शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित;स्वाधार योजनेच्या लाभासाठी अर्ज करणे आवश्यक
बुलढाणा,
दि. 11 जून : शासकीय वसतिगृहात
प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन
अर्ज दि. 30 जून 2026 तर इयत्ता 11 वी, 12 वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी
अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. 15 जुलै 2026 आहे. पात्र विद्यार्थ्यांनी
https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात
आले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत
सहायक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा कार्यालयाच्या अधिपत्याखाली जिल्ह्यातील एकूण
17 शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया
सुरू झाली आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील
विद्यार्थ्यांना जागेअभावी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, तरी त्यांना भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार आहे. वसतिगृह
प्रवेशासाठी निवड न झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज स्वयंचलितपणे स्वाधार योजनेकडे वर्ग
करण्यात येणार असल्याने वसतिगृह प्रवेश अर्ज भरणे अत्यावश्यक आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी
अर्ज भरलेला नसेल, त्यांच्यासाठी स्वाधार योजनेचा स्वतंत्र ऑनलाइन अर्ज करण्याची कोणतीही
सुविधा उपलब्ध नसून अशा विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी
स्थानिक गृहपालांशी संपर्क साधून विहित मुदतीत अर्ज भरावेत, असे आवाहन सहायक आयुक्त
मनोज मेरत यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment