PLFS व ASUSE सर्वेक्षणांना बुलढाण्यात प्रारंभ; रोजगार व असंघटित क्षेत्राच्या विकासाचा आढावा घेणार
PLFS व ASUSE सर्वेक्षणांना बुलढाण्यात प्रारंभ;
रोजगार व असंघटित क्षेत्राच्या विकासाचा आढावा घेणार
बुलढाणा, दि.15 (जिमाका) :
केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली
अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय, महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या Periodic
Labour Force Survey (PLFS) आणि Annual Survey of Unincorporated Sector
Enterprises (ASUSE) या राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणांना बुलढाणा जिल्ह्यात प्रारंभ
झाला आहे. या सर्वेक्षणांचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या हस्ते
करण्यात आले.
यावेळी
उपआयुक्त जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी तसेच जिल्हा
सांख्यिकी कार्यालय व जिल्हा नियोजन समितीतील अधिकारी-कर्मचारी तसेच सर्वेक्षणाचे प्रत्यक्ष
क्षेत्रीय काम करणारे पर्यवेक्षक व गणकदेखील यावेळी उपस्थित होते.
PLFS
सर्वेक्षणाद्वारे रोजगार, बेरोजगारी, कामगारांचा सहभाग, शिक्षणानुसार व वयानुसार रोजगाराची
स्थिती, शहरी व ग्रामीण भागातील रोजगाराचे स्वरूप, कामाचे तास तसेच बेरोजगारी दर याबाबतची
माहिती संकलित केली जाणार आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर कार्यरत कामगारांचाही या सर्वेक्षणात
समावेश करण्यात येणार आहे. तर ASUSE सर्वेक्षणाद्वारे असंघटित क्षेत्रातील (बिगर कृषी)
उत्पादन, व्यापार व सेवा क्षेत्रातील उद्योगांची आर्थिक व कार्यात्मक माहिती गोळा करण्यात
येणार आहे. या सर्वेक्षणातून उपलब्ध होणारी माहिती रोजगार निर्मिती, आर्थिक वाढीचे
मूल्यांकन, धोरण निर्मिती व विविध विकास योजनांच्या आखणीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
हे
सर्वेक्षण १५ जून २०२६ पासून सुरू होऊन ३१ मे २०२७ पर्यंत चालणार असून, बुलढाणा जिल्ह्यातील
निवड करण्यात आलेल्या ग्रामीण व शहरी भागांमध्ये क्षेत्रीय भेटी घेऊन माहिती संकलित
केली जाणार आहे. सर्व माहिती गोपनीय ठेवली जाणार असून ती केवळ सांख्यिकी उद्देशांसाठी
वापरण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी
सर्व संबंधित कुटुंबांनी सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या गणकांना योग्य व अचूक माहिती
देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.
00000


Comments
Post a Comment