Friday 6 August 2021

DIO BULDANA NEWS 6.8.2021

 


पुनर्वसन करतांना शेतकरी व ग्रामस्थांचे हित जोपासा

 - पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे

 

  • अरकचेरी व पेनटाकळी प्रकल्पच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात घेतला आढावा

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 :  पेनटाकळी प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या पांढरदेव, घानमोड, मानमोड गावाचे पुनर्वसन करतांना ग्रामस्थांचे हित जोपासावे. तसेच अरकचेरी प्रकल्पात बाधित शेतजमिनीचे भूसंपादन करतांना तेथील शेतकऱ्यांचे हित जोपासत त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी संबधित यंत्रणेने घ्यावी, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

   जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या पश्चजलामुळे  बाधित झालेल्या पांढरदेव, घानमोड, मानमोड गावाचे पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. विशेष म्हणजे पांढरदेव येथील घरांचे पुनर्वसन तातडीने होणे गरजेचे आहे. यासाठी  जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे आदी उपस्थित होते.  

    यावेळी पालकमंत्री म्हणाले, पुनर्वसन करतांना एक कालबद्ध कार्यक्रम तयार करून या गावांचे पुनर्वसन करावे. पुढील 15 दिवसात गावकऱ्यांना प्लॉट वाटप करून त्यांना लवकरात लवकर मोबदला कसा देता येईल, यासाठी प्रयत्न करावा. या गावाच्या पुनर्वसनाकरिता लागणार निधी लवकरात लवकर मिळावा, यासाठी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांना भेटून त्यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे.

   संग्रामपूर तालुक्यातील अरकचेरी प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील शेत जमिनीचा सर्व्हे करून सयूंक्त मोजणी करण्यात यावी. हे काम करत असतांना कुठल्याही शेतकऱ्यांवर व ग्रामस्थांवर अन्याय होणार नाही याची काळजी संबधित यंत्रणेने घ्यावी अशा सूचनाही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी यावेळी दिल्या. बेठकीला संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

*****

पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 12 ऑगस्ट रोजी होणार

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 :  परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता 5 वी ची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता 8 वीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही 9 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती. मात्र राज्यात काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुर परिस्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणींबाबत राज्यतील अनेक संघटनांकडून निवेदने प्राप्त झाली. या निवेदनांचा विचार करता सदर परीक्षा ही 9 ऑगस्ट ऐवजी आता 12 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी निर्गमीत करण्यात आलेले प्रवेशपत्र 12 ऑगस्ट 2021 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

*******

No comments:

Post a Comment