पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार व अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य

 


 

बुलढाणा,दि.24(जिमाका) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार असून, योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक व अॅग्रीस्टॅक आयडीची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही माहिती तात्काळ संबंधित बँक शाखेकडे सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

 

शासनाच्या २ जून २०२६ रोजीच्या निर्णयानुसार, सेवा सहकारी संस्था (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), राष्ट्रीयकृत, ग्रामीण व खासगी बँकांकडून १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेल्या तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज, पुनर्गठित किंवा फेरपुनर्गठित कर्जाच्या थकबाकीवर ही योजना लागू होणार आहे.

 

योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. थकबाकी २ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांनी प्रथम भरावी लागेल. त्यानंतर एकवेळ समझोता योजनेअंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात येईल.

 

यापूर्वी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९ चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना सर्व कर्ज खात्यांतील एकत्रित थकबाकीवर ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्यात येणार आहे.

 

तसेच सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्ज घेऊन नियमानुसार वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. याशिवाय, सन २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची वेळेत परतफेड केलेली रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास, प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान ५ हजार रुपये इतका लाभ देण्यात येणार आहे.

 

योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि अॅग्रीस्टॅक आयडी बँकेकडे उपलब्ध असणे आवश्यक असल्याने सर्व पात्र शेतकऱ्यांनी ही माहिती त्वरित आपल्या बँक शाखेत जमा करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी