अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा; राज्य शासनाकडून १४ कोटी ५८ लाखांचा निधी मंजूर; बुलढाणा जिल्ह्यासाठी २ कोटी २७ लाखांचा भरीव निधी मंजूर

 


अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा; राज्य शासनाकडून १४ कोटी ५८ लाखांचा निधी मंजूर;

बुलढाणा जिल्ह्यासाठी २ कोटी २७ लाखांचा भरीव निधी मंजूर

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती

 

बुलढाणा,दि.12 (जिमाका) : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये माहे एप्रिल २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याकरिता राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, एकूण १४ कोटी ५८ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मदत वाटप प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने होणार असून, मदतीचे वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

 

नुकताच निर्गमित झालेल्या अधिकृत शासन निर्णयानुसार बुलढाणा जिल्ह्यात एप्रिल 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे २ हजार २२० बाधित शेतकऱ्यांना (१,३३५ हेक्टर) २ कोटी २७ लाख ३२ हजार रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

 

थेट बँक खात्यात निधी जमा (DBT): निश्चित केलेल्या दरांप्रमाणे सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मदत निधी थेट त्यांच्या बँक खात्यात 'डीबीटी' (DBT) पोर्टलद्वारे वितरित केला जाणार आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना संगणकीय प्रणालीवर सर्व लाभार्थ्यांची माहिती काळजीपूर्वक भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दुबार वाटप रोखणार: चालू हंगामामध्ये यापूर्वी शेतीपिकांच्या नुकसानीसाठी वितरित केलेल्या निधीमध्ये या नव्या प्रस्तावातील मागणीचा समावेश नाही, याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एका हंगामात एक वेळच याप्रमाणे मदत दिली जाईल. तसेच कोणत्याही लाभार्थ्याला दुबार मदत मिळणार नाही (द्विरुक्ती होणार नाही), याची संपूर्ण जबाबदारी संबंधित तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयावर सोपवण्यात आली आहे.

बँकांना वसुली करण्यास मनाई: नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मिळालेला हा मदतीचा निधी बँकांनी कोणत्याही जुन्या कर्ज खात्यात अथवा इतर कोणत्याही कारणास्तव वसुलीसाठी वळत करू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्यात, असे शासन निर्णयात नमूद आहे.

पारदर्शकता आणि यादी प्रसिद्धी: मदत वाटपाची संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर, सर्व लाभार्थ्यांची यादी आणि त्यांना मिळालेल्या मदतीचा सविस्तर तपशील जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल.

शासन निर्णयानुसार पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील एकूण १६ हजार २६७ बाधित शेतकऱ्यांना या निधीचा लाभ मिळणार असून ८,०९८.९५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १४ कोटी ५८ लाख ९० हजार रुपयांचा मदत निधी दिली जात आहे. विभाग व जिल्हावार तपशील खालीलप्रमाणे आहे:

 

पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील १ हजार २७० बाधित शेतकऱ्यांना (८५६.०५ हेक्टर) १ कोटी ६७ लाख ८९ हजार रुपये, पुणे जिल्हा ८ हजार ५४४ बाधित शेतकरी (३,४९०.०१ हेक्टर) ६ कोटी २३ हजार ८७ हजार रुपये, सातारा जिल्हा २८ बाधित शेतकरी (५.१४ हेक्टर) ९८ हजार रुपये, असे एकूण ९ हजार ८४२ बाधित शेतकऱ्यांना ७ कोटी ९२ लाख ७४ हजार रुपये मदत निधी मंजूर.

 

छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशीव जिल्ह्यातील २ हजार २०४ बाधित शेतकऱ्यांना (१,५१०.३२ हेक्टर) २ कोटी ८४ लाख १५ हजार रुपये, नांदेड जिल्हा १४४ बाधित शेतकरी (६४.५० हेक्टर)  ९ लाख ५९ हजार रुपये, हिंगोली जिल्हा २९ बाधित शेतकरी(१५.२० हेक्टर) २ लाख ७३ हजार रुपये, असे एकूण २ हजार ३७७ बाधित शेतकऱ्यांना २ कोटी ९६ लाख ४७ हजार रुपये मदत निधी मंजूर.

 

अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यातील २ हजार २२० बाधित शेतकऱ्यांना(१,३३५.०० हेक्टर)  २ कोटी २७ लाख ३२ हजार रुपये, वाशीम जिल्हा ८३६ बाधित शेतकरी (२९१.६१ हेक्टर) ४९ लाख ८५ हजार रुपये, यवतमाळ जिल्हा ४४४ बाधित शेतकरी(२४२.११ हेक्टर) ४१ लाख ६० लाख रुपये, अकोला जिल्हा ३०८ बाधित शेतकरी (२०४.८५ हेक्टर) ३४ लाख ८९ लाख रुपये व अमरावती जिल्हा २४० बाधित शेतकरी(८४.९६ हेक्टर)  १६ लाख ३ हजार रुपये, असे एकूण ४ हजार ०४8 शेतकऱ्यांना  ३ कोटी ६९ लाख ६९ हजार रुपये मदत निधी मंजूर करण्यात आले आहे.

 

या निर्णयामुळे मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीस मान्यता दिल्याने नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असल्याचेही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी