आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौशल्यवर्धन; दोन दिवसीय प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौशल्यवर्धन; दोन दिवसीय प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलढाणा, दि. १५ जून : राज्य शासनाच्या
निर्देशानुसार नागरिकांना गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून
देण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळी, ता. बुलढाणा येथे “सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य
सेवा” या विषयावरील दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास उत्साहपूर्ण वातावरणात
प्रारंभ झाला.
आरोग्य व कल्याण
केंद्रांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढविणे, प्राथमिक आरोग्य
सुविधांचा विस्तार करणे तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी
अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. दि. १५ ते १६ जून
२०२६ या कालावधीत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व
आरोग्यवर्धिनी केंद्रांसाठी वर्षभराचा प्रशिक्षण आराखडा तयार करण्यात आला असून
त्यानुसार आशा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तसेच अधिकारी वर्गाचे टप्प्याटप्प्याने
प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या
उद्घाटनप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, जिल्हा माता व बाल संगोपन
अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश
जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळीचे वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षक तसेच
जिल्हास्तरीय कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणात वैद्यकीय
अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ), आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक
आणि आशा समन्वयक सहभागी झाले आहेत. प्रशिक्षणादरम्यान सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य
सेवा, विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, समुदाय आधारित आरोग्य सेवा, रुग्णाभिमुख
सेवा वितरण, आरोग्य नोंद व्यवस्थापन तसेच आरोग्य व कल्याण केंद्रांच्या
कार्यक्षमतेविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून
विविध विषयांवर सादरीकरणे, चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले
असून सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रशिक्षणातून
प्राप्त होणारे ज्ञान व कौशल्य ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ
आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा देण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त
करण्यात आला.
या दोन दिवसीय
प्रशिक्षणामुळे आरोग्य विभागातील मनुष्यबळ अधिक सक्षम होऊन सर्वसमावेशक प्राथमिक
आरोग्य सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीला गती मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी
व्यक्त केला.
Comments
Post a Comment