Friday 13 August 2021

DIO BULDANA NEWS 13.8.2021

 जिल्ह्यात नवीन कोरोनाबाधीत रूग्णाच्या आकड्याने गाठले ‘शून्य’

  • कोरोना अलर्ट : प्राप्त 2527 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 0 पॉझिटिव्ह
  • 08 रूग्णाला मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि. 13 : मागील जवळपास दीड वर्षापासून कोरोना विषाणूने संपूर्ण मानव जातीवर आपले अधिराज्य गाजविले आहे. यामधून बुलडाण जिल्हाही सुटला नाही. पहिली लाट, दुसरी लाट कोरोना संसर्गाने अक्षरश: हेलकावे मारून गेली. यामध्ये बऱ्याच जणांना आपले प्राण गमवावे लागले. दुसऱ्या लाटेत दररोज 1300 रूग्ण निघाले. आज मात्र शासनाने आरोग्य विभाग व  प्रशासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपाय योजनांमुळे नवीन कोरोना बाधीत रूग्णांची संख्या  ‘शून्य’ झाली आहे. आज एकही बाधीत रूग्ण जिल्ह्यात आढळला नाही.

     प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2527 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2527 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 0 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 697 तर रॅपिड टेस्टमधील 1830 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2527 अहवाल निगेटीव्ह आहेत.

        तसेच आज 08 रुग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.    

  त्याचप्रमाणे आजपर्यंत 663188 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86620 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86620 आहे. 

  आज रोजी 1474 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 663188 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87351 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86620 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 67 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

******

राष्ट्रध्वजाचा राखा सन्मान.. वाढेल देशाचा अभिमान !...

·          हँण्ड स्पून राष्ट्रध्वज पायदळी तुडवू नका

 बुलडाणा,(जिमाका) दि.13 : दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट व अन्य राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिक प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. सदर कार्यक्रम पार पाडल्यानंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लास्टीकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले दिसतात, असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो.                               

    राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबतच्या तरतुदी आहेत. राष्ट्रध्वज हा हँण्ड स्पून आणि हस्तनिर्मित वूल, कॉटन, सिल्क आदीमध्ये असावा. राष्ट्रध्वजाचा आकार आयाताकृती, त्याची उंची व रुंदी 3:2 असावी. राष्ट्रध्वजाचा आकार 9 प्रकारात पुढीलप्रमाणे असायला पाहिजे. त्याचा आकार प्रकारानुसार लांबी व रुंदी दिली आहे. प्रकार 1 -  लांबी,  रुंदी अनुक्रमे 6300 व 4200 मी.मी, प्रकार 2 – लांबी व रुंदी अनुक्रमे 3600 व 2400, प्रकार 3- लांबी, रुंदी अनुक्रमे 2700 व 1800, प्रकार 4- लांबी, रुंदी अनुक्रमे 1800 व 1200, प्रकार 5 - लांबी, रुंदी अनुक्रमे 1350 व 900, प्रकार 6 - लांबी, रुंदी अनुक्रमे 900 व 600, प्रकार 7- लांबी, रुंदी अनुक्रमे 450 व 300, प्रकार 8-  लांबी, रुंदी अनुक्रमे 225 व 150, प्रकार 9 -  लांबी, रुंदी अनुक्रमे 150 व 100 मी.मी असावी. राष्ट्रध्वजाचा व्हीव्हीआयपी विमानासाठी आकार 450 बाय 100 मी.मी, मोटार कारसाठी 225 बाय 150 मी.मी आणि टेबलसाठी 150 बाय 100 मी.मी असावा.

     भारतीय ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतूदीनुसार राष्ट्रध्वजाचा वापर करताना खराब झालेल्या, माती लागलेल्या ध्वजाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट व अन्य राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिक प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. याठिकाणी पायदळी तुडविलेले राष्ट्रध्वज गोळा करून तालुका व जिल्हा स्तरावर निर्मित करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहे. त्यांनी असे राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करावे. खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सुर्यास्तानंतर व सुर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक जाळून नष्ट करावे. हे करताना उपस्थितांनी उभे रहावे व जाळून पुर्णपणे नष्ट होईपर्यंत जागा सोडू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. 

                                                                                    ********

            मोहरम साध्या पद्धतीने साजरा करावा

·         शासनाकडून मार्गदर्शक सुचना जारी

 बुलडाणा,(जिमाका) दि.13 : मोहरम 19 ऑगस्ट 2021 रोजी पाळण्यात येणार आहे. मोहरम निमित्त विविध ठिकाणी मुस्लीम बांधवांतर्फे वाझ / मजलीस तसेच मातम मिरवणूका आयोजित करण्यात येतात. कोविड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मागील वर्षापासून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले असल्याने इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावर्षी मोहरम साध्या पद्धतीने पाळण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

  मोरहम महिन्याच्या 9 व्या दिवशी म्हणजेच 18 ऑगस्ट 2021 रोजी कत्ल की रात तसेच 10 व्या दिवशी योम ए आशुरा हे दिनांक 19 ऑगस्ट रोजी येत आहे. त्या निमित्ताने मातम मिरवणूका काढण्यात येतात. परंतु सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सध्या बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूका काढता येणार नाही. कोविड काळात पार पडलेल्या इतर धार्मिक कार्यक्रमांप्रमाणे आपापल्या घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळण्यात यावा. केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही. खाजगी मातम देखील शासनाच्या काटेकोर पालन करून घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी देखील एकत्रित मातम / दुखवटा करू नये. वाझ / मजलीस हे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करून ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया / आलम काढू नयेत.

   सबील / छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी कोविड संदर्भात आरोग्याच्या दृष्टीकोनातून नियमांचे तंतोतंत पालन करावे. सबिलच्या ठिकाणी बंद बाटलीनेच पाण्याचे वाटप करण्यात यावे. सदर ठिकाणी सोशल डिस्टसिंग तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे लक्ष द्यावे. कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष मोहरम सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे, असे राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद आहे.

*******

                                                     


भरोसा येथे शेड नेट धारकांची कार्यशाळा उत्साहात

 बुलडाणा,(जिमाका) दि.13 : जिल्ह्यामध्ये नानाजी देशमुख कृषि संगीजनी प्रकल्प व एकात्मिक फलोत्पादन व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत शेडनेट उभारलेल आहेत. अशा शेड नेट धारक शेतक-यांसाठी उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, अंतर्गत मौजे भरोसा, ता. चिखली येथे बिजोत्पादन आणि भाजीपाला उत्पादन, विक्री व्यवस्थापन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

   प्रास्ताविकेत उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी पोकरा अंतर्गत उभारण्यात आलेल्या शेड नेट मध्ये व्यावसायिक दृष्टया भाजीपाला उत्पादन करणे, खाजगी कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांनी बिजोत्पादन घेणे आणि निर्माण झालेल्या भाजीपाला उत्पादनांची विक्री व्यवस्था बळकट करणे या विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले. अनंता सिड्स, प्रा.लि.जालना कार्यकारी संचालक सुभाष धुमाळ यांनी त्यांच्या कंपनी मार्फत राबवीत असलेल्या भाजीपाला बिजोत्पादनाची सविस्तर माहिती व त्यातील संधी सांगितल्या. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भाजीपाला बिजोत्पादन घेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. सीताई नॅचरल फार्मर फेडरेशनचे संचालक अभिषेक भराड यांनी तयार होणाऱ्या भाजीपाला निर्यातीच्या संधी व वाव या संदर्भात मार्गदर्शन केले.

     अध्यक्षीय भाषणामध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी भाजीपाला लागवड कमी खर्चात जास्त उत्पादन काढणे, शेती व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून करणे, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी VEGNET वर नोंदणी करणे, गुणवत्तापूर्वक भाजीपाला उत्पादन करून आर्थिक विकास साधणे व हे सर्व करण्याकरता गट शेती, शेड नेट धारक शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी स्थापन करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

   कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. नाईक, प्रमुख उपस्थितीत भरोसा येथील गणेश युद्धे, अभिषेक भराड, सुभाष धमाळ, लक्ष्मण खरात होते. संचालन तालुका कृषि अधिकारी अमोल शिंदे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रकल्प विशेषज्ञ उमेश जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळ कृषि अधिकारी अनंता गंभारे, कृषि पर्यवेक्षक किशोर टाले, कृषि सहाय्यक गजानन इंगळे, प्रकल्प विशेषज्ज्ञ सोहम बेलोकर, समुह सहाय्यक जयदीप झोरे, प्रशांत सुरूशे, राजेश खरात व सर्व उपस्थित शेतकरी बंधु यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास शेतकरी बांधवांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला, असे उपविभागीय कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.

******

जिल्ह्यात "एक विद्यार्थी एक वृक्ष" या मोहिमेची 15 ऑगस्ट पासून सुरुवात

 बुलडाणा,(जिमाका) दि.13 : शिक्षण विभाग आणि सामाजिक वनीकरण यांच्या पुढाकाराने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून संपूर्ण जिल्ह्यात 'एक विद्यार्थी एक वृक्ष' ही अभिनव वृक्ष क्रांती मोहीम शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. या भारत वृक्षक्रांती मोहिमेचे तथा एक विद्यार्थी एक वृक्ष या संकल्पनेचे मुख्य प्रवर्तक ए. एस. नाथन यांच्या संकल्पनेतून ही मोहीम संपूर्ण  जिल्ह्यात राबविली जाणार आहे. या वृक्षक्रांती मोहिमेची सुरुवात 15 ऑगस्टला जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे सकाळी 9.30 वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषाताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी एस. राममूर्ती  यांच्याहस्ते होणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कमलताई बुधवत, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा उपवन संरक्षक अक्षय गजभिये, विभागीय वनअधिकारी सामाजिक वनीकरण डी. एस. पायघन, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप आणि या मोहिमेचे मुख्य प्रवर्तक ए. एस .नाथन उपस्थित राहणार आहेत .

     या वृक्षक्रांती मोहिमेत प्रत्येक विद्यार्थ्याला एक मोफत  रोप देण्यात येणार असून जिल्ह्यात पाच लाख 14 हजार विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर विशेष गुण देण्यात येणार आहेत. या मोहिमेत सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

******

आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेच्या अनुषंगाने राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन

 बुलडाणा,(जिमाका) दि.13 : सन 2021 मध्ये वर्ल्ड स्कील काँम्पीटीशन 2021 ही चिन मधील शांघाई शहरात आयोजित करण्यात आली आहे.  या स्पर्धेच्या पूर्व तयारीसाठी राज्यस्तरावर कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धा 2021 साठी देशाचे नामांकन निश्चित करण्यासाठी 17 व 18 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरावर, 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान विभागीय स्तरावर व 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान राज्यस्तरावर कौशल्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.

    स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 15 ऑगस्ट 2021 पर्यंत नोंदणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScc9hV8zb9-eIBlPWfEYny_XK0485eibd8 vzLbX24LphXPQDw/viewformया लिंकवर नोंदणी करावी स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी https://kaushalya. mahaswayam.gov.in,https://worldskillsindia.co.in/worldskill/world,https://worldskillsindia.co.in/kazan 2019.php या संकेतस्थळांना भेट द्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास यांनी केले आहे.
                                                                       ******************

No comments:

Post a Comment