एकल महिला धोरणासाठी ३० जूनला जिल्हास्तरीय बैठक; सूचना व अभिप्राय मागविले

 


बुलढाणा, दि. 22 (जिमाका): राज्यातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच इतर एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासन स्वतंत्र आणि व्यापक ‘एकल महिला धोरण’ तयार करत आहे. या धोरणाला अधिक परिणामकारक व लोकाभिमुख स्वरूप देण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने ३० जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद, बुलढाणा येथे जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत एकल महिलांच्या समस्या, अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकल महिला, नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक आणि विषयतज्ज्ञांनी या धोरण निर्मिती प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी केले आहे.

धोरणाचा मसुदा तयार करताना केवळ समस्या मांडण्याऐवजी त्यावरील ठोस उपाय, नवीन योजना, विद्यमान योजनांमधील आवश्यक बदल तसेच कायदे किंवा नियमांमधील सुधारणा याबाबत अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रस्तावामध्ये संबंधित विषयाची पार्श्वभूमी, अपेक्षित उपाययोजना, संभाव्य लाभार्थी आणि त्याचे परिणाम यांचा समावेश असावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बैठकीस उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरिकांसाठी प्रशासनाने ८२०८५८९१९५ हा अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या नाविन्यपूर्ण सूचना व अभिप्रायांचा एकल महिला धोरणाच्या मसुदा तयार करताना विचार केला जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्व संबंधित घटकांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी