शेतकरी कल्याणाला बळ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना
बुलढाणा, दि. 30 (जिमाका): राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी 'पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत
पात्र शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह प्रति शेतकरी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती
देण्यात येणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर
लाभ दिला जाणार आहे. सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा असून,
त्यासाठी सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या शेतकरी हितैषी व लोकाभिमुख कार्याला
अभिवादन म्हणून या योजनेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. शेती, सिंचन, जलसंधारण आणि
ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव या माध्यमातून करण्यात आला
आहे.
दोन लाखांपर्यंत थेट कर्जमुक्ती
: योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या
पीक कर्जांचा समावेश करण्यात आला आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत आणि ३१ मार्च २०२६
पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती
मिळणार आहे. पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जाचाही यामध्ये समावेश करण्यात आला असून,
या योजनेसाठी जमीनधारणेची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही.
दोन लाखांपेक्षा जास्त कर्जदारांनाही
लाभ : यावेळी शासनाने महत्त्वाचा बदल करत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या
शेतकऱ्यांसाठीही दिलासादायक तरतूद केली आहे. अशा शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील अतिरिक्त
रक्कम ३१ मार्च २०२७ पर्यंत संबंधित बँकेत भरल्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतची
कर्जमुक्ती दिली जाणार आहे. त्यामुळे पूर्वी अल्प फरकामुळे लाभापासून वंचित राहणाऱ्या
शेतकऱ्यांनाही या योजनेचा फायदा होणार आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन
: कर्जफेडीची शिस्त कायम ठेवण्यासाठी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत
प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी
कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्ज घेऊन नियमानुसार वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना
हा लाभ मिळेल. तसेच २०२५-२६ आणि २०२६-२७ या आर्थिक वर्षांतील अल्पमुदतीच्या पीक कर्जाची
वेळेत परतफेड करणे आवश्यक राहील. ज्या शेतकऱ्यांनी २०२३-२४ किंवा २०२४-२५ या वर्षात
५० हजार रुपयांपेक्षा कमी रकमेचे पीक कर्ज पूर्णपणे फेडले आहे, त्यांना प्रत्यक्ष परतफेड
केलेली रक्कम किंवा किमान ५ हजार रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.
महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील
लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९
मधील लाभार्थ्यांसाठीही या योजनेत विशेष तरतूद करण्यात आली आहे. पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित
कर्जाचे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचे थकीत हप्ते ५० हजार रुपयांपर्यंत असल्यास संपूर्ण
कर्जमुक्ती, तर त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेचा लाभ मिळणार
आहे. अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
कोणाला मिळणार लाभ? : राष्ट्रीयकृत,
खाजगी, ग्रामीण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांकडून
पीक कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, लाभासाठी आधार प्रमाणीकरण
अनिवार्य राहणार आहे.
कोण अपात्र? : विद्यमान व माजी
मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे विद्यमान व माजी सदस्य, केंद्र
व राज्य शासनातील २५ हजार रुपयांपेक्षा अधिक मासिक वेतन घेणारे अधिकारी-कर्मचारी, सार्वजनिक
उपक्रमांतील अधिकारी-कर्मचारी, शेतीव्यतिरिक्त उत्पन्नावर आयकर भरणाऱ्या व्यक्ती, २५
हजार रुपयांपेक्षा अधिक मासिक निवृत्तीवेतन घेणारे निवृत्तीवेतनधारक (माजी सैनिक वगळून)
तसेच काही सहकारी संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी या योजनेसाठी अपात्र असतील.
पारदर्शक ऑनलाइन प्रक्रिया : या
योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ऑनलाइन व पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे. राज्यातील
लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी शेतकरी
कर्जमुक्ती योजना ठरणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
000000

Comments
Post a Comment