‘कसं काय’ मोहिमेअंतर्गत जिल्हाभर आरोग्य जनजागृती; जोहर नगर येथे गरोदर माता तपासणी शिबिर
बुलढाणा,दि.23 (जिमाका) : राज्य
शासनाच्या ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘कसं
काय’ मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वसमावेशक प्राथमिक
आरोग्य सेवा (CPHC) अधिक सक्षम करण्यासाठी विविध प्रशिक्षण, जनजागृती उपक्रम आणि
आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
मा. जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये हा
उपक्रम राबविला जात असून, त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी (दि. २२ जून) नागरी
प्राथमिक आरोग्य केंद्र, जोहर नगर येथे गरोदर माता तपासणी शिबिर
आयोजित करण्यात आले.
शिबिरात गरोदर मातांची
नियमित आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच सिकलसेल आजाराबाबत जनजागृती,
तपासणी आणि समुपदेशन करण्यात आले. उपस्थित महिलांना सिकलसेल
आजाराचे स्वरूप, लक्षणे, आनुवंशिकता, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच वेळेवर निदान व
उपचाराचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी माता व बाल आरोग्य
संवर्धनासाठी नियमित तपासणी, संतुलित पोषण, लसीकरण आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे
महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
‘कसं काय’ मोहिमेअंतर्गत
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुष्यमान आरोग्य मंदिरे, उपकेंद्रे आणि
नागरी आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्रे, सर्वसमावेशक
प्राथमिक आरोग्य सेवेची प्रात्यक्षिके, रोगप्रतिबंधक जनजागृती उपक्रम तसेच विविध
आरोग्य शिबिरांचे आयोजन सुरू असून नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध
करून देण्यावर भर दिला जात आहे.
या उपक्रमात वैद्यकीय
अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका तसेच नागरी प्राथमिक आरोग्य
केंद्र, जोहर नगर येथील कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. त्यांच्या
सहकार्यामुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment