पर्यावरण संवर्धनासाठी प्रशासनाची तयारी; वृक्षारोपण अभियानाचे नियोजन
बुलढाणा,दि.9
(जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या
महत्त्वाकांक्षी 300 कोटी वृक्षारोपण मोहीम आणि हरित महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे
राबविण्याच्या दृष्टीने सामाजिक वनीकरण विभाग, बुलढाणा यांच्या वतीने जिल्हास्तरीय
नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.
प्रवीण कुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीत जिल्ह्यातील वृक्षारोपणाची उद्दिष्टे, उपलब्ध
रोपसाठा, लागवडीसाठी योग्य क्षेत्रांची निवड, विविध विभागांमधील समन्वय, जनसहभाग वाढविणे
तसेच वृक्षसंवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी
डॉ. देवरे यांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनावर विशेष भर देण्याच्या सूचना केल्या.
पर्यावरण संरक्षण, जलसंधारण आणि जैवविविधता संवर्धनासाठी वृक्षारोपण मोहिमेला लोकचळवळीचे
स्वरूप देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात
अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश
दिले.
जिल्ह्यातील विविध विभागांकडे उपलब्ध असलेल्या जागांचा
तपशील संकलित करून विभागनिहाय ‘लँड बँक’ ३० जूनपर्यंत तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी
संबंधित विभागांना दिल्या. बैठकीस सामाजिक वनीकरण विभाग व वन विभागाचे अधिकारी, उपजिल्हाधिकारी
(रोहयो), जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रतिनिधी, जिल्हा नियोजन अधिकारी, प्रकल्प
अधिकारी (आदिवासी विभाग), जिल्हा कृषी अधिकारी, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित
होते.
बैठकीत सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करून जिल्ह्यातील
वृक्षारोपणाचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांनीही
या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बुलढाणा जिल्हा घडविण्यास
सहकार्य करावे, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात आले.
00000
Comments
Post a Comment