यूपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी अमृतची विशेष अर्थसहाय्य योजना; पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले

 


बुलढाणा, दि. 30 (जिमाका): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तसेच अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्वतयारी योजना राबविण्यात येत असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

या योजनेचा लाभ सन २०२६-२७ मधील यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुख्य परीक्षा तसेच मुलाखतीची तयारी करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांना मिळणार आहे. अमृतच्या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पाटील, राजपूत, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंथर, गुजराती, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार, लोहारणा, कानबी आदी समाजघटकांचा समावेश आहे.

योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच मुलाखत पूर्वतयारीसाठी २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य प्रदान करण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावरील सूचना काळजीपूर्वक वाचून त्यानुसार ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज सादर करण्यासाठी अमृतच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. योजनेबाबतची सर्व माहिती, सूचना व अद्यतने अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत कोणतीही अडचण अथवा शंका असल्यास संबंधित जिल्हा अमृत कार्यालयाशी किंवा ९११२२२७६३७,  ८३०८९९८९२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अमृत कार्यालयाचे व्यवस्थापक जिगणेश जी. कमानी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन