जिल्ह्यात ‘स्टॉप डायरिया अभियान 2026’ प्रभावीपणे राबवूया : मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात

 


बुलढाणा,दि.25(जिमाका) : पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे अतिसारजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या वतीने ‘स्टॉप डायरिया अभियान 2026’ राबविण्यात येत आहे. हे अभियान १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, सर्व संबंधित विभागांनी तसेच नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद बुलढाणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले आहे.

अतिसार हा विशेषतः पाच वर्षांखालील बालकांसाठी जीवघेणा ठरू शकणारा आजार असून, सुरक्षित पिण्याचे पाणी, साबणाने हात धुण्याची सवय, परिसर स्वच्छता आणि योग्य स्वच्छताविषयक पद्धतींचा अवलंब केल्यास या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळविता येते, असे त्यांनी सांगितले. नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करून प्रतिबंधात्मक उपाय अधिक बळकट करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, पाणी व स्वच्छता विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच विविध सामाजिक संस्थांच्या समन्वयातून हे अभियान राबविले जाणार आहे.

अभियानांतर्गत तालुका व ग्रामस्तरावर बैठका आयोजित करण्यात येणार असून ग्रामपंचायती, पाणीपुरवठा व स्वच्छता समित्या, शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमधून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. गावनिहाय पाणी गुणवत्तेची तपासणी करून सर्व जलस्रोतांची नियमित चाचणी केली जाईल. विद्यार्थी आणि स्वयंसेवकांना फील्ड टेस्ट किटच्या माध्यमातून पाणी तपासणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेतील गळती दुरुस्ती, पाणी साठवण टाक्यांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण, तसेच पिण्याच्या पाण्याचे नियमित क्लोरीनीकरण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. नळाद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्यात किमान ०.२ पीपीएम मुक्त अवशिष्ट क्लोरीन राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या कालावधीत हात धुण्याचे महत्त्व, सुरक्षित पाणी वापर, अन्न स्वच्छतेचे नियम आणि अतिसार प्रतिबंध याबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच Swachh Bharat Mission (Gramin) अंतर्गत हागणदारीमुक्त स्थितीची शाश्वतता राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

स्थानिक समुदाय, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत सदस्य आणि विविध विभागांच्या समन्वयातून अभियान अधिक प्रभावी करण्यात येणार असून, पाणी गुणवत्तेशी संबंधित तक्रारींचा नियमित आढावा घेऊन नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे.

प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवावा

सुरक्षित पाणी, स्वच्छता आणि चांगल्या सवयींच्या माध्यमातून अतिसारमुक्त व निरोगी बुलढाणा घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा. प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय असून नागरिकांच्या सहकार्यामुळे ‘स्टॉप डायरिया अभियान 2026’ अधिक प्रभावी ठरेल, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी