मान्सून काळात नागरिकांना सतर्कतेचा इशारा; दामिनी ॲपचा वापर करा: जिल्हा प्रशासनाचे आवाहन
बुलढाणा,दि.12 (जिमाका) : मान्सून कालावधीत
सोसाट्याच्या वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह आणि मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता
जिल्हा प्रशासनाने नागरिक, शेतकरी व शेतमजुरांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले
आहे. सध्या पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे सुरू असून या काळात वीज पडण्याच्या घटनांमध्ये
वाढ होण्याची शक्यता असल्याने जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे
निर्देश देण्यात आले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन
विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांनी नागरिकांना ‘दामिनी अॅप’चा वापर करण्याचे
आवाहन केले असून या अॅपद्वारे संभाव्य वीज पडण्याबाबत अद्ययावत सूचना मिळू शकतात. तसेच
पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांनी विकसित केलेल्या मेघदूत (MEGHDOOT), सचेत
(SACHET) आणि भूकंप (BHUKAMP) या मोबाईल अॅप्सचा वापर करून विविध आपत्तींसंदर्भातील
माहिती व सतर्कता संदेश मिळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने
ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांना गावपातळीवर जनजागृती करण्याच्या
सूचना दिल्या आहेत. नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाल्यास मनुष्यहानी व पशुहानी टाळता
येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
वीज पडण्यापूर्वीची चेतावणी चिन्हे
: काळे ढग दाटून येणे, वेगवान वादळी वारे, सतत मेघगर्जना होणे, मुसळधार पावसाची शक्यता.
गडगडाटी वादळ
सुरू झाल्यास तात्काळ सुरक्षित व मजबूत इमारतीत आश्रय घ्यावा. उघड्यावर, टेकड्यांवर,
एकाकी झाडाखाली, विद्युत खांबाजवळ किंवा धातूच्या वस्तूंजवळ थांबणे टाळावे. घरात असल्यास
खिडक्या-दरवाजे बंद ठेवावेत आणि विजेवरील उपकरणांचा वापर टाळावा. तसेच मेघगर्जना थांबल्यानंतरही
किमान ३० मिनिटे सुरक्षित ठिकाणीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वज्राघात झाल्यास
काय करावे? : वज्राघातग्रस्त व्यक्तीला तात्काळ वैद्यकीय मदत मिळवून द्यावी. रुग्णवाहिकेला
संपर्क साधावा. बाधित व्यक्तीला स्पर्श करण्यास कोणताही धोका नसतो. श्वसन अथवा हृदयक्रिया
बंद झाल्यास प्राथमिक उपचार म्हणून सीपीआर देण्याची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने सांगितले.
पावसाळ्यात
शेतातील कामे करताना हवामानाचा अंदाज नियमितपणे तपासावा. वीज कडकडत असताना शेतात, पाण्याजवळ
किंवा उघड्यावर थांबू नये. जनावरांना सुरक्षित निवाऱ्यात ठेवावे आणि वादळी हवामानात
त्यांना मोकळे सोडू नये. "सतर्कता हीच सुरक्षा" या संदेशासह जिल्हा प्रशासनाने
सर्व नागरिक, शेतकरी व शेतमजुरांनी हवामान विभागाच्या सूचना नियमितपणे पाहून आवश्यक
ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment