वसतिगृह प्रवेश व पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सुरू
बुलढाणा,दि.24(जिमाका) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला यांच्या
अधिपत्याखालील अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील १६ शासकीय आदिवासी
मुला-मुलींच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा
लाभ घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात
आली आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी नवीन तसेच नूतनीकरण अर्ज निर्धारित
संकेतस्थळावर भरावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी मोहनकुमार ग. व्यवहारे यांनी केले
आहे.
वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या
विद्यार्थ्यांना स्वयंम योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करता येणार नाही. वसतिगृह
प्रवेशासाठी निवड न झालेल्या विद्यार्थ्यांनाच स्वयंम योजनेत समाविष्ट करण्यात
येणार आहे. तसेच गुणवत्ता यादीत निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेश
निश्चित न केल्यास किंवा अर्ज रद्द केल्यास स्वयंम योजनेचाही लाभ मिळणार नसल्याचे
स्पष्ट करण्यात आले आहे.
या योजनांचा लाभ प्री-मॅट्रिक, कनिष्ठ
महाविद्यालय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच विविध व्यावसायिक
अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना घेता येणार
आहे.
अर्जासाठी आधार कार्ड, जात प्रमाणपत्र
व आवश्यकतेनुसार जात वैधता प्रमाणपत्र, प्रवेश पावती, बोनाफाईड प्रमाणपत्र,
शैक्षणिक खंड असल्यास गॅप प्रमाणपत्र, शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र, उत्पन्नाचा
दाखला, बँक पासबुक, मागील वर्षाची गुणपत्रिका, अधिवास प्रमाणपत्र, टी.सी. आदी
कागदपत्रे आवश्यक आहेत.
योजनेसंदर्भात शासनाकडून वेळोवेळी
देण्यात येणाऱ्या सूचना व कालमर्यादांचे पालन विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक राहणार
आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी जवळच्या शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या
वसतिगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment