राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे विशेष त्रुटी पूर्तता शिबिर

 


बुलढाणा, दि. 26 (जिमाका) : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बुलढाणा यांच्या वतीने "राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व" निमित्त विशेष त्रुटी पूर्तता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे विशेष शिबिर दि. २६ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बुलढाणा कार्यालयात आयोजित करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रासंबंधी प्रलंबित प्रकरणांतील त्रुटी दूर करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) २०२६ चा निकाल जाहीर झाल्यानंतर उच्च शिक्षण व विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत नव्याने प्रवेश घेणारे तसेच डिप्लोमा तृतीय वर्षात प्रवेशित झालेले आणि अद्याप जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज स्वीकारण्यासाठी विशेष खिडकीची व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय, त्रुटीमुळे प्रलंबित असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रम, इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखा तसेच डिप्लोमा तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी समितीमार्फत ई-मेल, एसएमएस आणि पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

या विशेष शिबिराचा लाभ घेऊन संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकरणांची पूर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष श्री. नरेंद्र फुलझेले, उपायुक्त तथा सदस्य श्री. अमोल यावलीकर आणि संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्री. मनोज मेरत यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी