अमृतचा हरित ऊर्जेकडे मोठा टप्पा; ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि अर्थसहाय्य

 




बुलढाणा, दि. 30 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या माध्यमातून राज्यभरात ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल) चार्जिंग स्टेशन व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देत युवक, महिला, स्वयं सहाय्यता गट, एमएसएमई उद्योजक तसेच ग्रामीण भागातील इच्छुकांना प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत असल्याने भविष्यात ईव्ही चार्जिंग स्टेशनचे मोठे जाळे उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमृत संस्थेने राज्यातील युवकांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणी, संचालन व व्यवस्थापन, चार्जिंग उपकरणांची देखभाल, सौरऊर्जेवर आधारित चार्जिंग सुविधा, ग्रीन एनर्जी सेवा, ईव्ही तांत्रिक सेवा, फ्रँचायझी मॉडेल तसेच ग्रामीण भागात चार्जिंग हब उभारणीसारख्या विविध क्षेत्रांत व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

सहभागी लाभार्थ्यांना ईव्ही क्षेत्राविषयी मूलभूत ते प्रगत प्रशिक्षण, व्यवसाय नियोजन, प्रकल्प अहवाल तयार करणे, तांत्रिक मार्गदर्शन, बाजारपेठेचा अभ्यास, व्यवसाय व्यवस्थापन तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. भारतीय स्वदेशी कंपन्या आणि तज्ज्ञांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण दिले जाणार असून पात्र लाभार्थ्यांना अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचाही लाभ मिळू शकणार आहे.

या उपक्रमासाठी युवक-युवती, महिला उद्योजक, स्वयं सहाय्यता गट (एसएचजी), एमएसएमई उद्योजक, शेतकरी उत्पादक गट, ग्रामीण उद्योजक तसेच स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणारे नागरिक पात्र आहेत. पात्र उमेदवारांना व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन, तांत्रिक सल्ला आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 'योजना' विभागातील 'विशेष योजना' अंतर्गत EV Charging Station Partner या पर्यायामध्ये ऑनलाइन अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयातही अधिक माहिती उपलब्ध आहे.

पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्याबरोबरच युवक, महिला आणि ग्रामीण भागातील उद्योजकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे अमृततर्फे सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिग्नेश कमानी, जिल्हा व्यवस्थापक (९११२२२७६३७) किंवा अमृत जिल्हा कार्यालय, ३०५, तिसरा मजला, बुलढाणा प्राइड बिल्डिंग, तहसील कार्यालयासमोर, बुलढाणा – ४४३००१ येथे संपर्क साधावा.

00000

Comments