Wednesday 25 August 2021

DIO BULDANA NEWS 25.8.2021

 

                     प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिकांसाठी शेतकऱ्यांची अर्ज प्रक्रिया सुरू होणार

  • महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे
  • 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान चालणार अर्जप्रक्रिया

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके व गळीतधान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषि औजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. ही अर्ज प्रक्रिया 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पीक प्रात्याक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषि सहाय्यकांशी संपर्क करून 10 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी.

   शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी दि. 30 ऑगस्ट ते दि.10 सप्टेंबर,2021 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. विहित मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके व गळीतधान्य कार्यक्रम जिल्ह्यामध्ये कडधान्य हरभरा, पौष्टीक तृणधान्य, गळीत धान्य यासाठी राबविण्यात येणार आहे.

   जिल्ह्यात हरभरा बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास 25 रूपये प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास 12 रूपये प्रती किलो, संकरीत मका 95 रूपये प्रती किलो व रब्बी ज्वारी बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास 30 रूपये प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास 15 रूपये प्रती किलो, एकूण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे. तसेच पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्म मूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार  2 हजार ते 4 हजार रूपये प्रती एकर मर्यादेत डीबीटी तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांचे सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी कळविले आहे.

*******

       आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे बँक खात्यात जमा

  • गहू, ज्वारी, हरभरा व मका खरेदीचे चुकारे
  • 24 ऑगस्ट रोजी पोर्टलद्वारे केले जमा

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 :  जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत राज्य शासनाच्यावतीने हमी दराने मका, ज्वारी व गहू शेतमालाची खरेदी करण्यात आली होती. त्यामध्ये आतापर्यंत 193 शेतकऱ्यांकडून 8647.90 क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. या खरेदीपोटी शेतकऱ्यांचे 1 कोटी 58 लक्ष रूपयांचे चुकारे खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. तर जिल्ह्यात 1778 शेतकऱ्यांकडून 31691.39 क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आली. या खरेदीपाटी देय असलेली 8 कोटी 26 लक्ष रूपये आणि 20 शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या 486.25 क्विंटल खरेदी गहू खरेदी केलेली आहे.

    या खरेदीपोटी 12 लक्ष 73 हजार रूपये वितरीत करण्यात आले आहे. मका, ज्वारी व हरभरा खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे ऑनलाईन पोर्टलद्वारे 24 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या  बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. तसेच या  योजनेतंर्गत नाफेड मार्फत 10 हजार 950 शेतकऱ्यांची  हरभरा खरेदी 189551.71 क्विंटल करण्यात आली. या खरेदीचे 96 कोटी 67 लाख रूपयेसुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे, असे जिल्हा पणन अधिकारी पी. एस शिंगणे यांनी कळविले आहे.

*******

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

• शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे त्यासाठी शिक्षण देण्याची योजना या विभागाचे दि. 31 मार्च 2005 व 16 मार्च 2016 च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येत आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच दि. 16 मार्च 2016 च्या या शासन निर्णयान्वये या योजनेचा लाभ मिळणेसाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा रु. 6 लक्ष पर्यंत वाढविण्यात आली आहे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयात शिष्यवृत्ती चा विहित नमुना अर्ज उपलब्ध आहे. परदेशात पदवी/ पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या बुलडाणा जिल्हयातील रहिवासी असणा-या अनुसूचित जमातीचे विदयार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयातून विहित नमुन्यातील शिष्यवृत्ती अर्ज प्राप्त करून परिपुर्ण माहिती भरून व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे प्रमाणित प्रतींसह परिपुर्ण अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यालयात दिनांक 3 सप्टेंबर 2021 पर्यंत सादर करावा. दिनांक 3 सप्टेंबर 2021 नंतर सादर करण्यात आलेले अर्ज विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

*****

‘अपाम’च्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेत 762 लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू

• वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व प्रकल्प कर्ज योजना

• योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.25: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातंर्गत स्वयंरोजगार उभा करण्यासाठी विविध कर्ज वितरण योजना अंमलात आणण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज  व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजना यांचा समावेश आहे. या योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत 762 लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू झालेला आहे. तसेच आतापर्यंत 905 लाभार्थ्यांना बँकेने कर्ज प्रकरण मंजूर केले आहे.

    या कर्ज प्रकरणांमध्ये 64 कोटी 42 लक्ष 27 हजार 549 रूपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये 4103 अर्जदारांनी अर्ज केले. त्यापैकी 1263 लाभार्थ्यांना LOI (लेटर ऑफ इंटेन्ट) देण्यात आले आहे. म्हणजे 1263 लाभार्थी पात्र ठरले. यापैकी 762 लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करण्यात आले. महामंडळाकडून 780 लाभार्थ्यांना व्याज परतावा मंजूर करण्यात आला. व्याज परतावा 762 लाभार्थ्यांना सुरूदेखील झाला. आजपर्यंत 6 कोटी 36 लक्ष 524 रूपये रक्कम व्याज परताव्यापोटी वितरीत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महामंडळाची दुसरी योजना गट कर्ज व्याज परतावा आहे. यामध्ये 7 गटांनी अर्ज केले, 4 गटांना LOI (लेटर ऑफ इंटेन्ट) देण्यात आले. यामध्ये 1 लक्ष 36 हजार 971 रूपयांची रक्कमेचा व्याज परतावा झालेला आहे. तसेच प्रकल्प कर्ज योजनांमध्ये 7 गटांची संख्या आहे. महामंडळ अंतर्गत एकूण 5 शेतकरी उत्पादक कंपनी यांना प्रत्येकी 10 लक्ष रूपये देण्यात आले आहे. अशाप्रकारे या तीनही योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.

   कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय कार्यान्वीत आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. त्यामुळे अर्ज करण्यास लाभार्थ्यांना सुविधा आहे. अर्ज केल्यानंतर बँकेकडे सदर प्रकरण मंजूरीसाठी पाठविण्यात येते. बँकेले पाठविण्यासाठी लेटर ऑफ इंटेन्ट देण्यात येते. लेटर ऑफ इंटेन्ट बँकेकडे देण्यात आल्यानंतर सदर कर्ज प्रकरणात कर्जाची रक्कम देण्यात येते. तरी अधिक माहितीसाठी www.mahaswayam.in या संकेतस्थळावर,  व महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक पुरूषोत्तम अंभोरे यांनी केले आहे.

                                                            *****

कोरोना अलर्ट : प्राप्त 2099 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 08 पॉझिटिव्ह

     • 03 रूग्णांना मिळाली सुट्टी                                                                                                                                                          

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2107 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2099 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 08 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 3 व रॅपिड अँटी जन चाचणी मधील 5  अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 404 तर रॅपिड टेस्टमधील 1695 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2099 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  दे.राजा शहर : बालाजी नगर 1, बुलडाणा शहर : 1, चिखली तालुका : ब्रह्मपुर वाडी 1, हिवरखेड 1, मेरा बु 2,  चिखली शहर : राउतवाडी 1, गजानन नगर 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 08 रूग्ण आढळले आहे.  तसेच आज 03 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.                                                                                                      

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 682160 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86684 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86684 आहे.  आज रोजी 1050 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 682160 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87380 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86684 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 24 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*****

 

 

No comments:

Post a Comment