खामगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय प्रस्तावित; १५ दिवसांत सूचना व हरकती नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 


बुलढाणा,दि.24(जिमाका) : प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी बुलढाणा जिल्ह्यात खामगाव येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे. या नवीन कार्यालयाचे मुख्यालय आणि कार्यक्षेत्र निश्चितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या संदर्भात नागरिकांकडून १५ दिवसांच्या आत सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी जाहीर सूचनेद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने ही कार्यवाही सुरू केली आहे.

प्रस्तावित रचनेनुसार जिल्ह्याची विभागणी करताना अपर जिल्हाधिकारी कार्यालय, खामगाव या नवीन मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रात खामगाव, शेगाव, मोताळा, मलकापूर, नांदुरा, संग्रामपूर आणि जळगाव जामोद अशा एकूण ७ तालुक्यांचा समावेश असेल. या नवीन कार्यालयाच्या निर्मितीनंतर मूळ अपर जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्याकडे बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मेहकर आणि लोणार हे एकूण ६ तालुके राहतील. या नवीन प्रशासकीय रचनेमुळे जिल्ह्यातील एकूण १३ तालुक्यांचे विकेंद्रीकरण अधिक प्रभावीपणे होणार आहे.

या प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मिती किंवा कार्यक्षेत्र निश्चितीबाबत जिल्ह्यातील संबंधित नागरिक, संस्था आणि इतर घटकांना काही आक्षेप, हरकती किंवा सूचना मांडायच्या असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात सादर कराव्यात. या सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत म्हणजेच दिनांक ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे सादर करणे आवश्यक आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही हरकती किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी