Tuesday 10 August 2021

DIO BULDANA NEWS 10.8.21

 कोरोना अलर्ट : प्राप्त 1483 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 6 पॉझिटिव्ह

• 03 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि. 10 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1489 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1483 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 6 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 4 व रॅपीड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 178 तर रॅपिड टेस्टमधील 1305 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1483 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली तालुका : भालगांव 1, चिखली शहर : पुंडलीक नगर 1, मेहकर शहर : 1, बुलडाणा शहर : 1, सिं. राजा शहर : 1, दे. राजा तालुका : गिरोली बु 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 6 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच आज 03 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.    

   तसेच आजपर्यंत 656198 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86603 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86603 आहे. 

  आज रोजी 1773 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 656198 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87338 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86603 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 63 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

******

विधवा महिलांना शासकीय योजनांच्या कृतीसंगमातून सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावे

-         अप्पर जिल्हाधिकारी

  • अनाथ बालकांसाठी 45 लक्ष अर्थसहाय्य प्रस्तावाला जिल्हा कृती दला मार्फत मंजुरी

बुलडाणा,(जिमाका) दि. 10 : जिल्ह्यात कोरोना काळात पालकत्व गमावलेले अनेक बालके आहेत. या बालकांना शासन निर्णय 17 जून 2021  प्रमाणे कोव्हीड संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसाह्य देणेबाबत नवीन योजना महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे विधवा महिलांना विविध शासकीय योजनांच्या कृती संगमातून सक्षम करण्यासाठी विभागांनी प्रयत्न करावे, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी दिल्या आहेत.

  महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा कृती दल बैठकीचे आयोजन 9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले. यावेळी उपपोलीस अधिक्षक (गृह), जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, अध्यक्ष बाल कल्याण समिती, जिल्हा कार्यक्रम अधिकारी बाल कल्याण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आदी उपस्थित होते.

    या बालकांच्या काळजी आणि पुनर्वसनासाठी महसूल यंत्रणा, जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग, नगर परिषद, जिल्हा उद्योग व कौशल्य विकास, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, चाईल्ड लाईन यांच्या एकत्रित समन्वयातून एक पालक झालेल्या बालकांना व विधवा महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ द्यावा. त्याकरिता जिल्ह्यातील विधवा महिलांची माहिती जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्हा आणि तालुका स्तरावर सबंधित सर्व  शासकीय कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचनाही अप्पर जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

  ते पुढे म्हणाले, बैठकीत अनाथ व एक पालक बालकांना चाईल्ड 1098 क्रमांकावर सहज उपलब्ध व्हावा, म्हणून सर्व तहसील कार्यालय, नगर परिषद, ग्राम पंचायत क्षेत्रात बाल मदत संपर्क क्रमांक 1098 या क्रमांकाला प्रसिद्धी देण्यात यावी.    जिल्ह्यात दोन्ही आई वडील मयत झाल्याने आर्थिक विवंचनेत असणाऱ्या बालकांची  मालमत्ता आणि संपत्ती  विषयक चौकशी सबंधित ग्रामसेवक, तलाठी व नगर परिषदमार्फत करून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या न्यायिक सेवे मार्फत बालकांचे वारसा हक्क जतन करण्यात यावे.   

   बैठकीत जिल्ह्यात दोन्ही पालक गमवल्यामुळे अनाथ झालेल्या 9 बालकांना प्रत्येकी 5 लक्ष रुपये अर्थसाह्य देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी जिल्हा कृती दला मार्फत देण्यात आली.  अनाथ झालेल्या बालकांमध्ये दोन्ही पालक गमावलेल्या व जात प्रमाणपत्र उपलब्ध नसलेल्या बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील कार्यवाहीचा आढावादेखील जिल्हा कृती दला मार्फत घेण्यात आला. जिल्ह्यात कोरोना काळात एकूण 345 बालकांनी आपले पालक गमावलेले आहेत, ज्यात 333 बालके ही एक पालक झालेल्यांचे निदर्शनास येत आहेत. त्यापैकी 301 कुटुंबांनी आपला कुटुंब प्रमुख गमावलेला आहे.         

       जिल्हा कृती दला मार्फत उपलब्ध झालेल्या माहिती नुसार अनाथ व एक पालक बालकांना बाल कल्याण समिती यांच्या समक्ष हजर करण्यात आले होते. सदर बालकांना दर महिन्याला 1100 रुपये सानुग्रह मदत देण्यासाठी 176 बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय बाल कल्याण समिती घेण्यात आलेला. लवकरच बाल संगोपन योजनेचा लाभ बालकांना देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली. कोरोना काळात शैक्षणिक अडचणींना सामोरे जावे लागत असलेल्या बालकांना कॉर्पोरेट सामजिक जबाबदारी मधून शाळेची फी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माहिती घेण्यात आहे. तसेच 14 बालकांची शालेय फीचा प्रस्ताव आयुक्त महिला व बाल विकास, पुणे यांना पाठविण्यात आला आहे. 

  अशा बालकांचे शुल्काअभावी होणारे शैक्षणिक नुकसान टाळता यावे, यासाठी आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांनी सर्व शाळा मुख्याध्यापक यांना शालेय शुल्क भरण्यास अक्षम असणाऱ्या मुलांसाठी  विद्यार्थी  पडताळणी करून शाळा प्रमाणपत्र सबंधित जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यासंदर्भात आवाहन केले आहे. सदर बालकांचे शालेय शुल्क भरण्याकरिता महिला व बाल विकास विभाग, प्रोजेक्ट मुंबई व जेएम फायनान्स फौंडेशन मदत करणार असल्याची माहिती  जिल्हा महिला व बालसंरक्षण अधिकारी यांनी जिल्हा कृती दल यांनी दिली.

*******

रहीवासी पत्त्यावर राहत नसल्याने 44 हजार 646 मतदारांची नावे वगळली

  • सर्वात जास्त बुलडाणा मतदारसंघातील 17 हजार 939 नावे
  • वगळलेल्या मतदारांनी छायाचित्रेही सादर केली नाहीत

बुलडाणा,(जिमाका) दि. 10 : दिनांक 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार एकुण मतदार संख्या जिल्ह्यात 20 लक्ष 54 हजार 384 होती. त्यापैकी 53 हजार 225 मतदारांची छायाचित्रे उपलब्ध नव्हती. छायाचित्रे जमा करण्याबाबत मतदान केद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत सर्व मतदारांना वेळोवेळी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार 53 हजार 225 मतदारांपैकी 8 हजार 514 मतदारांनी छायाचित्रे जमा केली. मात्र उर्वरित 44 हजार 646 मतदारांनी वेळोवेळी संपर्क साधून सुध्दा छायाचित्रे सादर केली नाहीत.  तसेच मतदार यादीमध्ये समाविष्ठ असलेल्या यादी भागामधील रहीवासी पत्यावर राहत नसल्याचे आढळून आल्यामुळे मतदार नोंदणी अधिकारी यांनी मतदार नोंदणी अधिनियम 1860 मधील प्रचलित तरतुदीनुसार कार्यवाही करुन 44 हजार 646 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहे.

  यामध्ये सर्वात जास्त मतदार संख्या 17 हजार 939 ही 22- बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील आहे. त्यापाठोपाठ त्याबाबतचा  23- चिखली मतदारसंघातील 10 हजार 76, 24- सिंदखेड राजा मतदारसंघातील 6038, 27- जळगांव जामोद मधील 5 हजार 155, 26- खामगांव मतदारसंघातील 3 हजार 74, 25- मेहकर मधील 1561 आणि सर्वात कमी मतदार 803 हे 21- मलकापूर मतदारसंघातील आहेत.   सदरचे कामकाज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुलडाणा एस.रामामूर्ती  यांचे निर्देशानुसार तत्कालीन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भिकाजी घुगे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण अहिरे यांनी व जिल्ह्यातील सर्व उप विभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे, असे भूषण अहीरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.

*****

 

                 जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समिती बैठक संपन्न

बुलडाणा,(जिमाका) दि. 10 : ज्येष्ठ नागरिक धोरण योजनेतंर्गत जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीची बैठक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, समितीचे सदस्य प्रकाश पिंपरकर, दिलीप कुलकर्णी आदी उपस्थित होते.

  बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक कक्ष स्वतंत्रपणे समाज कल्याण कार्यालयात स्थापन करण्यात आला आहे. वयोवृद्ध सन्मान पुरस्कारासाठी प्राप्त दोन प्रस्ताव आयुक्त कार्यालय, पुणे येथे सादर करण्यात आले आहेत. तसेच बेघर व अत्याचारग्रस्त वृद्ध व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी संयुक्तपणे प्रसिद्धी, जाणीव जागृती करण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना कळविण्यात आला असल्याची माहिती यावेळी सहाय्यक आयुक्त यांनी दिली.   विरंगुळा केंद्र, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय येथे सुरक्षा कक्ष स्थापन करण्याबाबत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला असता याबाबत संबंधित कार्यालयांना कळविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी बैठकीचे आभार मानले.

No comments:

Post a Comment