील वाहक अनंता खोंद्रे यांच्यासह 43 प्रवाशांचे प्राण वाचले व होणारा मोठा अपघात टळला. त्यांच्या कामातील प्रामाणीकपणा व कार्यतत्परतामुळे राप महामंडळाची होणारी आर्थिक हानी टळली. त्यामुळे गणेश वसंतराव बोदडे, चालक बिल्ला क्र.32178 राप जळगाव जामोद यांचा दि.15 ऑगष्ट 2021 रोजी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या वेळी विभागीय कार्यालय, राप, बुलडाणा येथे सत्कार आयोजित करण्यात आला आहे, असे विभाग नियंत्रक रा.प. बुलडाणा यांनी कळविले आहे.

0000

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 2506 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 11 पॉझिटिव्ह

• 04 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि. 6 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2517 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2506 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 11 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1 व रॅपीड टेस्टमधील 10 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 443 तर रॅपिड टेस्टमधील 2063 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2506 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली शहर : 3, चिखली तालुका : आमखेड 4, खंडाळा मकरध्वज 1, मनुबाई 1,  दे.राजा तालुका : टाकरखेड भागीले 1, खामगाव तालुका : ज्ञानगंगापूर 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 11 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच आज 04 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.    

   तसेच आजपर्यंत 650114 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86581 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86581 आहे. 

  आज रोजी 1888 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 650114 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87309 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86581 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 56 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

****

जिल्ह्यात 9 ते 16 ऑगस्ट दरम्यान रानभाजी महोत्सवाचे आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि. 6 : येत्या 9 ऑगस्ट 2021 रोजी जागतिक आदिवासी दिवस असल्याने 9 ऑगस्ट  ते 16 ऑगस्ट पर्यंत कृषी विभाग, बुलडाणा मार्फत रानभाजी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. रानभाजी पूर्णपणे नैसर्गिक रित्या येत असल्याने आरोग्य विषयक महत्व व माहिती जास्तीत जास्त ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना महोत्सवाच्या माध्यमातून जनतेला कळणार आहे. तसेच राणातील व जंगलातील शिवारातील नैसर्गिकरित्या उगविल्या जाणाऱ्या रान पालेभाज्या,फळभाज्या, कंद भाज्यामध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारी पौष्टीक अन्नघटक व औषधी गुणधर्म असतात.

  रानभाज्या ह्या नैसर्गिक रित्या येत असतात. त्यावर कुठल्याही प्रकारची किटकनाशकाची व बुरशीनाशकाची फवारणी होत नाही. आदिवासी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी रानभाजी महोत्सव स्पर्धा ही 9 ऑगस्ट रोजी चारबन ता. जळगाव जामोद येथे सकाळी ठीक 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेमध्ये रानभाज्या व रान फळांची वैशिष्ट्ये भाजीची पाककृती (रेसिपी) करून दाखवण्यासाठी आयोजन करण्यात येणार आहे. आदिवासी प्रवर्गासाठी महिला व पुरुष शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागमार्फत करण्यात येत आहे. दैनंदिन आहारामध्ये रानभाजीच्या जास्तीत जास्त समावेश व्हावा व जनजागृती व्हावी म्हणून तालुक्यामध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी सर्व शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा.

तालुका निहाय रानभाजी महोत्सवाचे तारीख व ठिकाण

जळगांव जामोद : चारबन दि. 9 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9 वाजता, पंचायत समिती सभागृह 10 ऑगस्ट रोजी, बुलडाणा : चिंचोले चौक, बुलडाणा 12 ऑगस्ट रोजी, चिखली : तालुका कृषि अधिकारी कार्यालय प्रांगण, चिखली 9 ऑगस्ट रोजी, मोताळा : पंचायत समिती सभागृह मोताळा 12 ऑगस्ट रोजी, मलकापूर : मलकापूर ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, जुनी कृषी उत्पन्न बाजार समिती  दि. 11 ऑगस्ट रोजी, खामगांव : तालुका कृषि अधिकारी कार्यालय प्रांगण, खामगांव 12 ऑगस्ट रोजी, शेगांव : पंचायत समिती सभागृह, शेगांव 13 ऑगस्ट रोजी, संग्रामपूर : उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोनती अभियान,तालुका व्यवस्थापन कक्ष,पंचायत समिती संग्रामपुर 10 ऑगस्ट रोजी, नांदुरा : पंचायत समिती सभागृह, नांदुरा  12 ऑगस्ट रोजी, मेहकर : पंचायत समिती सभागृह, मेहकर 13 ऑगस्ट रोजी, लोणार : पंचायत समिती सभागृह, लोणार 12 ऑगस्ट रोजी, सिं. राजा : पंचायत समिती सभागृह, सिं. राजा 13 ऑगस्ट रोजी, दे. राजा : फरस बालाजी मंदीराजवळ दे.राजा 12 ऑगस्ट रोजी.

महोत्सवातील रानभाज्या

करुटली, ज्योती फुले,फांजीची भाजी, हेटा फुले, अळू पाने, तांदूळ जीरा,अंबाडी, शेवगा, बांबू कोंब,सफेद मुसळी,गुळवेल, पाथरी, फांद्याच्यी भाजी, शेवगा, तरोटा, चीवळ, उंबर, केना, आघाडा, पिंपळ, उंबर, कवठ, कुरडू, ,जेटूली फुले, घोळभाजी.

******

 

 

 

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा

-          जिल्हाधिकारी एस रामामूर्ती

  • महसूल दिन साजरा, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

बुलडाणा,(जिमाका) दि. 6 : प्रशासनात विविध विभाग कार्यरत असतात. कार्यरत विभागांमध्ये महसूल विभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे महसूल विभागाला प्रशासनाचा कणा संबोधल्या जाते. शासन कुठलीही नवीन योजना आखताना सुद्धा महसूल विभागाला गृहीत धरूनच कार्यवाही करावयास लावते. त्यामुळे विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सर्व सामान्य जनतेशी निगडीत कामे विहित कालावधीत निकाली काढावी, असे प्रतीपादन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.

 जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 5 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी प्रमुख उपस्थितीमध्ये होते.        महसूल दिनानिमित्त 1 ऑगस्ट 2020 ते 31 जुलै 2021 या महसूली वर्षामध्ये उत्कृष्ट काम करणारे अधिकारी / कर्मचारी तसेच कोवीड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन एका योद्ध्याप्रमाणे आपात्कालीन परिस्थिती हाताळणी अशा कोवीड योद्ध्यांचा सन्मान, गौरव करण्यात आला.

  यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. चावरीया यांनी महसूल विभाग व पोलीस विभाग व आरोग्य विभाग यांनी कोवीड 19 करीता अहोरात्र काम केले असल्याने या विभागाचे कौतुक केले.  या कार्यक्रमामध्ये उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, मेहकर यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी व डॉ. संजय गरकल यांना तहसिलदार, मेहकर यांना उत्कृष्ट तहसिलदार म्हणून गौरविण्यात आले. सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी अभिजीत नाईक यांनी अत्यंत साधेपणाने व कोरोना संसर्ग टाळण्याच्या अनुषंगाने शासनाव्दारे वेळोवेळी विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन पार पाडला. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, अव्वल कारकुन, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, तलाठी, वाहनचालक, कोतवाल व पोलीस पाटील उपस्थित होते.

******

एकलव्य निवासी शाळेतील प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

  • प्रवेश घेण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि. 6 : सन 2021-22 शैक्षणिक वर्षात राज्यातील आदिवासी विकास विभागातंर्गत कार्यान्वीत इंग्रजी माध्यमाच्या सर्व एकलव्य मॉडेल रेसीडेन्सीयल स्कुल मधील इयत्ता सहावीच्या वर्गात नियमित प्रवेश तसेच इयत्ता सातवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या शाळा प्रवेशासाठी इच्छुकांनी अर्ज करावे, असे आवाहन आदिवासी विभागातर्फे करण्यात आले आहे.

   त्यासाठी https://admission.emrsmaharahtra.com ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक किंवा मुख्याध्यापकांनी या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेले आवेदनपत्र ऑनलाईन भरून त्यासोबत मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करावे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरीता अर्जदार विद्यार्थ्यांचा सरल पोर्टलवरील स्टुडन्ट आयडी माहिती असणे आवश्यक आहे.  आवेदनपत्र ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत दिनांक 31 ऑगस्ट 2021 पर्यंत राहणार आहे.  आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य रेसिडेन्शीयल पब्लीक स्कुलमध्ये प्रवेशासाठीची परीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे.  त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील वार्षिक परीक्षेच्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

  त्यानुसार वर्ष 2021-22 मधील जे विद्यार्थी पाचवीमध्ये प्रविष्ट होते आणि सद्या सदरील विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये सहावीमध्ये प्रवेशित झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना एकलव्य निवासी शाळेत सहावीमध्ये प्रवेश घेण्याकरिता मागील वर्षाचे पाचवीचे गुणपत्रक ऑनलाईन आवेदन पत्रासोबत अपलोड करावे लागणार आहे. तसेच शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता सातवीमध्ये प्रवेश घेण्याकरीता विद्यार्थ्याचे मागील वर्षांचे सहावीच्या वर्गाचे गुणपत्रक, इयत्ता आठवीमध्ये प्रवेश घेण्याकरीता विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे सातवीच्या वर्गाचे गुणपत्रक आणि नववीमध्ये प्रवेश घेण्याकरीता विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे आठवीच्या वर्गाचे गुणपत्रक अपलोड करावे लागणार आहे.

   शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये ज्या विद्यार्थ्यांची आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अशा विद्यार्थ्यांचे संबंधित इयत्तेचे मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान / परीसर अभ्यास, कला, कार्यान्युभव व शारिरीक शिक्षक आदी 9 विषयांचे प्रत्येकी 100 पैकी गुण विचारात घेवून एकूण 900 गुणांचे गुणपत्रक सादर करावे.  शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये ज्या विदयार्थ्यांची आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन किवा आकारिक मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अशा विद्यार्थ्यांचे संबंधित इयत्तेचे नऊ विषयांचे (मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान/परिसर अभ्यास, समाजिकशास्त्रे, कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण) प्रत्येकी 100 पैकी गुण विचारात घेऊन एकुण 900 गुणांचे गुणपत्रक सादर करावे. पालक, शिक्षक अथवा मुख्याध्यापक यांनी वरील लिंकवर आवेदनपत्र अपलोड करण्यापूर्वी सदरील गुणपत्रक 900 गुणांचे  गुणांचे असल्याची खात्री करावी. त्यामुळे शाळेकडून गुणपत्रक प्राप्त करून घेताना गुणपत्रक तपासून घेण्यात यावे. शाळेकडून श्रेणी प्रदान केलेले गुणपत्रक गुणांमध्ये रूपांतरित करून घ्यावे, असे  प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment